मातृभाषा ः चिंता आणि चिंतन

0
782
  •  प्रा. रमेश सप्रे

जननी म्हणजे आपली जन्म देणारी आई आणि जन्मभूमी आपली मातृभूमी स्वर्गाहून श्रेष्ठ आहेत. ‘जननी जन्मभूमी स्वर्ग से महान् हैं|’ या दोघांनाही म्हणजे माता नि मातृभूमी यांना जोडणारं सूत्र आहे- मातृभाषा!
मातृभाषेत बोलणं म्हणजे आईशी, आईसारखं बोलणं. अगदी सहज नि उत्स्फूर्त.

कितीही चांगल्या इतर भाषा आत्मसात केल्या तरी त्यांचं स्थान मेंदूत वरवरचंच असतं. मातृभाषा मात्र आपला आत्मा असते. तिला अगदी आतमधून येणारी, उत्स्फूर्तपणे प्रकटणारी, सहजपणे बोलता येणारी अशी ‘आत्मभाषा’ म्हणायला हरकत नाही.

आता तर आपलं जवळजवळ एकही वाक्य इंग्रजी (क्वचित् हिंदी) शब्द वापरल्याशिवाय पूर्ण होत नाही. याला कारण आपली मातृभाषेविषयीची बेफिकिर वृत्ती आहे. कारण इंग्रजी बोलताना आपण इतर भाषेतले शब्द वापरत नाही कारण आपण सावध असतो. मग मातृभाषेला बोलताना अशी बेदरकार बेसावध वृत्ती कशाला?

सुरवातीला दोन प्रसंग पाहू या. एक आपल्याकडचा नि एक त्यांच्याकडचा (पाश्चात्त्य देशातला). हा किस्सासुद्धा असू शकेल किंवा आख्यायिका.
एकदा पुण्याला पेशव्यांच्या दरबारात एक विद्वान आला. तो बहुभाषाकोविद होता. म्हणजे अनेक भाषांवर त्याचं प्रभुत्व होतं. त्या भाषा तो मातृभाषेइतक्या सफाईनं बोलू शकत असे. पेशवे दरबारासमोर त्यानं आव्हान दिलं- ‘आपल्या दरबारात अनेक बुद्धिमान माणसं आहेत. मी दिवसभर अनेक भाषा बोलेन. माझी मूळ मातृभाषा कोणती ते शोधून काढेल त्याला मी पुरस्कार देईन. नाहीतर आपण माझा सत्कार करावा’.

ते आव्हान ऐकल्यावर सर्वांच्या नजरा अर्थातच नाना फडणवीसांकडे वळल्या. नाना म्हणाले, ‘मला एक दिवस द्या. मी त्याच्या सर्व भाषा नीट ऐकेन, मगच त्याची खरी मातृभाषा कोणती हे सांगू शकेन’. याला कुणाचीच हरकत नव्हती. त्या भाषाप्रभूला वाटलं की नाना दिवसभर आपल्याबरोबर किंवा आगेमागे राहतील नि लक्ष देऊन आपलं बोलणं ऐकतील. पण नाना एक क्षणही त्याच्याबरोबर थांबले नाहीत. त्याला आश्चर्य वाटलं. पण नानांच्या मनात निराळीच योजना होती.

त्या रात्री तो भाषाप्रभू गाढ झोपलेला असताना नानांनी एक बादलीभर थंड पाणी त्याच्या अंगावर ओतलं. त्याबरोबर ‘अय्यय्यो, अय्यय्यो’ करत उठला. राग त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. नाना शांतपणे म्हणाले, ‘महाशय, आपली मातृभाषा तमीळ आहे. आपण मूळचे तामीळनाडूमधील (मद्रास प्रांतातील) आहात’. त्याला आश्चर्य वाटलं, कारण नानांचं उत्तर बरोबर होतं.
दुसर्‍या दिवशी नानांचा सत्कार करून, त्यांना उपहार देऊन तो विद्वान आनंदात निघून गेला. नानांनी एका गोष्टीवर विचार केला की दिवसा आपण सावध असतो. अनेक मुखवटे सावरत सारे व्यवहार पार पाडतो. पण रात्री शांत झोपेत आपलं अंतर्मन (सब्‌कॉन्शस) जागं होतं. तेव्हा त्याच्यात दडलेल्या अनेक गोष्टी उत्स्फूर्तपणे व्यक्त होतात. तसंच या प्रसंगी घडलं.

तात्पर्य – आपली मातृभाषा ही आपलं अंतर्मन, बहिर्मन सारं मन व्यापून असते. खरंच ती आपल्या आईएवढी आपल्या आतली असते. नऊ महिने (गर्भवासात) आपण आईमध्ये असतो. नंतर आयुष्यभर कळतनकळत आई आपल्या आत असते. आपल्या कृतीतून, संस्कारातून ती व्यक्त होते. जशी आई तशी आपली मातृभाषा.
मातृभाषेच्या आपल्या शरीर-मन-बुद्धीतील स्थानाबद्दल विचार नि संशोधन करायला भाग पाडणारा एक प्रसंग काही वर्षांपूर्वी परदेशात घडला. तसं पाहिलं तर तो एक अपघात होता. दोन्ही बाजूंनी म्हणजे शरीराच्या आणि बुद्धीच्या दृष्टींनी एक अनेक भाषा सफाईनं बोलणारी बहुभाषक व्यक्ती (मल्टिलिंग्विस्ट किंवा पॉलिग्लॉट) एकदा अपघातात सापडली. डोक्याला मार बसला. जखम झाली. मेंदूतली विविध कामं करणारी काही केंद्र जखमी झाली. अशात भाषा बोलण्याची क्षमता व त्यावर नियंत्रण ठेवणारं केंद्रही प्रभावित झालं. काही दिवस ती अनेक भाषा बोलू शकणारी व्यक्ती बेशुद्धावस्थेत राहिली. शुद्धीवर आली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण सर्व भाषा पूर्ण विसरलोय, फक्त मातृभाषा शाबूत आहे. डॉक्टरांना नि अनुभवी भाषापंडितांनाही याचं रहस्य काही कळलं नाही.
यावरून एकच दिसून आलं की कितीही चांगल्या इतर भाषा आत्मसात केल्या तरी त्यांचं स्थान मेंदूत वरवरचंच असतं. मातृभाषा मात्र आपला आत्मा असते.

तिला अगदी आतमधून येणारी, उत्स्फूर्तपणे प्रकटणारी, सहजपणे बोलता येणारी अशी ‘आत्मभाषा’ म्हणायला हरकत नाही.
रामायणातला एक प्रसंग आहे. रावणसंहाराच्यावेळी वनवासाची चौदा वर्षं पूर्ण होत असतात. लक्ष्मणाच्या मनात एक व्यावहारिक विचार येतो, जो चुकीचा नसतो- तो रामाला सुचवतो, ‘एवीतेवी चौदा वर्षं आपल्याला वनवासाची सवय झालीय.- त्यामुळे तो आवडूही लागलाय. आता सीतामाईही मुक्त झालीय. शिवाय आपल्याला राज्यच करायचं असेल तर सुग्रीव किष्किंधेचं राज्य आणि बिभीषण लंगेचं राज्य आपल्या पायावर अर्पण करायला उत्सुक आहेत. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंधू भरतानं चौदा वर्षात अयोध्येत स्वतःची शासन व्यवस्था निर्माण केली असेल. राज्याची नीट घडी घातली असेल. अशा परिस्थितीत आपण परत जाऊन भरताच्या त्या व्यवस्थेत विघ्न कशाला निर्माण करायचं?’
रामानं शांतपणे लक्ष्मणाकडे पाहिलं नि हसून म्हणाला, ‘बंधू लक्ष्मणा, तुझा विचार ठीक आहे. पण लंकेच किंवा किष्किंधेत राजा बनण्यापेक्षा मी अयोध्येत दास, सेवक होणं पसंत करीन. लंका जरी सोन्याची असली (- अपि स्वर्णमयी लंका) तरी आपली अयोध्या ती अयोध्याच. तू लक्षात ठेव- ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’.
जननी म्हणजे आपली जन्म देणारी आई आणि जन्मभूमी आपली मातृभूमी स्वर्गाहून श्रेष्ठ आहेत. ‘जननी जन्मभूमी स्वर्ग से महान् हैं|’ या दोघांनाही म्हणजे माता नि मातृभूमी यांना जोडणारं सूत्र आहे- मातृभाषा!

मातृभाषेत बोलणं म्हणजे आईशी, आईसारखं बोलणं. अगदी सहज नि उत्स्फूर्त. ‘ये हृदयीचे ते हृदयी घातले’ असा कृष्णार्जुनांसारखा प्रकार नि प्रभाव आहे मातृभाषेचा.
आणखी एक मजेदार प्रश्‍न. मातृभूमीला काही देशात (उदा. जर्मनी, इस्रायल) पितृभूमी म्हणतात (फादरलँड). पण मातृभाषेला मात्र जगात सर्वत्र मातृभाषा (मदरटंगच) म्हणतात, असं का? उत्तर सरळ आहे.

आईच्या गर्भात असल्यापासून गर्भावर आईचाच सर्वबाजूंनी प्रभाव असतो. गर्भाचं रक्षण, पोषण बाळाच्या जन्मापूर्वी आईवरच अवलंबून असतं. आजुबाजूला बोलल्या जाणार्‍या मातृभाषेतील (म्हणजे आई बोलणार्‍या किंवा आईशी बोलल्या जाणार्‍या) शब्दांचा प्रभाव गर्भावर पडत राहतो. जन्मल्यावर तर बाळाला जेवू घालताना, आंघोळ घालताना अगदी झोपवताना आई आपल्या बाळावर काऊचिऊच्या गोष्टी, गाणी, अंगाई या सार्‍यातून मातृभाषेच्या माध्यमातूनच आई आपल्या नवजात बाळाशी संवाद ठेवत असते. साहजिकच तिची भाषा ही मुलाची भाषा बनते. मातृभाषा!

आपल्या गोव्यात दुर्दैवानं या मातृभाषेबद्दलच अनावश्यक संघर्ष झाला. जिथे देवकीकृष्णाचं मंदिर आहे, तिथं कृष्णाच्या देवकी अन् यशोदा या दोन मातांप्रमाणे कोंकणी आणि मराठी दोन्ही भाषा सुखानं नांदायला हरकत नव्हती. याचा परिणाम म्हणून इंग्रजी भाषा अगदी प्राथमिक स्तरापासून शिक्षणाचं माध्यम बनली. त्यामुळे मुलांची- विशेषतः ग्रामीण भागातील, अक्षरशः घुसमट सुरू झाली. परिणाम असा झाला की मुलांना कोणतीही एक भाषा चांगल्या रीतीनं आत्मसात करता येत नाही. शिक्षण म्हणजे परीक्षा (एज्युकेशन मीन्स एक्झामिनेशन) असं समीकरण झालं. शिकवणं म्हणजे प्रश्‍नोत्तरं लिहून देणं नि अभ्यास म्हणजे ती प्रश्‍नोत्तरं पाठ करणं.
मातृभाषेतून शिक्षण घेणं हा आनंदाचा अनुभव असतो. कारण वर्गात शिक्षक बोलतो ते तरी समजतं. पाठ्यपुस्तकातलं वाचलेलं समजतं. जे कळलंय नि लक्षात राहिलंय ते लिहायलाही बर्‍यापैकी जमतं. इंग्रजीतून बहुसंख्य मुलांना यापैकी काहीही जमत नाही. अर्थात् हे झालं शिक्षणाबद्दल. पण आजकाल अन्न- वस्त्र- निवारा या मूलभूत गरजांइतकंच शिक्षणही गरजेचं झालंय. तसे कायदेकानूनही केले गेलेयत. पण यामुळे परिस्थितीत विशेष बदल झालाय असं दिसून येत नाही. असो.

मराठीत एक म्हण आहे- ‘माय मरो पण मावशी जगो.’ यात आई नसेल तर आईची बहीण म्हणजे मावशी तरी असायला हवी. म्हणजे लहानपणी मुलांचं पालनपोषण, संगोपन नीट केलं जाईल. आपल्या देशात अनेक भाषा आहेत. त्यांना प्राकृत भाषा म्हणतात कारण त्यांचं मूळ संस्कृत भाषेत आहे. म्हणजे एका अर्थानं संस्कृत ही आई आहे तर इतर भाषा तिच्या कन्या आहेत, म्हणजे एकमेकांच्या बहिणी आहेत. म्हणजे आपल्याकडे कोकणी आई असेल तर मराठी मावशी असायला हरकत नाही. पण प्रत्यक्षात मातृभाषा (मदरटंग) दुरावली आणि दुसर्‍या संस्कृतीतली मावशीभाषा (आंटीटंग) लादली गेली. हा विचार गंमतीचा वाटला तरी विचार करण्यासारखा आहे. या संदर्भात एका लेखाचा उल्लेख करायला हरकत नाही. महाराष्ट्रातील प्रतिष्ठित वर्तमानपत्रात हा लेख मातृभाषेच्या संबंधात आला होता. त्याचं नाव होतं- ‘मराठी असे आमुची ाूबोली’ मायबोलीतला ‘माय्’ हा ‘माझी’ या अर्थानं इंग्रजीत ‘माय्’ शब्द येतो तसा लिहिला होता. यात शुद्ध भाषेचा अभाव दाखवण्याचा प्रयत्न होता.

आपल्याकडे सर्व राज्यात त्या त्या राज्याची भाषा ही मुलांची मातृभाषा समजली तर काश्मिरातील पुश्तू भाषेपासून तामीळनाडूतील तमीळ भाषेपर्यंत आणि गुजरातीपासून बांगला भाषेपर्यंत सार्‍या भाषा भरपूर इंग्रजी शब्दांचा वापर करून बोलल्या जातात. ही प्रक्रिया पन्नास वर्षांपासून चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण पु. ल. देशपांडेंनी आपल्या ‘बटाट्याची चाळ- असा मी, असा मी’ या काळात असे संवाद वापरलेयत – ‘जरा वॉश घेऊन फ्रेश होऊन येते’.
आता तर आपलं जवळजवळ एकही वाक्य इंग्रजी (क्वचित् हिंदी) शब्द वापरल्याशिवाय पूर्ण होत नाही. याला कारण आपली मातृभाषेविषयीची बेफिकिर वृत्ती आहे. कारण इंग्रजी बोलताना आपण इतर भाषेतले शब्द वापरत नाही कारण आपण सावध असतो. मग मातृभाषेला बोलताना अशी बेदरकार बेसावध वृत्ती कशाला?
सध्याच्या यंत्रयुगात व्यवहारातल्या अनेक शब्दांना मातृभाषेत प्रतिशब्द मिळत नाहीत अन् मिळाले तर ते मुद्दाम बनवल्यामुळे अतिशय अवघड बनून जातात. उदा. इंजिनियरसाठी अभियांत्रिक, आर्किटेक्ट – स्थापत्यविशारद, अगदी डॉक्टरसाठी वैद्य काहीतरीच वाटतं आणि नर्ससाठी परिचारिका. या संदर्भात एक पन्नास वर्षापूर्वीचा प्रसंग बोलका आहे. आम्ही काही मंडळी सत्तरी तालुक्यातील वाळपईच्या पलीकडे असलेल्या खेड्यात बससाठी उभे होतो. पाच दशकांपूर्वीचा काळ डोळ्यासमोर आला. त्यावेळी ‘मिनीबस’ नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता. मोजक्याच बसेस सुदूर भागात यायच्या. खूप वेळ थांबावं लागे. आमच्या बाजूला एक गवळी दूध घेऊन दूधसंकलन केंद्राकडे निघाला होता. त्याच्याशी झालेल्या संभाषणाचा सारांश असा होता. आमच्या अनेक प्रश्‍नांना त्यानं दिलेली उत्तरं- सोसायटीत निघालोय. हे दुधाचे कॅन घेऊन. तिथं दूध घेण्यापूर्वी दुधातलं फ्याट (फॅट्) मोजतात. त्यासाठी डिग्री लावतात. शेतीसाठी विहीरीला पंप लावला होता. त्याचा पिस्टन मोडलाय. तो रिपेअर करायला पाहिजे. त्यासाठी मेकॅनिकला बोलवायला चाललोय.
या संभाषणात किती इंग्रजी शब्द आलेयत ते पाहिलं तर आज आश्चर्य वाटणार नाही. पण असे शब्द यंत्रांबरोबर अपरिहार्यपणे येतात नि ते वापरण्यात मातृभाषा भ्रष्ट किंवा प्रदूषित होत नाही.

एकदा घेतलेली नवी गाडी दाखवायला मित्र आला होता. बरोबर त्याचा चार वर्षांचा शिशुवर्गातला मुलगा होता. ‘इंग्लिश मिडियम’मध्ये शिकत होता. गाडी सुरु झाल्यावर तो म्हणाला, ‘आपण लॉंग ड्राइव्हला जाऊ या.’ सहज त्याला म्हटलं फटाफट दहा इंग्रजी शब्द सांग. त्यानं धडाधड शब्द सांगायला सुरवात केलीसुद्धा- कार, इंजिन, पेट्रोल, टायर, रोड, स्टिअरिंग, सीट्‌स, बेल्ट, ग्लास… तो थांबेचना तेव्हा आम्हीच ब्रेक लावला. त्यावेळी त्यानं एका श्‍वासात क्लच नि ऍक्सिलेटर सांगूनसुद्धा टाकलं. – आता याला पर्यायी शब्द कोण शोधणार, किती शोधणार यापेक्षा का शोधणार हे महत्त्वाचं आहे.

कोणत्याही भाषेचं महत्त्वाचं कार्य असतं- विचार, कल्पना, भावना यांचं आदानप्रदान. यादृष्टीनं मातृभाषेला पर्याय नाही. शिक्षणात जी मूलभूत उद्दिष्टं ठरवली जातात तीच पुढे जीवनभर उपयोगी पडतात. ही उद्दिष्टं साध्य होण्यासाठी सर्वांत प्रभावी माध्यम असते मातृभाषा. याबद्दल कुणाच्याही मनात संशय नाही. तरीही मातृभाषेतून शिक्षण दिलं जात नाही यापेक्षा घेतलं जात नाही. या उद्दिष्टांचा मातृभाषेच्या संदर्भात विचार करु या.
* माहिती (ज्ञान) ः मातृभाषेतून दिली- घेतली जाणारी माहिती चांगली समजते नि स्मृतीत साठवली जाते. गूगल, विकिपिडिया यावरही आता अशी माहिती उपलब्ध करून दिली जाते.
* आकलन ः नुसती माहिती असून उपयोग नसतो. तिचा अर्थ कळणं महत्त्वाचं असतं. असं आकलन अर्थातच मातृभाषेतून सर्वांत सहज व प्रभावीपणे होतं.
* उपयोजन ः समजलेल्या माहितीची नुसती मेंदूत साठवण करून उपयोग नसतो. तिचा जीवनातील निरनिराळ्या परिस्थितीत नि प्रसंगात उपयोग करणं आवश्यक असतं.
* कौशल्यं ः उपयोजनातील कौशल्य तर अत्यावश्यक असतं. पण भाषेची जी मूलभूत कौशल्यं (बेसिक स्किल्स) असतात- श्रवण, भाषण (संभाषण), वाचन नि लेखन. ही निश्‍चितपणे मातृभाषेतूनच चांगली साध्य होतात. दुर्दैवानं हे घडत नाही. कारण इंग्रजी माध्यम.
* अभिव्यक्ती (एक्स्प्रेशन) ः मातृभाषा हेच नैसर्गिक, उत्स्फूर्त अभिव्यक्तीचं म्हणजे स्वतःचे विचार, कल्पना, भावना व्यक्त करण्याचं साधन किंवा माध्यम आहे.
* अभिरुची (इंटरेस्ट) ः आज मुलांना अभ्यासात, स्वतंत्र वाचन- लेखनात गोडी उरलेली नाही याचं सर्वांत महत्त्वाचं कारण शिक्षणातून मातृभाषेचं हद्दपार होणं.
* अभिवृत्ती (ऍटिट्यूड) ः जीवनातील संबंधांकडे, आजुबाजूला घडणार्‍या घटनांकडे पाहण्याची विधायक, सकारात्मक वृत्ती मातृभाषेतून चांगली विकसित होते.

* रसग्रहण (ऍप्रिशिएशन) ः या सर्वांचा परिणाम म्हणून आपल्याला जीवनातील साहित्यातील चांगल्या गोष्टींचा (सत्यं शिवं सुंदरम्‌चा) रसास्वाद घेताच येत नाही. म्हणून शिक्षण नि जीवन बर्‍यापैकी निरस, रुक्ष, भावनाहीन बनून गेलंय. भावना, त्यांचा आविष्कार, त्यांचा रसिकतेनं आस्वाद या माणूस म्हणून महत्त्वाच्या गोष्टी अस्तंगत होऊ लागल्याहेत. ही चिंतेची बाब आहे.

मातृभाषेच्या अभावी जीवनातील एकूणच ऊर्जा, ऊर्मी, उमेद, उल्हास, उत्साह, उत्स्फूर्तता या सार्‍याला आपण मुकत चाललो आहोत. यंत्रमानवाचं (रोबो किंवा त्ह्युमनॉइड) जीवनसुद्धा भावपूर्ण कसं बनवता येईल यावर यशस्वी प्रयोग होत आहेत. या संदर्भात अलीकडे बनवलेली सोफिया ही यंत्रमानव सर्वांच्या नजरेत भरुन राहिलेली आहे. तिला सौदी अरेबिया या देशानं आपलं नागरिकत्व (सिटिझनशिप)सुद्धा दिलं आहे. अर्थात सोफियानंतरही अनेक यंत्रमानव अधिक प्रभावीपणे विविध कार्यं करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आपण मानवयंत्र (ह्यूमन मशीन्स) बनत चाललो आहोत ही चिंतेचीच नव्हे तर धोक्याची गोष्ट बनतेय.
मातृभाषा हे ही निर्जीव, मृतवत बनणारी मानवी स्थिती पुन्हा संजीवित करण्याचं अमृत आहे. शुक्राचार्यांनी सिद्ध केलेला संजीवनी मंत्र आहे. तशीच लक्ष्मणाला पुनर्जीवित करण्यासाठी हनुमंतानं आणलेली संजीवनी (वनस्पती)ही आहे.

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन २१ फेब्रुवारीला साजरा करण्याची कल्पना युनेस्को, युएन्‌ओ या जागतिक संस्थांनी छोट्या बांगला देशच्या आग्रहावरून स्वीकारली. सर्वत्र एक दिवस एखाद्या विषया(थीम)साठी साजरा करणं हे प्रतीकात्मक आहे. या दिवशी जगभर होणारे कार्यक्रम हे साजरीकरणाच्या नि सादरीकरणाच्या (सेलेब्रेशन अँड् प्रेझेन्टेशन) या सध्याच्या फॅशनप्रमाणे, प्रवाहानुसार ठीक आहेत. पण पुरेसे प्रभावी निश्चितच नाहीत. बांगला देशातील जनतेनं लादलेली उर्दू भाषा झुगारुन देऊन आपल्या जमीनीत नि संस्कृतीत मुळं असलेली बांगला भाषा स्वीकारली त्याचा वार्षिक उत्सव म्हणजे आंतरराष्ट्रीय मातृभाषा (मदर लँग्वेज) दिवस.
आपणही एक व्रत म्हणून घरात, दैनंदिन जीवन व्यवहारात, काम करतो त्या संस्थात अधिकाधिक शक्य असेल तेवढा मातृभाषेचा वापर केलाच पाहिजे. मुलांना शिक्षण जरी इंग्रजीतून मिळत असेल तरी मातृभाषेपासून त्यांची नाळ तुटता कामा नये.
ज्ञानेश्‍वर जे म्हणतात-
माझा मर्‍हाटाचि (मराठी) बोलु कौतुके, अमृतातें पैजा जिंके ॥
ते फक्त मराठीबद्दलच नाही तर सर्व मातृभाषांबद्दल आहे.
* हल्लीची घोषणा लोकप्रिय आहे- केवळ माणूस नावाचा प्राणी (ह्यूमन बीइंग) असून उपयोगाचं नाही. माणुसकी असलेला प्राणी होणं (बीइंग् ह्यूमन्) आवश्यक आहे. असं जे सर्व समान माध्यमातून सतत सांगितलं जातं त्यासाठी मातृभाषा हे खूपच प्रभावी माध्यम आहे. ‘भूतां परस्परें पडो, मैत्र जीवांचे’ हे पसायदान प्रत्यक्षात अनुभवायचं असेल किंवा ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु’ हे ऋषीमुनींचं स्वप्न सत्यात साकारायचं असेल तर मातृभाषेचा अधिकाधिक वापर करण्याचा संकल्प करुयाच. पण तो पूर्ण करण्यासाठी संघटित नि प्रामाणिक प्रयत्न करुया. आजच्या विज्ञान- तंत्रज्ञान युगात हे शक्य आहे का.. असा पराभूत, नकारात्मक विचार करण्याऐवजी तो प्रत्यक्षात उतरवण्याची प्रतिज्ञा करुया. तरंच मातृभाषेचं ऋण अंशतः फिटेल नि मातृभाषा दिन साजरा केल्याचं पुण्य नि सार्थक समाधान लाभेल, बघा विचार करून…