माता न तू वैरिणी

0
41

कांदोळीतील सर्व्हीस अपार्टमेंटमध्ये आपल्या चार वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या करून त्याच्या मृतदेहासह बंगळुरूला निघालेल्या महिलेच्या तत्पूर्वीच मुसक्या आवळून गोवा पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेचे जे दर्शन घडवले, ते निश्चितपणे कौतुकास्पद आहे. एखाद्या घटनेमध्ये पोलिसांकडून जेव्हा नीट तपासकाम होत नाही, तेव्हा त्यावर आपण टीकेची झोड उठवत असतो. वास्कोतील दुहेरी खून प्रकरणाला आत्महत्येचा रंग दिला गेला तेव्हा, किंवा बाणस्तारी अपघातात लांडीलबाडी करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा पोलीस आपल्या कर्तव्यात कसूर करताना आणि आपल्या वर्दीशी बेईमान होताना दिसले, परंतु कांदोळीतील प्रस्तुत हत्या प्रकरणाचा त्या तत्परतेने आणि अगदी योग्य दिशेने तपास झाला, त्यामुळेच एका एआय कंपनीची सीईओ असलेल्या ह्या हायप्रोफाईल महिलेच्या गुन्ह्याचा वेळीच आणि पुराव्यानिशी पर्दाफाश होऊ शकला. कांदोळीतील सर्व्हीस अपार्टमेंटमधून तिने चेकआऊट केल्यानंतर त्या खोलीत रक्ताचे डाग आढळल्याने ती बाब हॉटेल व्यवस्थापनाच्या लक्षात आणून देणारा तेथील कर्मचारी, आपल्या हॉटेलची बदनामी होईल याची चिंता न करता ती माहिती पोलिसांना देणारे हॉटेलचे व्यवस्थापन, तात्काळ हालचाल करून ज्या टॅक्सीने ही महिला बंगळूरकडे निघाली आहे, त्या चालकामार्फत आधी तिच्याशी संपर्क साधून आणि तिने दिलेली माहिती ही भूलथाप आहे याची खातरजमा करून नंतर तिला नकळत त्या चालकाला टॅक्सी जवळच्या पोलीस स्थानकात वळवण्यास सांगणारे, तेथील पोलीस स्थानकाला सतर्क करून वाहनाची झडती घ्यायला सांगणारे कळंगुटचे पोलीस निरीक्षक, पोलिसांच्या सूचनेबरहुकूम टॅक्सी चित्रदुर्ग जिल्ह्यातील अयमंगला पोलीस स्थानकात घेऊन जाणारा टॅक्सीचालक ह्या सर्वांची कामगिरी प्रत्येकाच्या सेवातत्परतेचे आणि परस्पर समन्वयाचे दर्शन घडवणारी आणि म्हणूनच प्रशंसनीय आहे. आपल्या मुलाची हत्या करून गोव्यातून बिनबोभाट पलायन करू पाहणारी ही महिला आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील एका प्रतिष्ठित कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये उच्चशिक्षित आहे. परंतु तिच्यापेक्षा इतरांची मानवी बुद्धिमत्ता यावेळी अधिक जागरूक ठरली, त्यामुळेच ह्या प्रकरणाचा वेळीच पर्दाफाश होऊ शकला. आपले आपल्या पतीशी वैवाहिक संबंध बिघडले होते, घटस्फोटासंदर्भात न्यायालयाने दिलेला निवाडा आपल्याला मान्य नव्हता, म्हणून आपण मुलाची हत्या केल्याचा जबाब ह्या महिलेने पोलिसांना दिला आहे. सध्या इंडोनिशियात असलेला तिचा पती भारतात परतल्यानंतरच ह्या संबंधीची अधिक माहिती कळू शकेल, परंतु ह्या उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ तरुण महिलेने एखाद्या सराईत गुन्हेगाराला लाजवील अशा शिताफीने आपल्या स्वतःच्या मुलाची जी निर्घृण आणि निर्दय हत्या केली ते खरोखर घृणास्पद आहे. ही महिला उच्चशिक्षित आहे. हॉवर्ड आणि बर्कले विद्यापीठांतील शिक्षण तिच्या नावे आहे. स्वतःला ती एआय एथिक्समधील तज्ज्ञ म्हणवते. डेटा सायन्टिस्ट असल्याचे सांगते. परंतु तिच्यातील माणुसकी कुठे लोपली हेही आता तिने सांगायला हवे. चार वर्षांच्या निष्पाप कोवळ्या जिवाची हत्या करणाऱ्या ह्या महिलेला तिच्या घृणास्पद कृत्याचा कठोर धडा मिळाला पाहिजे. सुरवातीच्या तपासकामात पोलिसांनी उत्तम कामगिरी केली असली, तरी ह्या महिलेचे पद व स्थान लक्षात घेता, पैशाच्या जोरावर न्यायालयात निष्णात वकील उतरवून ह्या प्रकरणातून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केल्याशिवाय ती राहणार नाही. त्यामुळे भक्कमपणे हे प्रकरण न्यायालयात उभे राहील हे पाहणे ही आता गोवा पोलिसांची जबाबदारी आहे. महिला मुलासह हॉटेलमध्ये प्रवेश करताना आणि मुलाविना बाहेर पडतानाची सीसीटीव्ही फुटेज तर उपलब्ध असेलच. परंतु ह्या प्रकरणात ह्या घटनेशी संबंधित व्यक्तींच्या साक्षीपुराव्यांस बरेच महत्त्व असेल. खोलीत रक्त सापडल्याचे पाहणारा हॉटेल कर्मचारी, पोलिसांना कळवणारा पर्यवेक्षक, टॅक्सीचालक ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या जबान्या योग्यप्रकारे नोंदवून घेऊन न्यायालयात हा खटला उभा करताना कोठेही ह्या नराधम महिलेला संशयाचा फायदा मिळू नये हे पाहिले जावे. अशा घटना घडतात तेव्हा वर्तमानपत्रांतून सगळी तथ्ये समोर येतात, परंतु प्रत्यक्षात न्यायालयात जेव्हा प्रकरण उभे राहते, तेव्हा साक्षीपुरावे बळकट ठरतातच असे नाही. ह्या प्रकरणात तरी हे होऊ नये. त्या चार वर्षांच्या चिमुकल्या जिवाचा बळी घेणाऱ्या ह्या त्याच्या मातेला, नव्हे वैरिणीला कठोरातील कठोर शिक्षेपर्यंत पोहोचवावे. ह्या प्रकरणाचा छडा लावणारी पोलीस यंत्रणा हे आव्हानही समर्थपणे पेलेल अशी आशा करूया.