माणूस आणि मांजर ः एक भावानुबंध

0
297
  • चित्रा क्षीरसागर

 

आपण म्हणतो ही मुकी जनावरं… त्यांना काय कळतंय?  त्यांना काय भावना असतात काय? .. पण तसं नसतं, हे या मांजरांनी मला शिकवलं. खरंच माणसाला असतात तशा प्रेम आणि रागाच्या भावना असतात तर..!

 

आमच्या घरात मांजरांच्या सहा पिढ्या नांदत आहेत. कितीतरी मांजरे जन्माला येतात, वाढतात आणि एक दिवस कुठेतरी निघून जातात… तीही लळा लावून. त्यांच्यात जीव गुंतलेला असतो. अशी अचानक ती निघून गेल्यावर जिवाला खूप लागते. मन खिन्न होते.

आमचा असाच एक बोका. भुरकट  पांढर्‍या रंगाचा. लळा लावणारा. हट्टाने दूध मागायचा. बिस्किटं मागायचा. पायात घुटमळायचा. चपाती कधीमधी खायचा पण ती अगदी तव्यावरची गरम गरम आणि साजूक तूप लावलेली हवी असायची. मलाही त्याचे हट्ट पुरवण्यात आनंद वाटायचा.

बोकाच तो. एका जागी थोडाच बसणार… खाऊन पिऊन झालं की, स्वारी ङ्गिरायला जायची. एके दिवशी सकाळी तो बाहेर पडला नेहमीप्रमाणे. तास दोन तासांनी तो घरी परत यायचा. त्या दिवशी दुपारी तो आलाच नाही. संध्याकाळी तरी येईलच असे वाटले व मी कामाला लागले. तो आलाच नाही. मग मात्र घालमेल सुरू झाली.

मी, माझे पती व मुले… सर्वत्र शोधाशोध सुरू केली. सगळीकडे पाहून आलो. आमच्या बिल्डिंगच्या परिसरात काही दुष्ट कुत्री आहेत. ती आमच्या मांजराच्या मागावरच असतात. अनेकदा कुत्र्यांनी आमच्या मांजरांची पिल्ले मारून टाकली आहेत. ही कुत्री खात नाही मांजरांना पण त्रास देऊन मारून  टाकतात. ती अशुभाची शंका मनात आली. तो दोन तीन दिवसांनी तरी परत येईल ही आशा होती. खूप वाईट वाटत होतं. अखेर तो आलाच नाही. म्हणतात ना दुःख विसरायला लावतो तोही काळच!

माझ्या मैत्रिणीचे एक दुकान आहे, भाजीचे. मी भाजी आणायला तिच्या दुकानाकडे जात असता एका घराच्या कंपाउंडवर एक भुरा बोका निवांत झोपलेला दिसला. मला आमच्या बोक्याची आठवण झाली. आमचाच असावा म्हणून मी जवळ गेले. तो आमचा नव्हता अनोळखी स्पर्शाने जनावरे दूर पळतात तसाच तो पळून गेला. एवढ्यात काय झालं. बोका का पळून घरात आला म्हणून समोरच्या घरातून एक बाई घावत आली. म्हणाली, ‘‘भाभी, ये हमारा बिल्ला है. आप क्या उसे ले जा रही है’’, तिच्या या प्रश्‍नावर मी दचकले. ती आंध्र प्रदेशातील असावी. कारण तिचं हिंदी काही सङ्गाईदार नव्हतं.

मी तिला म्हणाले, ‘‘हां यह आपकाही है. हमारे पास भी ऐसाही दिखनेवाला बिल्ला था. बचपनसे पाला था.  कुछ दिनोंसे वह लापता है’’. ती म्हणाली, ‘‘तुम्ही त्याला रागावला होता काय? त्यामुळे तो रुसून निघून गेला असेल. आमच्याकडेही एक मांजर होती. तिला पिल्लं झाली होती तीन चार. जरा मोठी झाली की ती सगळीकडे शी-शू करून घाण करू लागली. दिसला कपडा की केली घाण. एके दिवशी माझ्या नव्या कोर्‍या साडीवर त्या पिल्लांनी शी केली आणि शू देखील. मला खूप राग आला. चारी पिल्लं उचलली आणि दाराबाहेर टाकली. जरा रागानंच. आणि म्हणाले किती त्रास देतात ही तुझी पोरं. जा तू कुठेतरी यांना घेऊन.  तिच्यावर रागावल्याचं मी विसरून गेले. दरवाजा लावून घेतला. कामात गुंग झाले. अर्धा पाऊण तासाने दार उघडलं तर मांजरही नाही आणि पिल्लंही गायब. मी घाबरले. वाईट वाटलं. खूप शोधलं पण मांजर आणि पिल्लं गायब झाली ती परत आलीच नाहीत. त्यांना कुत्र्यांनी खाल्लं की काय ही शंका मलाही आली हो. की तिला कळालं की मी रागावले म्हणून…’’

आपण म्हणतो ही मुकी जनावरं… त्यांना काय कळतंय?  त्यांना काय भावना असतात काय? .. पण तसं नसतं, हे या मांजरांनी मला शिकवलं. खरंच माणसाला असतात तशा प्रेम आणि रागाच्या भावना असतात तर..!