गोवा कदंब वाहतूक महामंडळाच्या प्रायोगिक तत्त्वावरील ‘माझी बस’ योजनेखाली मडगाव-काणकोण मार्गावरील 40 खासगी बसगाड्या आणि मडगाव ते केपे-सांगे मार्गावरील 18 बसगाड्या आणि पणजी ते सावर्डे मार्गावरील एका खासगी बसमालकाला प्रस्तावपत्र (ऑफर लेटर) दिले आहे, अशी माहिती कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी काल दिली.
माझी बस योजनेला खासगी बसमालकांकडून संमिश्र प्रतिसाद लाभला आहे. पहिल्या टप्प्यातील तीन प्रवासी मार्गांपैकी मडगाव ते काणकोण आणि मडगाव ते सांगे-केपे या दोन प्रवासी मार्गावर चांगला प्रतिसाद लाभला आहे, तर पणजी ते सावर्डे या प्रवासी मार्गावरील खासगी बसमालकांकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
कदंब महामंडळाने माझी बस योजनेखाली प्रस्तावपत्रे दिलेल्या काही बसमालकांनी ती स्वीकारून योजनेत सहभागी होण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत माझी बस योजनेंतर्गत खासगी प्रवासी बसगाड्या सुरू होतील, अशी माहिती घाटे यांनी दिली.
कदंब महामंडळाने ग्रामीण भागातील प्रवासी वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी माझी बस योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी प्रवासी बसमालकांना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत दिली होती. मडगाव ते काणकोण आणि मडगाव ते सांगे-केपे या प्रवासी मार्गावरील खासगी बसमालकांनी माझी बस योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे, तर पणजी-फोंडा-सावर्डे या प्रवासी मार्गावरील खासगी बसमालकांनी प्रतिसाद दिलेला नाही.
ज्या बसमालकांनी कदंबाकडे अर्ज सादर केले होते. त्या बसमालकांना प्रस्तावपत्रे देण्यात आली आहेत. पणजी ते सावर्डे या प्रवासी मार्गावरील खासगी बसमालक देखील माझी बस योजनेत सहभागी होतील, असा विश्वास घाटे यांनी व्यक्त केला.
माझी बस योजनेखाली खासगी प्रवासी बसगाड्या कदंब महामंडळाच्या नियंत्रणाखाली चालविण्यात येणार आहेत. खासगी बसमालकांना बसगाडीच्या आसन क्षमतेनुसार प्रति किलोमीटरनुसार भाडे दिले जाणार आहे. या योजनेखाली बसगाडीची देखभाल बसमालकाला करावी लागणार आहे. तसेच, वाहनचालकाची नियुक्ती करावी लागणार आहे.