मातीचा ढिगारा कोसळून कामगाराचा मृत्यू

0
21

>> रायबंदरमध्ये स्मार्ट सिटीच्या कामावेळी घडली घटना

रायबंदर येथे पणजी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मलनिस्सारण वाहिनी घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या चराच्या बाजूचा मातीचा ढिगारा काल दोघा कामगारांच्या अंगावर पडला. त्यात या दौघांपैकी एका कामगाराचे निधन झाले, तर दुसरा कामगार जखमी झाला. ही दुर्घटना काल सकाळी आठच्या सुमारास घडली. अंगद कुमार पंडित (28 वर्षे, रा. बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे.

रायबंदर परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत मलनिस्सारण वाहिनी घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मलनिस्सारण वाहिनी घालण्यासाठी रस्त्यावर अंदाजे तीन ते चार फूट खोल चर खोदण्यात येतो. त्या चरामध्ये मलनिस्सारण वाहिनी घातल्यानंतर बुजविण्यात येतो. पानवेल रायबंदर येथे मलनिस्सारण वाहिनी घालण्यासाठी रस्त्यावर खोदकाम करण्यात आले होते. सदर ठिकाणी मलनिस्सारण वाहिनी घालण्याचे काम दोघे कामगार करीत होते. मलनिस्सारण वाहिनी घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या चरातील माती बाजूला टाकण्यात आली होती. त्याच्या दाबामुळे चराच्या एका बाजूची भिंत कोसळली. त्यामुळे चरामध्ये खाली काम करणारे दोघे कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडले. एका कामगाराला तातडीने बाहेर काढण्यात आले, तर दुसऱ्या कामगाराला बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दल, पोलीस पथकाने बरेच परिश्रम घ्यावे लागले. त्या कामगाराला गंभीर अवस्थेत बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सदर कामगार मृत झाल्याचे घोषित केले. ही दुर्घटना निष्काळजीपणामुळे घडलेली असून, या प्रकरणी जुने गोवा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पणजी शहरात मलनिस्सारण वाहिनी घालण्याच्या कामाच्या वेळी अनेक वाहने रुतून पडण्याचे प्रकार घडलेले होते. तथापि, जीवितहानीची घटना घडली नव्हती. आता प्रथमच या कामांदरम्यान जीवितहानीची घटना घडली आहे.