मातीचा रस्ता

0
535

– संदीप मणेरीकर

माझ्या गावात आज चकचकीत नाही, पण एखाद्या वृद्ध माणसाच्या चेहर्‍यावर दाढीचे खुंट वाढावेत त्याप्रमाणे असलेला खडबडीत असा डांबरी रस्ता राजकीय वरदहस्ताने निर्माण झालेला आहे. त्या रस्त्यात खड्ड्यांचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे. तरीसुद्धा या रस्त्यानं जाणार्‍या आणि येणार्‍या वाहनांची संख्या आज मोठ्या संख्येने वाढलेली आहे. पूर्वी या रस्त्यावरून आम्ही ज्या सहजतेने ङ्गिरत होतो त्या सहजतेनं आज रस्त्यावरून रमत गमत जाता येत नाही. एवढी वाहनांच्या संख्येत वाढ झालेली आहे. 

आज माझ्या या गावात सावंतवाडी, पणजी तसंच दोडामार्ग या ठिकाणाहून बसेस येतात. पणजी-गोव्यातून एक कदंब बस तर चक्क वस्तीला येते. आज किमान या रस्त्यावरून जवळ जवळ दिवसाकाठी आठ-दहा बसेस तरी ये-जा करत असतात. येथील दोन – तीन खेड्यांतील लोकांची त्यामुळे ङ्गार मोठी सोय झालेली आहे. सावंतवाडी किंवा गोव्यात जाण्यासाठी सहज पर्याय उपलब्ध झालेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणाहून कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणी जाण्यासाठीही विविध पर्याय उपलब्ध झालेले आहे. अन्यथा यापूर्वी बेळगाव किंवा कोल्हापूरला जाणं म्हणजे सावंतवाडीचा तीन तासांचा प्रवास त्यानंतर पाच तासांचा कोल्हापूरचा असा एकूण आठ तासांचा प्रवास करावा लागत असे. मात्र, रामघाट म्हणजेच तिळारी घाट रस्ता झाल्यामुळे केवळ पाच तासांच्या अंतरावर कोल्हापूर जवळ आलेलं आहे. तीच कथा बेळगावची आहे. बेळगाव तर अगदीच हाकेच्या अंतरावर आलेलं आहे. केवळ अडीच तासांच्या प्रवासाने बेळगाव गाठता येतं.
ही सारी किमया केवळ एका रस्त्यानं केलेली आहे. रस्ता झाला की विकास होतो आणि मग आपोआपच जग जवळ येऊ लागतं. माणसं एकमेकांना लवकर भेटतात. सारी विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची किमया आहे. रस्त्यानं किती विकास केलेला असतो हे आपल्याला माहित नसतं. आपल्या ते लक्षातही येत नसतं. आज रस्त्यांचं डांबरीकरण होणं हे ङ्गार मोठं कार्य नव्हे किंवा विकास नव्हे. हॉटमिक्स, कॉंक्रिटीकरण असे विविध प्रकार आहेत. माझ्या गावात मात्र केवळ डांबरीकरण झालेला रस्ताही ङ्गार मोठा वाटतो. या रस्त्यावरून पूर्वी केवळ लाकडांचे ट्रक, दिवसातून एक एसटी बस आणि अनेक बैलगाड्या धावायच्या त्या रस्त्यावरून आज आलिशान नाहीत पण मारुती, ओमनी, स्वीफ्ट अशा चार चाकी गाड्या धावत आहेत. ही सारी किमया केवळ रस्त्यानं केलेली नाही का?
केवळ रस्ता झाला की कितीतरी बदल त्या त्या गावात वा शहरात होत असतात. विकासाची गंगाच जणू येऊ लागते. कितीतरी गोष्टी आपोआपच येऊन ठेपतात. रस्ता झाला की जमिनींना भाव चढतो. दुकानं येतात. हॉटेल्स येतात. नाना तर्‍हेचे मॉल्स येऊ लागतात. मोबाइल टॉवर येतात, सोबत नाना मोबाइल येतात. जग आपोआपच जवळ येऊ लागतं.
माझ्या गावात जरी सध्या डांबरी रस्ता झालेला असला आणि एकंदरीतच सगळ्याच शहरांकडे जाणारं अंतर कमी झालेलं असलं तरी मातीच्या रस्त्याची मजा या डांबरी रस्त्याला नाही. मातीचा रस्ता असताना सावंतवाडी किंवा अगदी कोनाळकट्टा ह्या तीन किमी अंतरावर असलेल्या गावातील डांबरी रस्ता पाहून आमच्या गावात कधी होणार असा डांबरी रस्ता हा प्रश्‍न त्यावेळी मनाला पडत असे. असा डांबरी रस्ता आमच्या गावात येणार, मग अनेक प्रकारच्या गाड्या येणार, विविध दुकानं येणार अशा बालसुलभ कल्पना मनात येत होत्या. रस्ता हे दळणवळणाचं महत्त्वाचं साधन आहे, हे नंतर कळू लागलं.
मात्र आता जाणवू लागलंय की, मातीचा रस्ता हा रक्ताशी नातं सांगणारा असतो. त्यालाही भावना असतात. त्यालाही संवेदना असतात. आम्ही शाळेत जाताना माझ्या भावानं त्या रस्त्यावर झाडाचं एक पान घेऊन त्यावर एक दगड ठेवून ते पान धुळीतून वाकडं तिकडं साप जसा पळतो तद्वत रस्त्याच्या एका टोकाकडून दुसर्‍या टोकाला ओढलं. आणि नंतर मी पाहिलं तर रस्त्यावर खरोखरच साप गेल्याप्रमाणे एक जाडसा पट्टा निर्माण झाला होता. कोणीतरी सहज इथून साप गेलाय असं म्हणून गेला असता, इतका हुबेहूब तो पट्टा आलेला होता. या रस्त्यावरून सायकल असो, चार चाकी गाडी असो, ट्रक असो वा पायी चालत जाणार्‍या कोणीही व्यक्ती असोत. तसंच गाईगुरांच्या पाऊलखुणा. त्या त्या व्यक्तीच्या, वस्तूच्या पाऊलखुणा उमटत जातात. मातीच्या रस्त्यावरून एखादी गाडी गेली की ती धुरळा उडवत जाते. हा धुरळा म्हणजे, ती गाडी आपल्या अंगावरून, आपल्या देहाचा वापर करून गाडी गेली, आपला काहीतरी उपयोग झाला ही भावना व्यक्त करणार्‍या त्या रस्त्याच्या भावना असतात, असं मला वाटतं. त्यामुळेच मातीचा रस्ता हा मला सजीव जिवंतपणाचं प्रतीक वाटतं. आम्ही ज्यावेळी त्या रस्त्यानं शाळेतून ये-जा करायचो त्यावेळी त्या रस्त्यावरच्या सायकलच्या खुणांवरून कोणाची सायकल गेलीय आता ते ओळखायचो. अर्थात बर्‍याचदा अंदाज चुकायचे. कारण बर्‍याच सायकलच्या टायरांची नक्षी सारखीच असायची.
शाळेतून ये-जा करताना बर्‍याचवेळा लाकूड वाहून नेणारे ट्रक या रस्त्याने जायचे-यायचे. ते ट्रक आले की, अंगावर सगळी धूळ उडायची. अंगावरचे पांढरे कपडे तांबडेलाल व्हायचे. केस तांबडे व्हायचे. सगळं अंग अंग माखून जायचं. मात्र रस्त्याच्या त्या भावना आज कळू लागलेल्या आहेत. तो रस्ता त्यावेळी आम्हांलाही आपलंसं करायचा. ह्या रस्त्यानं आजूबाजूला, शेजारी, रस्त्यालगत असलेल्या सर्व झाडाझुडपांनाही आपला रंग ङ्गासून आपलंसं केलेलं होतं. मातीच्या रस्त्याचा हा एक गुण घेण्यासारखा आहे. आपल्यासोबत जे जे आहे, त्या सगळ्यांना आपलंसं करणं. आपण कोणाच्या तरी उपयोगी पडलो याचा आनंद वाटणं, हे खरं तर या रस्त्याकडून आम्ही शिकलं पाहिजे.
पावसात या रस्त्यावरून खळखळत जाणारं तांबडं लाल पाणी पाहून मन कसं आनंदी व्हायचं. ते पाणी खरं तर रस्त्याची मातीही वाहून न्यायचं, त्यामुळे आम्ही या वाहत्या पाण्यात मध्ये मध्ये झाडांच्या डहाळ्या टाकायचो. त्यामुळे त्या डहाळ्यांना अडकून रस्त्याची धूप थांबत असे. या रस्त्यानं येणारे जाणारे गुराखी, सारे लोक अशाच डहाळ्या टाकायचे. त्यामुळे रस्त्याची धूप थांबत असे. या रस्त्यावरून सकाळी आम्ही शाळेत जाताना गुराखी भेटत असत. अनेक गुरांचे कळप दिसत. त्या त्या कळपातील बैल, गाईंची आम्हांला ओळख होत असे. या गुरांच्या पायांचे ठसेही रस्त्यावर उमटत. या रस्त्यावरून बैलगाड्याही ‘छुन्नक छुन्नक’ असा घुंगरांचा आवाज करीत धावत.
आज या रस्त्यावर डांबर आलेलं आहे. गावचा विकास होण्याची चिन्हं आहेत. आता येथील जमिनींच्या किमती वाढतील. गगनाला भिडतील. रस्ता झाला की गाड्या येतात. विविध हॉटेल्स येतात. मोठमोठ्या इमारती येतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान येतं. तंत्रज्ञानाच्या विविध गोष्टी येतात. मात्र त्यामुळे गावचं गावपण हरवतं. मातीच्या रस्त्याचं आपलेपण डांबरी रस्त्याला नाही. तुम्ही त्या रस्त्यावरून कितीही वेळा चला पण डांबरी रस्ता स्थितप्रज्ञच असतो. त्याच्यावर कसल्याच भावनांचा परिणाम होत नाही. ना कसल्या खुणा त्याच्यावर येत ना कसली जाणीव. केवळ सुस्त राजकारण्यांसारखा तो पडून रहातो. कितीही वाहनं त्याच्यावरून गेली तरी त्याच्यावर कसला परिणाम होत नाही. मुळात भावनाच नष्ट झालेल्या असतात आणि नष्ट झालेल्या भावना घेऊन गावात शिरलेला हा रस्ता गावातील गावपण हरवून टाकतो. आज गावातल्या लोकांचा ओढा जरी शहराकडे असला तरी शहरी लोक खेड्याकडे आशेने पहात आहेत. त्यामुळे खेडी ही खेडीच रहायला हवीत. डांबरी रस्ता गावात जायला हवा. त्याचा विकास व्हायला हवा; पण त्यांचं ते ग्राम्यपण टिकवूनच!
……………