माणसांचं जग- ५४ मातृभाषेवर प्रेम करणारा कायतान तिवो

0
136
  •  डॉ. जयंती नायक

एकदा कायतान एका कामानिमित्त मुंबईला गेला अन् कातारीनमांय तापानं आजारी पडली. तिच्या तिन्ही पोरांना आईच्या आजाराचं काही गांभीर्य नव्हतं. ते दिवसभर इथं-तिथं हुंदडण्यात दंग. मला कळताच आईच्या परवानगीने मी तिच्या घरी गेले. दोन दिवस तिची सेवा केली.

कायतान आमच्याच गावचा. आमच्या घरापासून एक फर्लांगाच्या अंतरावर त्याचं घर. माझे वडील अन् तो एकाच वयाचे. त्यांच्या लहानपणी जात-पात, सोवळं-ओवळं खूप होतं, त्यामुळे त्यांना बरोबर खेळायची वडीलधार्‍यांकडून मान्यता नव्हती. मग ते म्हणे चोरून खेळायचे. चोरून रानात चारं-चुन्नं वगैरे रानमेवा आणायला जायचे. काळ पुढे गेला. घरातील जाणती माणसे हे जग सोडून गेली. माझे वडील आणि कायतान तिवोच मग घरातील वडीलधारे बनले, तसं सोवळं-ओवळं बाजूला पडलं अन् दोघांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं सुरू झालं. मैत्री अधिक घट्ट बनली. इतकंच नव्हे तर दोघांच्या बायकांचीही गट्टी जमली.

कायतान तिवोला मुलगी नव्हती, त्याला तिन्हीही मुलगेच. त्यामुळे माझी त्यांना जास्त ओढ होती. मी काही केलं, परीक्षेत पहिला नंबर घेतला, एखादं चित्र काढलं की ते माझं भरभरून कौतुक करायचे. मला लहानपणापासून टापटिपीची सवय. माझ्या सार्‍या वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या असायच्या. याच्या उलट त्याचे मुलगे अन् माझे भाऊ. त्यांच्या पुस्तकांचा, खेळण्यांचा पसारा इथं-तिथं पसरलेला असायचा. अशावेळी ते त्यांना माझे उदाहरण द्यायचे.
कायतान तिवो कुठं फेस्ताला वगैरे गेला म्हणजे माझ्यासाठी नेलपॉलिश, केसांची क्लीप्स, बांगड्या अशा काहीतरी वस्तू आठवणीनं घेऊन यायचा. तो गेलेला नसेल, परंतु त्याची बायको कातारीनमांय गेलेली असली तरी तिला तो आणायला सांगायचा. त्यांच्या पाणवट्यावर बकुळीच्या छान फुलाचं झाड होतं. बहराच्या दिवसांत तो फुलं वेचून मुद्दाम मला आणून द्यायचा. घरामागच्या साखरआंब्याचे आंबे पिकू लागले म्हणजे कायातन आम्हाला एक वाटा आणून द्यायचाच. पण तो देताना त्यातले दोन तरी झाडपिके वेगळे काढून देत आईला म्हणायचा, ‘‘व्हुनी, हे मी बायसाठी मुद्दाम आणले आहेत हां, तिला दे ते!’’
त्याच्या मायाळू स्वभावामुळे मलासुद्धा त्याच्याविषयी खूप आपलेपणा वाटत होता. मी वडिलांची लाडकी होते त्यामुळे त्यांनी मला कधी दम दिला नाही, रागवले नाहीत, परंतु आई कित्येकदा रागवायची. ते जर कायतान तिवोला कळलं अथवा त्याच्या समोर कधी मला रागावली तर मग आईला त्याच्याकडून बरंच प्रवचन ऐकावं लागायचं. एप्रिल-मे महिन्यांत आमच्या घरी पाहुण्यांची वर्दळ असायची. आई एकटी घरात काम करणारी, त्यामुळे घरातील बारीकसारीक कामं माझ्या वाट्याला यायची. कायतान ते बघून हळहळत राहायचा. आपल्या बायकोला म्हणायचा, ‘‘हीं सोयरीं येतात आनी बायेला काम करावं लागतं!’’
एकदा कायतान एका कामानिमित्त मुंबईला गेला अन् कातारीनमांय तापानं आजारी पडली. तिच्या तिन्ही पोरांना आईच्या आजाराचं काही गांभीर्य नव्हतं. ते दिवसभर इथं-तिथं हुंदडण्यात दंग. मला कळताच आईच्या परवानगीने मी तिच्या घरी गेले. दोन दिवस तिची सेवा केली. तिला जेवण बनवून दिलं. मी त्यावेळी बारावीच्या वर्गात होते.
कायतान घरी आल्यावर त्याला ती गोष्ट कळली. त्याला एकदम गहिवरून आलं. घरी येऊन त्याने माझं कौतुक केलं. मला कितीदा तरी ‘थँक्यू बाये, थँक्यू बाये’ म्हटलं. एवढचं नाही, तो मिळेल त्यांना ती गोष्ट सांगत राहिला.

कायतान दिसायला उंच, गोरा अन् किडकिडीत होता. मला आठवतं तेव्हापासून तो कमरेत थोडासा वाकलेला. तसेच त्याचा एक हात पोटाशी नेलेला असायचा. पोट थोडं खपाटिला गेलेलं असायचं. त्याला बर्‍याच वर्षांपासून अल्सरचा त्रास होत होता, त्यामुळे तो अधूनमधून वेदनांनी कळवळत असायचा. त्यामुळेच तो चालताना थोडा ओणवून चालायचा.

कायतानचं कातारीनमांयवर खूप प्रेम होतं. त्यांचा म्हणे प्रेमविवाह. तो अन् मांय दोघं म्हणे त्यांच्या तरुणपणी मुंबईला एका गुजराथी शेटाच्या घरी नोकरीला होती. तो घरकामाचा गडी, तर ती मोलकरीण. तिथं या दोघाचं प्रेम जमलं. एक वर्षभर त्यांचं प्रेमप्रकरण चालू होतं. शेटाणी आईच्या ते लक्षात आलं. तिनं या दोघांना काजाराचा सल्ला दिला. मग दोघं मुंबई सोडून गोव्यात आली. काजार केलं. सुखानं-प्रेमानं राहू लागली. घरची शेती होती ती पिकवून गुजराण करायचे. यात भर म्हणून नशिबाने कायतानला एका खाणीवर वाहनचालकाची नोकरी मिळाली. त्याचं सोन्याहून पिवळं झालं.

माझ्या स्मृतिपटलावर कायतानची चीरआठवण राहण्यामागचं कारण म्हणजे, १९८५-८७ च्या काळात गोव्याच्या राजभाषा आंदोलन काळात त्याने मला दिलेला पाठिंबा. त्यावेळी मी कोकणीच्या बाजूने काम करीत होते. नवीनच कोकणी चळवळीत माझा प्रवेश झाला होता. केप्यात कोंकणीविरोधक खूप होते. ते काहीबाही बोलायचे, धमकी द्यायचे. माझे वडील मराठीवादी असल्याने त्यांच्याकडे येऊन माझी तक्रार करायचे. मग वडील चिडायचे. मला काही बोलायचे नाहीत, परंतु त्यांचा रुसवा मला समजायचा. अशावेळी कायतान माझी बाजू घ्यायचा. वडिलांना म्हणायचा, ‘‘आरे, तुझी मराठी तुला! आमची कोकणी आम्हाला!’’ १४ नोव्हेंबर १९८५ च्या महामेळाव्याला आमच्या गावातून लोक नेण्यासाठी आम्ही एक बैठक घेतली होती. ती बैठक आयोजित करण्यासाठी त्याने आम्हाला मदत केली. गावच्या, आपल्या बरोबरच्या, मिळेल त्याला तो बैठकीला अन् महामेळाव्याला बोलवत होता. एवढंच नव्हे गावच्या कपेलांत एका लादाईनच्या वेळी त्याने सायबीणमांयला साकडे पण घातले होते, अन् म्हणाला होता, ‘‘आमची बाय कोंकणीसाठी वावरते आहे, तिच्या कार्याला यश दे!’’
कायतान जाऊन आज वीस वर्षे झाली. आपल्या मागं कातारीनमांयने कुणाकडे, स्वतःच्या मुलांकडेसुद्धा हात पसरायला नको असं तो नेहमीच म्हणायचा. जसा म्हणायचा, तसेच त्याने केले. त्याने कातारीनमांयसाठी पैशांची बरीच पुंजी ठेवली.