- ज. अ.ऊर्फ शरदचंद्र रेडकर.
(सान्ताक्रूझ)
रामू सहज बोलून गेला खरा पण त्याला कुठची कल्पना की ऐकणारा याची वाच्यता तिखटमीठ लावून सर्वत्र करील! जे व्हायचे तेच झाले, आधीच मुंबईकरांशी झिरझिरीत झालेले संबंध कायमचे तुटले. म्हणूनच कुणासमोर काय बोलावे, किती बोलावे याचा आधी विचार करायला हवा. माणसे रडून ऐकतील आणि हसून जगाला सांगतील.
‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’, असे संत तुकोबा म्हणाले तर ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’, असे संत शिरोमणी रामदास विचारतात. तरीही माणूस आपले दुःख कुरवाळत बसतो आणि अधिक दुःखी बनतो. दुसर्याला सांगितले की दुःख हलके होते, भावनांचा निचरा होतो, आपली व्यथा दुसर्याला ऐकवताना अनेकदा कंठ दाटून येतो, डोळ्यात अश्रू उभे राहतात आणि ऐकणार्याच्या डोळ्यातूनही घळघळा अश्रू वाहू लागतात. ‘आगीशिवाय कढ नाही आणि मायेशिवाय रड नाही’ तसे होते. पण हे सर्वतः खरे नसते. तुमचे दुःख ऐकणारा तुम्हाला बरे वाटावे म्हणून डोळ्यात अश्रू आणण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच आपले दुःख दुसर्याला सांगत असताना आपण कुणापाशी बोलतो आहोत आणि जे बोललो त्याचे विपरीत परिणाम तर होणार नाहीत ना याचा विचार आधी करायला हवा. कारण माणसे अशीही असतात की, तुम्ही जे सांगता ते रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात. ऐकताना वरकरणी रडत असली तरी मनातून हसत असतात आणि तुमच्या दुःखाची जाहिरात विकृतपणे करतात. याचा मनस्ताप मूळ दुःखापेक्षा अधिक असतो.
राघवदासाचा मुलगा रामू, त्याच्या बाबतीत अगदी असेच घडले आणि त्याच्या बोलण्याचा विपर्यास झाला. राघवदास कोंकणातील एक साधा सज्जन शेतकरी. कुणाच्या ना अध्यात ना मध्यात. आपण बरे की आपले काम बरे अशा सरळ मार्गाने जाणारा. शेतात पिकणारे धान्य आणि बागायतीमधून मिळणारे उत्पन्न त्याच्या कुटुंबासाठी पुरेसे होते. पुण्या-मुंबईला असणार्या जवळच्या- दूरच्या सर्व नातेवाइकांना तो आपल्या शेतात पिकणारे कडधान्य आणि बागायतीत होणारे आंबे, काजू, नारळ आवर्जून पाठवायचा. शहरातील ही मंडळी आपल्या मुलांना उन्हाळी सुट्टी सुरू झाली की राघवादासाच्या घरी हटकून यायची. राघवदासासाठी धोतरजोडी, त्याच्या कारभारणीला नऊवारी लुगडे आणि मुलांसाठी मिठाई ही ठरलेलीच! राघवदासची पत्नी राधाबाई पाहुण्यांचे स्वागत हसत मुखाने करायची. त्यांना रोज कोणते ना कोणते कोंकणी पदार्थ करून वाढायची. पुणे, मुंबईकरांना गावठी कोंबडीची सागुती आणि तांदळाचे वडे म्हणजे जीव की प्राण! बुधवार रविवार वडे-सागुतीचा बेत ठरलेलाच! पाहुण्यांच्या सरबराईत दिवस कधी उजाडायचा आणि कधी मावळायचा समजत नसे. पाहुणे माघारी जायला निघाले की राघवदास, त्याची पत्नी राधाबाई, मुलगा रामू व मुलगी यशोदा यांचा जीव गलबलायचा! रामू तर हमसून हमसून रडायलाच लागायचा कारण पाहुण्यांच्या मुलांशी त्याची गट्टी जमलेली असायची. त्यांच्या सोबत रानोमाळ केलेली भटकंती, जवळच्या ओढ्यात मारलेल्या डुबक्या, झाडावरचे सूरपारंब्यांचे खेळ, चावर्या डोंगळ्यांची तमा न करता आंब्याच्या झाडावर चढून त्यांच्यासाठी काढलेले आंबे, काटेरी झुडपातील करवंदे, जांभळीच्या झाडावरची जांभळे, चिंचा, बोरे या कोंकणी मेव्याचा यथेच्छ आस्वाद या रामूने त्यांना दिलेला असायचा! भरल्या डोळ्यांनी निरोप दिले घेतले जायचे, पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण दिले जायचे. पाहुणे गेले की घर कसं सुनं सुनं व्हायचं !
रामू आता मोठा झाला होता. तालुक्याच्या गावी जाऊन त्याने आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागायचा बाकी होता. तो पास होणार यांत कोणतीही शंका नव्हती. कारण तो हुशार होता. त्याने आतापर्यंतचे आपले शिक्षण स्कॉलरशिप मिळवून पूर्ण केले होते. त्याच वर्षी मुंबईची मंडळी मे महिन्यात कोंकणात दाखल झाली. त्यांचे स्वागत नेहमीप्रमाणे झाले. राघवादासला वाटायचे की पाहुण्यांनी रामूला आपल्यासोबत मुंबईला घेऊन जावे. तिथे तो नोकरी करून पुढचे शिक्षण घेऊ शकला असता. पण भिडस्त राघवची जीभ उचलत नव्हती. रामूच एक दिवस पाहुण्यांना म्हणाला, ‘‘तात्या, मी तुमच्यासोबत मुंबईला नोकरीसाठी येऊ का? इकडे कोंकणात नोकरी मिळणे कठीण. मी नोकरी करीन व त्याचबरोबर कॉलेजचे देखील शिक्षण घेईन’’. रामू आणि राघव स्वभावाने भाबडे! त्यांना वाटले, तात्या त्वरित होकार देतील. पण कसचे काय आणि कसचे काय ! तात्या म्हणाले, ‘‘आता नको, तू तालुक्यालाच जाऊन कॉलेज शिक्षण पूर्ण कर, नंतर मुंबईला न्यायचे बघू’’, रामू हिरमुसला झाला. राघवदेखील उदास झाला. त्याला हे उत्तर अपेक्षित नव्हते. कारण तात्यांनी यापूर्वी आपल्या अन्य जवळच्या नातेवाइकांना मुंबईला नेले होते, त्यांना नोकरीला लावले होते, त्यांची पुढे लग्नकार्येदेखील लावून दिली होती. पण ती अगदी जवळची मंडळी होती. राघवदास हे त्या मानाने खूपच दूरचे नातेवाईक मग फरक असणारच ना!
पण राघव आणि रामू मात्र त्यांना आपले जिवाभावाचे समजून बसला होता. मुंबईकर मंडळी त्या दोन दिवसातच मुंबईला परतली. यावेळी ना कुणाच्या डोळ्यात पाणी होते ना कुणाचा कंठ दाटून आला. उपचार म्हणून निरोप दिला घेतला. रामूच्या मनाला ही गोष्ट खोलवर लागली. आपण किती यांना आपले मानीत होतो आणि हे असे कसे वागू शकतात?
चार वर्षे मागे पडली. रामूने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कॉलेजमधून कॉमर्स शाखेची पदवी प्रथम श्रेणीत पास केली. मुंबईच्या पाहुण्यांना पास झाल्याचे कळवले. पण त्यांच्याकडून साधे अभिनंदनाचेदेखील पत्र आले नाही. त्याचवेळी गोवा स्वतंत्र झाला होता. तिथे नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध झाल्या. शिवाय मुंबईपेक्षा गोवा जवळ, साधं सरळ जीवन! ना मुंबईसारखी धावपळ ना कसली कटकट! रामूला गोवा सरकारच्या लेखा खात्यात अकौंटंटची नोकरी मिळाली. पुढे बढती मिळवत तो खात्याचा उप-संचालक होऊन निवृत्त झाला. पण मुंबईकरांनी दिलेली ती जखम काही बरी झाली नाही. मनातील ही खंत कुणापाशी तरी व्यक्त करावी असे वाटायचे. पण कुणाला सांगणार? एक दिवस त्याचा एक अन्य नातेवाईक त्याला भेटायला आला. त्याच्यापाशी बोलता बोलता हा विषय सहजच निघाला. रामूने भाबडेपणाने ही मनातली खंत त्याला बोलून दाखवली. पण पुढे म्हणाला, ‘‘झाले ते बरेच झाले. मला तात्यांनी मुंबईला नेले असते तर कुठच्या तरी कापड गिरणीत चिकटलो असतो, कदाचित १९९२च्या बॉम्बस्फोटात मी मेलो असतो किंवा २६/११च्या हल्ल्यात सापडलो असतो. गोव्यात आल्याने मी खरेच सुखी झालो. तात्यांचे हे उपकारच आहेत’’. रामू सहज बोलून गेला खरा पण त्याला कुठची कल्पना की ऐकणारा याची वाच्यता तिखटमीठ लावून सर्वत्र करील! जे व्हायचे तेच झाले, आधीच मुंबईकरांशी झिरझिरीत झालेले संबंध कायमचे तुटले. म्हणूनच कुणासमोर काय बोलावे, किती बोलावे याचा आधी विचार करायला हवा. माणसे रडून ऐकतील आणि हसून जगाला सांगतील.