>> कदंब कर्मचारी संघटनेकडून विविध मागण्यांसाठी निदर्शन
गोवा कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाची ‘माझी बस’ योजना कदंब महामंडळाच्या हितार्थ नाही, असा दावा कदंबचालक आणि संलग्न कर्मचारी संघटनेने येथे काल करत या योजनेला विरोध दर्शवला. येथील आझाद मैदानावर कदंब महामंडळाच्या चालक आणि संलग्न कर्मचारी संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने केली. त्यावेळी कर्मचारी संघटनेकडून हा दावा करण्यात आला.
कदंब महामंडळाच्या खासगीकरणाच्या दृष्टीने उचललेले हे पहिले पाऊल आहे, असा आरोप आयटक या कामगार संघटनेचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केला. कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न 2016 पासून प्रलंबित आहे. कदंब कर्मचाऱ्यांच्या पीएफचा प्रश्न प्रलंबित आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जानेवारी 2023 मध्ये कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते; मात्र कित्येक महिने उलटले तरी अजूनपर्यंत तोडगा काढण्यात आलेला नाही, असेही फोन्सेका यांनी सांगितले.
कदंब महामंडळाने इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्यास विरोध नाही; मात्र इलेक्ट्रिक बसगाड्यांवरील कर्मचाऱ्यांची कंत्राटी नियुक्ती पद्धती अयोग्य आहे. असे फोन्सेका यांनी सांगितले.