‘माझे’ जीवनाचे व्यवस्थापन

0
318

–  डॉ. मृणालिनी सहस्रभोजनी, स्त्रीरोगतज्ज्ञ
या लेखात ‘माझे’ म्हणजे तरुणाईत पदार्पण करणार्‍या मुलींचे गृहित धरायचे आहे. या वयात मुला-मुलींमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक बदल होत असतात. या बदलांना सामोरे जाताना त्यांच्यामध्ये जागरूकता, होणार्‍या बदलांचा सकारात्मकरीत्या स्वीकार, त्या वयातील गरजांविषयी जागरुकता, या बदलांना व गरजांना सहजपणे स्वीकारणे शिवाय बदलांबद्दल व स्वतःबद्दल आदरही बाळगायला हवा. कसे ते थोडक्यात पाहुया.
१. जागरूकता ः माझ्यात नैसर्गिक काय बदल होताहेत ते वैज्ञानिक दृष्टीने समजून घेणे. ते बदल फक्त शारीरिक नसून मानसिक व सामाजिकही आहेत हे समजून घेणे.२. बदलांचा सकारात्मक स्वीकार ः मासिक पाळी सुरु होते, शरीरात बाह्यबदल होतात त्यांच्याबद्दल लाज वाटण्यासारखे काहीच नाही. ते शरीराचे निसर्गनियम आहेत. त्यासोबत मुलींना मुलांबद्दल आकर्षण वाटणे, मूडमध्ये बदल होणे, आईवडिल व शिक्षकांपेक्षा मित्रमैत्रिणींचा सहवास जास्त आवडणे, स्वतःच्या करिअरबद्दल, भावनांबद्दल संवेदनाक्षम होणे, कुणीतरी आपल्याला स्पेशल समजावे आणि आपल्यासाठी स्पेशल असावे असे वाटणे हे ही नैसर्गिक बदल आहेत आणि त्यामुळे त्यात कमीपणा तर नाहीच हे स्वीकारावे.
३. गरजांबद्दल जागरूकता ः शारीरिक गरजांबद्दल जागरूक राहणे सांगावे लागत नाही. किंबहुना सर्वजण त्याबद्दलच बोलतात. पण मानसिक व भावनिक गरजांच्या बाबतीत नेहमीच आपल्याला मौन दिसते. मुलींचे मुलांबद्दलचे लैंगिक आकर्षण हे नैसर्गिक असते. आवडणार्‍या मुलाचा हलकासा स्पर्श तिला खूप सुखावतो. एखाद्या मुलाने तिच्याकडे विशेष लक्ष दिले आणि तो तिचा आवडता असेल तर त्यानेही मुलगी सुखावते. हे मानसिक आणि भावनिक बदलही नैसर्गिकच आहेत. या आकर्षणासोबत वाहून जा, असे मी नक्कीच म्हणणार नाही कारण त्यामुळे करिअर बिघडेल. प्रत्येक मुलीने कमाईच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याइतपत तरी शिक्षण घ्यावे, हा माझा नक्कीच आग्रह आहे. हे भावनिक व लैंगिक आकर्षण नैसर्गिक आहेत पण ‘‘आज मला ते माझ्या आयुष्यात जरा बाजूला ठेवायचे आहेत’’ हा विचार योग्य आहे. करिअरच्या या वयातल्या या शत्रूला समोरासमोर टक्कर देणे आवश्यक आहे. नाहीतर ते स्वस्थ बसू देत नाही. त्यासाठी अशा प्रकारच्या भावना जागृत करणारे सिनेमे, टीव्ही मालिका आणि वाङ्‌मय दूर ठेवलेलेच हितकारक!
४. बदल आणि गरजांसोबत सहजता ः सर्व बदल समजावून घेणे आणि त्यावर मात करण्याची उपाययोजना झाली की आजच्या या जीवनात सहजता येते. लपवाछपवीने ताण निर्माण होतो.
५. बदल आणि स्वतःबद्दल आदर बाळगा ः की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने
जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे
बुद्ध्याची वाण धरले करी हे सतीचे
उद्याच्या माझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी आज माझ्या भावना जाणून बुजून बाजुला ठेवते आहे. मोठे लक्ष्य मिळविण्यासाठी छोट्या छोट्या सुखांच्या समिधांची मी आहूती देत आहे. असा विचार करून स्वतःबद्दलच्या अत्यंत आदरभावाने जीवनाचा उज्ज्वल आराखडा तयार करावा.
माझ्या सौंदर्याच्या कल्पना कशा असाव्या..?
१) शारीरिक- सुंदरतेचे पहिले लक्षण – नीटनेटकेपणा. व्यवस्थापनाची लक्षणे – टापटीप व वक्तशीरपणा.
सौजन्यपूर्ण वर्तन – मृदू भाषण.
निरोगी शरीर ः नियमित व्यायाम व समतोल आहाराने कमवावे. स्वच्छता व नीटनेटकेपणाने त्याला सजवावे.
२) वेळ, कार्य, शक्ती आणि पैसा यांचे व्यवस्थापन अनुक्रमे वक्तशीरपणा, टापटीप, शिस्तबद्धता आणि निगुतीने करावे.
३) चारित्र्याच्या सौंदर्यासाठी मृदुभाषण, प्रेम, सोशिकता, त्याग आणि आत्मनिर्भरता हे गुण अंगी बाळगणे आवश्यक आहेत.
वरील त्रिवेणी संगमातून साकारलेले जीवन उज्ज्वल भविष्याकडे नेणार याबद्दल शंकाच नाही.
लोक माझ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात..?
मुलींना आणि स्त्रियांना एक निसर्गाने दिलेला वर आहे. समोेरच्या पुरुषाची आपल्यावरची नजर आणि स्पर्श कलुषित, वासनामय आहे का हे तिला चटकन कळते.
– कुणी आपल्या वासनेसाठी दबाव आणू शकतो तर कुणी ते आमिष दाखवून साधण्याचा प्रयत्न करू शकतो.
– ही आपल्यावर लैंगिक छळाची भावना लगेच कळायला हवी. कोणत्याही परिस्थितीत दबावाखाली किंवा अमिषापोटी त्याला बळी पडणे आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग्य नाही. त्यामुळे त्याबद्दल सतत सतर्क राहणे, हाच उपाय आहे.
दुर्दैवाने जर असा प्रसंग आला तर तो ताबडतोब आपल्या पालकांना, शिक्षकांना किंवा भावंडांना सांगावा. लपवून ठेवणे म्हणजे तसे करणार्‍याला उत्तेजना देणे होय, हे लक्षात ठेवावे.
आकर्षणांना कसे सामोरे जावे..?
आज आजुबाजूचे मित्रमैत्रिणींचे वातावरण, मोबाईलवर इंटरनेटची सोय त्यामुळे जग खरोखर ‘हातात’, सिनेमे, टीव्ही, जाहिराती, मोठमोठे मार्केट, मॉल्स, ड्रग्ज, डिस्को या सर्व गोष्टी वयात उमलू पाहणार्‍या लहानशा जीवाला भुरळ पाडण्यास सरसावल्या असतात. अशा परिस्थितीत या सर्वांपासून आपल्या पाल्यांना वाचवणे पालकांकरता कठीण काम, विद्यार्थ्यांना वाचवणे शिक्षकांकरता कठीण तर स्वतःच स्वतःला वाचवणे मुलामुलींकरता अतिशय कठीण झाले आहे. तरूण पिढीच्या अफाट सृजनशक्तीला या सर्वांनी ग्रहण लावले आहे.
व्हॉट्‌सऍप, फेसबुक, इंटरनेटपायी स्वतंत्र विचार आणि कल्पनाशक्ती दडपल्या तर जातातच पण अमूल्य असा वेळ आणि जीवन वाया जाते आहे. ड्रग्ज, अल्कोहोल आणि स्मोकिंग त्याला विकृत करीत आहेत.
या पिढीला कसे सांभाळावे हा विश्वाचा प्रश्न आहे. अनेक विचारवंत जगभर याचे उत्तर शोधताहेत.
* आपण ज्या आकर्षणांच्या चक्रव्यूहातून जात आहोत त्याचे संपूर्ण स्वरूप समजून घेणे (ऍकनॉलेज). एकाच्या वाट्याला वरील सर्व चांडाळ येतात असे नाही. त्यामुळे आपल्याला कोणत्या असूराशी लढायचे आहे हे समजून घ्यावे.
* मित्रमैत्रिणी, बंधुभगिनी, पालक-शिक्षक यांच्याशी (शेअर) मोकळेपणाने आपल्या प्रश्नाची चर्चा करावी. कदाचित त्याच परिस्थितीतून यशस्वीरीत्या मार्ग काढलेले मित्रमंडळ किंवा भावंड आपला मार्ग दाखवण्यात यशस्वी होऊ शकतात. काहीच नाही तरी आपण त्यांच्याशी बोलताना आपल्यालाच उत्तर सापडते. शेअर केल्याने त्या गोष्टीतला ताण जाऊन आपण उत्तर शोधू शकतो. त्यामुळे या सर्वांना जरूर सहभागी करून घ्यावे. सहचर्चा करावी.
* मानसिक तणावाच्या गोष्टींपासून कधी कधी खूप अंगमेहनत करून सुटका मिळते (चॅनेलाइज).
– वाचन, बागकाम, संगीत, चित्रकला, हस्तकला, नृत्यकला यांसारखे काही ना काही छंद जरूर जोपासावेत. आकर्षणाच्या मानसिक तणावातून बाहेर येण्यास हे छंद नक्कीच मदत करतात. शारीरिक आकर्षणाची म्हणून एक उबळ किंवा उमाळा असतो. तेवढी जर वेळ निभावून नेली तर त्यातून बाहेर पडणे कठीण नाही.
– समाजसेवा आणि त्यातून मिळणारे आत्मिक समाधान हेही एक चॅनेल आहे.
– उच्च ध्येय आणि त्याच्या पूर्णतेकरता झपाटले जाणे ही या आकर्षणातून बाहेर येण्याची अत्यंत प्रभावी गुरुकिल्ली आहे.
* स्वतःची किंमत समजून घेणे ः
वासनेला बळी तर कीटक-पक्षी-प्राणि-अशिक्षित पडतात. माणूस म्हणून मी जन्माला आले आहे. बुद्धी आणि विचारशक्तीचे भरपूर धन मला देवाने दिले आहे. वासनेच्या चिखलात वळवळणारा प्राणी मी नाही. बुद्धी आणि विचारशक्तीच्या दोन पंखांनी मोठ्या ध्येयाचे आकाश मी पार करू शकते. ‘‘रांधा वाढा आणि उष्टी काढा’’ यात गुरफटलेले वासनामय निकृष्ट जीवन मी जगणार नाही. आजचा वासना-विजय मला उत्कर्षाच्या शिखरावर नेणार आहे. (मी अमृतपुत्री आहे. मी लखलखती विद्युल्लता आहे. मीच पार्वती आहे, मीच विजयादुर्गा आहे.)
* ‘नकार’शक्ती ः पॉवर ऑफ सेईंग ‘नो’-
कुणी माझ्यावर दबाव टाकत असेल त्याला ‘‘नाही’’ म्हणणे. कुणी लैंगिक आकर्षण निर्माण करीत असेल त्याला नाही म्हणणे. कुणी फूस लावत असेल, खोटी तारीफ करत असेल, कुणी माझ्या सौजन्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत असेल, कुणी डिनर, डान्स, ड्रग्जकरता बोलावत असेल या सर्व बाबतीत नाही म्हणणे जमलेच पाहिजे. संकोचाला बळी पडता कामा नये.
अष्टभुजेच्या आठ हातांसारखे माझे आठ पैलू ः—
शिक्षण, सौजन्य, कला, उच्च ध्येय, कलागुण, शारीरिक सौष्ठव, मानसिक शक्ती, बौद्धिक झेप, आत्मिक बळ आहेत. मी महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली आहे. त्यामुळे मुलींनो उठा, जागृत व्हा आणि ध्येयाकडे वाटचाल करा!!!