कॉंग्रेस विधीमंडळातही पर्रीकरांचीच माणसे
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष पदावरून आपली उचलबांगडी करण्यासाठी पक्षातील नेत्यांकडे हातमिळवणी केल्याचा आरोप मावळते प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष जॉन फर्नांडिस यानी काल पत्रकार परिषदेत केला. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्या पत्नीच्या विरुद्ध झुगमोबोर जमीन प्रकरणातील खटलाही पर्रीकर यांनी मागे घेतल्याचे फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले. एवढेच नव्हे तर माजीमंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स प्रकरणी भाजपनेते सतीश धोंड यांच्या विरुद्ध असलेला खटलाही फालेरो यानी मागे घेतला होता असे ते म्हणाले.कॉंग्रेस विधीमंडळातही पर्रीकर यांचीच माणसे आहेत. पर्रीकर यांच्या सल्ल्यानेच ते वागतात, असा आरोपही फर्नांडिस यांनी केला. गेल्या दहा महिन्यांच्या काळात आपण पक्षासाठी निधी उभारण्याचे कामही केल्याचे सांगून सध्या पक्षाच्या तिजोरीत २२ लाख रुपये जमा असल्याचे त्यांनी सांगितले.
भ्रष्टाचार विरोधी आपला लढा चालूच राहिल. पर्रीकर भ्रष्टाचाराच्या बाबतीतही युटर्न घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या दहा महिन्यांच्या काळात आपण पक्ष स्वच्छ करण्याची चळवळ सुरू केली. पर्रीकर यांच्या मर्जीतील मंडळी कॉंग्रेसमध्ये वावरत आहेत, याची पक्षश्रेष्ठींना कल्पना नाही. लवकरच आपण दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व राहूल गांधी यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती सादर करणार असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले. राज्यपालांची भेट घेऊन आपण भ्रष्टाचारास खतपाणी घालणारे पर्रीकर यांची पदावरून उचलबांगडी करून गोव्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती, असे ते म्हणाले. प्रदेश अध्यक्षपदासाठी चार वेळा संधी आली होती, मात्र यावेळी आपण घराणेशाहीला थारा न देणे, भ्रष्टाचार निपटून काढणे, आयाराम गयारामना स्थान न देणे व मागच्या चुकांबद्दल जनतेची माफी मागणे या चार मुद्दांवर तडजोड न करण्याच्या अटीवरच अध्यक्षपद घेतले होते, असेही त्यांनी सांगितले. आपण कॉंग्रेसमध्ये आणलेली युवकांची ‘टीम’ कार्य करणार व आपला त्यांना पाठिंबा राहिल, असे त्यांनी सांगितले.