माझी पहिली कविता

0
18

आता मला कशाचंच भान नव्हतं. मनाच्या त्या तशा अवस्थेतच एकाएकी अगदी अचानकपणे एकेक शब्द चक्षूंसमोर साकार होऊ लागला. मोती ओघळावे किंवा अळवाच्या पानावर दवबिंदू तरळावे तसे मनःचक्षूसमोर असे शब्द साकार होताना मी कधी अनुभवले नव्हते. आणि शब्दांची एक ओळ अशी साकार होताच लक्षात आलं, ही तर कवितेची ओळ! म्हणजे आता कविता तयार होत होती की काय? आणि बघता बघता त्या पहिल्या ओळीशी जुळणारी दुसरी ओळ साकार होऊ लागली. मग तिसरी… चौथी… ज्येष्ठ गोमंतकीय साहित्यिक विष्णू जयवंत ऊर्फ वि. ज. बोरकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने साहित्यविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या स्मृती जागवणारा, हा त्यांच्याच लेखणीतून उतरलेला लेख…

माझी पहिली कविता आज माझ्याजवळ नाही. त्यानंतरच्या कित्येक कविताही आज माझ्याजवळ नाहीत. काळाच्या उदरात त्या केव्हाच गडप झाल्या आहेत. एखादी कलाकृती काळाच्या प्रवाहात टिकून राहिली असं आपण म्हणतो तशा अर्थातच त्या टिकून राहिल्या नाहीत. त्यांची तशी योग्यताही नव्हती हे खरं. पण ‘काळाच्या प्रवाहात टिकून राहाणं’ यासारखा शब्दप्रयोग करताना मला वाटतं, काळाच्या प्रकृतीचं नीटसं भानही आपणाकडून ठेवलं जात नाही. ‘काळाचा प्रवाह’ असं म्हणताना काळ ही एक वाहणारी, प्रवाही, ओघवती वस्तू आहे असं गृहीत धरलं जातं. मला नेहमीच वाटत आलं आहे की काळ नामक जी चीज आहे तिचा तो मुळी गुणधर्मच नाही. काळ हा नेहमीच स्थिर असतो. सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून, किंबहुना त्याही आधीपासून. सृष्टीचा विलय होईल त्याही नंतर ‘काळ’ नावाचा हा एक अदृश्य नि अथांग महासागर नुसताच ऐलपैल पसरलेला आहे. नि राहील इथे ऐलपैल असं म्हणणंही वस्तुतः चूकच. केवळ काळाला महासागर असं म्हटलं म्हणून ऐलपैल असं म्हणायचं. ऐलपैल असं म्हणताना किनारे अभिप्रेत असतात. काळाला किनारे नाहीत. तसेच खोली अथवा उंचीही नाही. काळ म्हणजे चहू दिशांनी अफाट फैलावलेलं नुसतंच एक निराकार नि कल्पनातीत अस्तित्व. स्थिर नि अविचल. समुद्राच्या पृष्ठभागावर ज्याप्रमाणे बुडबुडे उमटतात, क्षणकाळ त्या पृष्ठभागावर तरंगत राहतात आणि नंतर समुद्रातच विलय पावतात, त्याचप्रमाणे काळात विविध अस्तित्वं जन्म घेतात, ती काळाला मापू पाहतात आणि नंतर काळातच नाहीशी होतात. काळातून निर्माण होणारी कविता अखेर काळातच विलय पावावी हे म्हणूनच अत्यंत स्वाभाविक असंच आहे. अनेक वर्षांपूर्वी वाचलेली एखादी कविता जशीच्या तशी आज स्मरावी किंवा अनेक शतकांपूर्वीचा एखादा ग्रंथ आज उपलब्ध व्हावा आणि तो वाचताना त्यातील सौंदर्यानं आजही मन मोहीत व्हावं यात त्या कवितेची अथवा ग्रंथाची थोरवी नाही असं नाही, पण याचं खरं श्रेय द्यायचं झालं तर ते काळालाच द्यावं लागेल. कारण काळानंच तशी सूट दिली नसती तर ती कविता स्मरली नसती किंवा तो ग्रंथही मुळी उपलब्धतच झाला नसता. माझी पहिली कविता आज मला स्मरतही नाही. फक्त त्या कवितेचं रूप, तिचा मुखवटा तेवढा अस्पष्टसा आठवतो.
मी माझी पहिली कविता लिहिली तेव्हा आम्ही मेर्सेसला राहत होतो. मडकई किंवा उतर्ड्याच्या तुलनेत मेर्सेस हे गाव काहीसे कोरडंच! मडकई हे गाव शेतांचं, गच्च झाडीचं. या गावातली घरंदेखील रस्त्याच्या कडेला फारशी नव्हतीच. रस्त्यापासून लांब, आत रस्त्यावरून चालताना या गावात माणसांची वस्ती आहे की नाही याचीच शंका यावी अशी झाडीत लपलेली. हे गाव जसं झाडीचं तसंच नदीचं नि डोंगरांचं. या गावाच्या एका बाजूला जुवारी नदीचं विस्तीर्ण पात्र, तर गावाच्या राहिलेल्या तिन्ही बाजू डोंगरांनी वेढलेल्या. गावात कुठेही हिंडलं तरी एखादा खळाळत्या पाण्याचा ओढा अथवा नाला आडवा यायचाच. कुठेही नजर टाकली तरी झाडांना गच्च लगडलेले आंबे, फणस, नारळ अथवा काजू नजरेत भरायचे! उतर्डे हे माझ्या आजोळचं गाव. या गावाची तऱ्हा पुन्हा वेगळीच. मडकईच्या आमच्या घरात माणसं तशी मोजकीच. त्यातही माणसांचे गट दोनच. एकतर आमच्यासारखी लहान मुलं किंवा अगदी मोठी माणसं. उतर्ड्याच्या घराचं तसं नव्हतं. ते घर माणसांनी नुसतं धडधडणारं. त्यातही केवळ लहान मुलं अथवा मोठी माणसं होती असं नव्हे, तर पंधरा वर्षांपासून पंचवीस वर्षांपर्यंतची तरुण मुलं आणि मुली पुष्कळ. तीही उत्फुल्ल, उत्साहानं खळाळती. त्यामुळे एकमेकांची थट्टामस्करी, छेडाछेडी याला नुसतं उधाण यायचं. मुली वीणकाम, भरतकाम करायच्या. ते करताना कोणत्या ना कोणत्या सिनेमातली गाणी गुणगुणत राहायच्या. त्यामुळे घरभर जणू रंगांना नि स्वरांना बहार यायचा. घरात शेती, नारळाचा व्यवसाय होता. मुलं या कामात गुंतलेली असायची. त्यांच्या शरीराचे स्नायू सतत तटाटलेले असत. अंगातून घाम नितळत असे. घरात एका बाजूला रंगस्वरांचे, तर दुसऱ्या बाजूला शक्तीचा नि शौर्याचा असा महोत्सव चालत असे.
मेर्सेस या दोन्ही गावांहून वेगळंच. तिथे ना मडकई इतकी गर्द झाडी, ना नदी अथवा डोंगर, ना उतर्ड्यासारखा यौवनोत्सव. मेर्सेस हे गाव पणजीच्या नजीक. साहजिकच या सर्व गावावर शहरी झांक होती. इथे आम्ही राहायला आलो तेही आपद्धर्म म्हणून. गोव्यात त्या काळी इंग्रजी शाळा फक्त पणजी, मडगाव अशा मोठ्या शहरांतच होत्या. मेर्सेसला येऊन राहिलो तर साहजिकच आम्हा सर्व मुलांचं शिक्षण पणजी येथे करणं सुलभ होईल असा दादूंचा- माझ्या वडिलांचा मेर्सेसला येण्यामागं सरळ हिशेब होता. मेर्सेसचे आमचे घर गावातील मुख्य रस्त्याला लागून. गावातील बहुसंख्य लोक नोकरीला पणजीला. पणजीला कामासाठी जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांची आमच्या घरासमोरच्या रस्त्यावर सतत वर्दळ. घराच्या पाठीमागे कितीतरी मोकळी जागा. त्यात किरकोळ झाडे. ही मोकळी जागा जिथे संपते तिथून पुढे नुसतीचं शेत. आश्चर्य म्हणजे ही शेतं मोकळी जागा जिथं संपते तिथून पुरुष- दीड पुरुष खालच्या पातळीवर होती. या शेतांकडे जाण्यासाठी आमचं घर ज्या कंपाऊंडमध्ये होतं त्या कंपाऊंडपलीकडून एक रस्ता जात होता. या शेतांकडे जाण्यासाठी या रस्त्याला तिथं पायऱ्या काढण्यात आल्या होत्या. शेतातील भाताची कापणी, मळणी झाली की ही शेतंच खेळाची मैदानं व्हायची. आमच्या घरासमोरून जाणारा रस्ता थेट पणजीपर्यंत जात होता. आमच्या घरापासून पन्नासेक पावलं पुढे गाव संपत होतं. पुढे फक्त सरळ उभा रस्ता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भाताची विस्तीर्ण शेतं आणि कडांना माडांच्या रांगा. पणजीची घरांची ओळ इथून स्पष्ट दिसायची. इथून ती घरं अगदी जवळ असल्यासारखी वाटायची. पण त्यांच्यापर्यंत पोचायचं तर या रस्त्यानं तब्बल चाळीस मिनिटं तरी चालावं लागे. माझी पहिली कविता आणि नंतरच्याही अनेक कविता मी लिहिल्या त्या याच रस्त्यावर.

मेर्सेसच्या आमच्या या घरात दादूंचं एक पुस्तकाचं कपाट होतं. या कपाटात बहुतेक पुस्तकं पोर्तुगीज होती. काही मराठी पुस्तकंही होती पण ती विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे लेख, न. चि. केळकरांचे लेख यांसारखी भारी व अवजड मराठी. वाचावंसं वाटावं असं एकच पुस्तक त्या कपाटात होतं- बहुधा ‘जोत्स्ना’ मासिकातील कात्रणं कापून बाईंड करून बनवलेलं वि. स. खांडेकरांचं ‘हिरवा चाफा.’ दादूंना वाचनाची अत्यंत आवड. जेव्हा शक्य होतं तेव्हा त्यांनी नवीन कोरी पुस्तकं मुद्दाम विकत घेऊन हा संग्रह जमवला होता. ‘हिरवा चाफा’ची कात्रणं कापून त्यांचं बाईंडिंगही त्यांनी स्वतःच केलं होतं. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर भडकलेल्या महागाईची आच इतकी तीव्र होती की मिळणाऱ्या उत्पन्नात आपला संसार चालवणंही त्यांना मोठ्या मुष्किलीनंच शक्य होत होतं; मग नवीन पुस्तकं विकत घेण्याची गोष्टच कशाला? दादूंच्या या कपाटातील पुस्तकं ही फक्त गतकाळाची साक्षी होती, आणि आता नवीन पुस्तकं विकत घेता येत नाहीत या जाणिवेनं त्यांचं मन पदोपदी खंतावत होतं ते मला जाणवत होतं.

मी तेव्हा इंग्रजी चौथी किंवा पाचवीत होतो. पण त्या काळातही वाचनाची मला विलक्षण आवड होती. पण गोव्यात त्या काळात मराठी फारसं काही वाचनासाठी उपलब्ध होत नसे. माझी वाचनाची बरीचशी भूक मला म्हणूनच या कपाटातील पुस्तकांची चाळवाचाळव करून भागवावी लागत होती. या भुकेपोटीच न. चिं. केळकरांचे लेखही मी वाचून पाहाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्या लेखांनी मी मोहीत मात्र झालो नाही. त्या पुस्तकांची मी अशी चाळवाचाळव करीत असतानाच एक दिवस एक अजब पुस्तक माझ्या हाताला लागले- बा. भ. बोरकरांचे ‘जीवन संगीत.’ इतर पुस्तकांच्या तुलनेत हे पुस्तक तसे आकाराने लहान. इतके दिवस ते कुठे लपून राहिले होते कोण जाणे. कदाचित त्याच्या कमी जाडीमुळे कपाटाच्या एका बाजूला कुठेतरी इतर पुस्तकांच्या आड ते दडपून बसले असावे आणि मला कधी दिसले नसावे. परंतु आता ते पुस्तक माझ्या हातात आले. सहजपणे मी त्या पुस्तकाची पानं उलटली आणि स्तिमित होऊन त्या पुस्तकाकडे कितीतरी वेळ मी नंतर पाहतच राहिलो.
त्या आधी कविता माझ्या वाचनात आल्या नव्हत्या असं नव्हे. मडकईला आमच्या घरी ‘जोत्स्ना’, ‘किर्लोस्कर’ आणि ‘सह्याद्री’ या मासिकांचे दादूंनीच केव्हा तरी घेतलेले काही अंक होते. मडकईला गेलो की हे अंक वाचणे हा माझा उद्योग होता. या मासिकांत मला लोभावत होत्या, मोहवीत होत्या त्या कविताच. परंतु प्रत्येक मासिकात कविता फक्त चार-पाचच असत. त्याही वेगवेगळ्या कवींच्या. एकाच कवीच्या इतक्या सगळ्या कविता एकत्र, त्याही पुस्तकरूपात मी आता प्रथमच पाहात होतो. किंबहुना कवितांचं असं एक पुस्तक असू शकतं हे त्यावेळी माझ्या कल्पनेतही नव्हतं. बा. भ. बोरकरांचं ‘जीवनसंगीत’ हे त्यावेळी मला एक अजब पुस्तक वाटलं त्याचं कारण हेच.

त्यानंतर जसजसं मी ते पुस्तक वाचत गेलो तसतसा त्या पुस्तकाच्या मी अधिकाधिक मोहात पडत गेलो. त्या कवितांचं सौंदर्यच तसं होतं, आणि सौंदर्य तरी किती प्रकारचं? -कल्पनाविलासाचं सौंदर्य, शब्दांचं सौंदर्य, नादांचं, स्वरांचं सौंदर्य! आणि पुन्हा सारं अत्यंत सहज. अभिनिवेश कशाचा नाही. त्या कवितांच्या ओळीन्‌‍ ओळी आता मनात सतत रुंजी घालत होत्या. ‘गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले। शीतलतनु चपळचरण अनिलगण निघाले’ किंवा ‘तुझ्या मनगटावरी खेळणे मला नको का गडे? विक्रम विरहित विलास तरि तुज काल किती आवडे?’ किंवा ‘चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे। आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे’ यांसारख्या कितीतरी ओळी आता कुठेही आणि केव्हाही मनात उमटत असत आणि मन त्यातच भ्रमत जात असे. दुपारी शाळेतून घरी आलो की या एका पुस्तकाशिवाय मला आता दुसरा चाळा नव्हता, उद्योग नव्हता. या पुस्तकापायी माझं अभ्यासावरचं लक्ष उडत चाललं आहे ही गोष्ट दादूंच्या नि आत्याच्या- माझ्या आईच्या- लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यानंतर ‘जीवनसंगीता’तील कविता उघडपणे वाचणे अवघड होऊ लागले आणि इथूनच बहुधा कवितानिर्मितीसाठी आवश्यक ती मनोभूमी तयार होऊ लागली.

आता मी कुठंही असलो तरी माझ्या सभोवती सतत एक विलक्षण गुंजन चालू असल्यासारखं मला जाणवत होतं. गुंजन- नादाचं, स्वरांचं, शब्दांचं. या नादांची, स्वरांची, शब्दांची जणू विविध वलयं उठत होती आणि सर्व बाजूंनी ती मला वेढून, गुरफटवून टाकीत होती. आणि मला काही कळायच्याही आत या वलयांचाच आता माझ्याभोवती एक कोष झाला होता, आणि तो कोष हेच आता माझं विश्व झालं होतं.
आमच्या घरातून माझा मोठा भाऊ, मी आणि माझा धाकटा भाऊ असे आम्ही तिघे त्यावेळी पणजीला जात होतो. मी आणि माझा मोठा भाऊ इंग्रजी शाळेत आणि माझा धाकटा भाऊ पोर्तुगीज लिसेववर. सर्वांच्याच शाळा आठच्या दरम्यान सुरू होत असल्यामुळे सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान आम्ही घरातून निघत असू. वाटेत पणजीला जाणारी इतरही मुलं भेटत. टिवल्याबावल्या करीत, एकमेकांची टिंगल-टवाळी करीत किंवा शाळेतील सरांची खिल्ली उडवीत मेर्सेस ते पणजी अंतर काटायचं हा आमचा नेहमीचा शिरस्ता. परंतु तशा टिवल्याबावल्या करण्यात, टिंगल-टवाळ्या करण्यात मला स्वारस्य वाटेनासं झालं. इतर मुलांच्या सोबत राहूनही मी आता त्यांच्यापासून वेगळा होऊ लागलो. जणू त्यांच्यात नि माझ्यात एक अदृश्य पण भक्कम तटबंदी होती. जणू या तटबंदीमुळे माझं सारं विश्वच त्यांच्यापासून वेगळंच झालं होतं. शाळेत, संध्याकाळच्या वेळी खेळायला गेलं तरी ही तटबंदी मला इतर सर्वांपासून वेगळं पाडीत होती. माझं विश्व हे असं इतरांच्याहून वेगळं झालं होतं आणि शिवाय ते मुकंही झालं होतं. एरव्ही अखंड बडबड करणारा मी, पण आता जणू माझी वाचाच गेली होती. पण मी बोलत नव्हतो असं म्हणणंही चूकच होतं. माझ्याबरोबरच्या इतरांशी मी बोलत नसे हे खरं. त्यांच्याकडे तर आता माझं लक्षच नसे. मात्र आता मला जाणवत होतं माझ्यासभोवती असलेल्या कोषाच्या पार पलीकडून अदृष्टातून कोणीतरी मला खुणावत होतं. माझ्याशी संवाद साधू पाहात होतं. माझ्या साऱ्या चित्तवृत्ती आपणाकडेच खेचून घेत होतं आणि आता माझ्या अगदी नकळतच अदृष्टांच्या पलीकडे हे जे कोणी होतं त्याच्याचकडे माझं मन ओढ घेऊ पाहात होतं, त्याच्याशीच बोलू, संवाद साधू पाहात होतं.
अदृष्टाच्या पलीकडे हे जे कोणी होतं (त्यालाच सुप्त किंवा सब-कॉन्शस मन म्हटलं जात असावं हे माझ्या नंतर बऱ्याच वर्षांनी लक्षात आलं) त्याचा चेहरा मला दिसत नव्हता आणि तरीही ते मला ओळखीचं वाटत होतं. जणू ते म्हणजे माझाच एक अंश होता किंवा मी त्याचा अंश होतो. ते जे मला सांगू पाहत होते ते, मला जाणवत होतं की मला समजत होतं आणि तरीही मला त्यातलं काहीच समजत नव्हतं. ते सारं अस्पष्ट नि अज्ञातच राहात होतं आणि ते जाणून घेण्यासाठी आता मन तगमगत, तडफडत होतं. मनाची ही अवस्था मोठी विचित्र होती. कोणत्याही बाह्य गोष्टीत आता मन रमतच नव्हतं. ते फक्त आत नि अधिक आत ते जे कोणी मनाशी संवाद साधू पाहात होतं त्याच्याकडे पोहोचण्यासाठी धडपडत होतं. फक्त त्याच्याचकडे झेपावत राहात होतं.

आणि मनाच्या या अवस्थेत असतानाच एका सकाळी मी शाळेत जाण्यासाठी इतर मुलांबरोबर गावाची वेस ओलांडली. तिथून पुढं सरळ पणजीला जाणाऱ्या उभ्या रस्त्याला लागलो. थोडंफार त्या रस्त्यात चालत गेलो आणि एकाएकी मी जणू एका विलक्षण काळोखात बुडून गेलो. त्याही वेळी माझे पाय इतर मुलांच्या बरोबरच चालत होते. पण माझं मन माझं राहिलं नव्हतं. अदृष्टाच्या पलीकडून इतके दिवस जे कोणी मला खुणावत होते ते जणू आता माझ्या मनाला प्रत्यक्ष येऊन भिडलं होतं. त्याच्याशी एक झालं होतं. आता मला काहीच दिसत नव्हतं. आता मला कशाचंच भान नव्हतं. मनाच्या त्या तशा अवस्थेतच एकाएकी अगदी अचानकपणे एकेक शब्द चक्षूंसमोर साकार होऊ लागला. त्याही अवस्थेत मला हा एक चमत्कारच वाटत होता. मोती ओघळावे किंवा अळवाच्या पानावर दवबिंदू तरळावे तसे मनःचक्षूसमोर असे शब्द साकार होताना मी कधी अनुभवले नव्हते. आणि शब्दांची एक ओळ अशी साकार होताच लक्षात आलं, ही तर कवितेची ओळ! म्हणजे आता कविता तयार होत होती की काय? पण यावेळी आश्चर्य करण्याइतकंही मला भान नव्हतं की वेळ नव्हता. त्या अवस्थेत जणू मला गच्च बांधून ठेवलं होतं. आणि बघता बघता त्या पहिल्या ओळीशी जुळणारी दुसरी ओळ साकार होऊ लागली. मग तिसरी… चौथी…
या अवस्थेत कितीतरी वेळ राहिल्यासारखं मला वाटत होतं. पण या अवस्थेतून बाहेर आलो आणि आजूबाजूला पाहिलं तेव्हा जाणवलं अर्धाअधिक रस्ता अजून शिल्लकच होता. म्हणजे या अवस्थेत मी फार वेळ राहिलो नव्हतोच. फक्त काही मिनिटं! आणि आता अगदी तीव्रतेनं, ठळकपणे जाणवलं, त्या तेवढ्या वेळात मी चक्क कविता केली होती. ‘ज्योत्स्ना’, ‘किर्लोस्कर’मध्ये प्रसिद्ध व्हायच्या तशी कविता! ‘जीवन संगीत’मध्ये ग्रंथीत झाल्या आहेत तशी कविता! आणि आता मला काहीसं निराळंच वाटत होतं. एकदम स्वच्छ, प्रसन्न, टवटवीत. जणू शरीराला आतून सचैल अभ्यंग स्नान घडलं होतं. आता मी नेहमीसारखा सभोवतीच्या सृष्टीकडे पाहू शकत होतो. पण सभोवतीची ही नेहमीचीच सृष्टी, ही माडांची झाडं, शेतं, ऊन, पलीकडचं पणजी… हे सारंच नवीन, अनोखं आणि अगदी माझ्याप्रमाणेच टवटवीत वाटत होतं. आणि या सृष्टीकडे पाहता पाहता आता एकदम मनात आलं, अरे, माझी कविता कुठे? एवढ्या वेळात मी ती हरवली तर नव्हती? पुन्हा एकदा मी ती कविता आठवू लागलो आणि पुन्हा एकदा त्या कवितेच्या ओळी मनात जशाच्या तशा उमटत राहिल्या.

ही माझी पहिली कविता आज ती माझ्या संग्रहात नाही. पण मला पक्कं स्मरतं, या कवितेची निर्मिती हे मी बरेच दिवस माझ्याच जवळ ठेवलेलं एक गुपित होतं. शाळेत गेलो तरी मी कविता लिहिल्याचा वर्गातील मुलांना सुगावा लागू नये म्हणून मी ती वर्गात कागदावर उतरविली नाही. त्या दिवशी शाळा सुटल्यावर नेहमीसारखाच मी घरी आलो आणि कोणाला कसलाही संशय येऊ नये म्हणून नेहमीसारखंच जेवून घेतलं. त्यानंतर मात्र घरात एका आडबाजूला बसून ती संपूर्ण कविता कागदावर उमटविली. तेव्हा प्रथमच एक अगदी नवीनच गोष्ट लक्षात आली. कविता रचण्यात एक विशिष्ट प्रकारचा आनंद होता आणि तो आता मी अनुभवलाही होता. परंतु ती रचलेली कविता कागदावर अक्षरात उमटलेली पाहणं हाही एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होता. ती कविता लिहून झाल्यावर कितीतरी वेळ तो आनंद मी अनुभवीत होतो.

ही पहिली कविता लिहिल्यानंतर नंतरच्या वर्षांत मी आणखी बऱ्याच कविता लिहिल्या. त्यातल्या काही आज संग्रही आहेत, काही नाहीत. परंतु एक गोष्ट खरी, यापैकी प्रत्येक कविता लिहिताना आलेला अनुभव, झालेला आनंद नेमकी पहिली कविता लिहिताना आलेल्या अनुभवासारखाच नि झालेल्या आनंदासारखाच होता.
काळाच्या या विराट घनाकारात आपलं हे टीचभर अस्तित्व. निर्मितिप्रक्रियेबद्दल तज्ज्ञांचं म्हणणं काहीही असो, मला नेहमीच वाटत आलं आहे की काळच आपल्या लहरीनुसार आपली त्या अंगची एखादीच छटा एखाद्या वेळी एखाद्यासमोर खुली करतो. माझी पहिली कविता रचताना अदृष्टाच्या पलीकडे कोणीतरी असल्याचे जे मला जाणवत होते! त्याच्या माध्यमातूनच काळ या आपल्या छटा खुल्या करीत असतो. आणि तेवढ्या काळात आपलं नि काळाचं तादात्म्य होत असतं. म्हणूनच त्यावेळी सभोवती अंधारून आल्यासारखं वाटतं आणि भान कशाचंही राहात नाही. नंतर लिहिलेल्या प्रत्येक कवितेच्या वेळी मला याचा अधिकाधिक प्रत्यय येत गेला आहे. म्हणूनच मला नेहमीच वाटत आलं आहे की माझ्या पहिल्याच काय त्यानंतरच्या कोणत्याही कवितेचं श्रेय खरोखर माझं नाहीच. असलंच तर ते श्रेय फक्त काळाचं आहे.
गेली बरीच वर्षे मी कविता लिहू शकलेलो नाही. कविता लिहावं असं वाटत असतानाही, आपण बऱ्याच दिवसांत कविता लिहिलेली नाही याची खंत मनात असतानाही मी कविता लिहू शकलो नाही. वाटत होतं यापुढे आता कविता लिहिणं मला कधी जमणारच नाही. गेली कितीतरी वर्षे माझ्या मनाची मी तशी समजूत घालत आलो आहे. परवाच्या दिवशी मुंबईत अचानक अवेळीच पाऊस पडला आणि कसं कोण जाणे, सभोवती एकाएकी झाकोळून आल्यासारखं झालं. पुढचं मागचं काही दिसेनासं झालं. कितीतरी वर्षांनंतर पुन्हा एकदा सगळ्याचंच भान नाही होऊ लागलं…

कविता
शब्दशून्य झालें। जग अविचळ
ओठीं तुटे बळ। भावार्थाचें॥

गात्र गात्र झालें। पिंजून तहान
तेणें गर्भमन। कोंदाटलें॥

अवघा देह झाला। इये वेळी पांवा
कृष्ण भेटे गांवा। गौळणींच्या॥

माझे तंव डोळे। सुखीं सुख न्हालें…
विश्व सरूं आलें। लावण्यीं या॥

  • वि. ज. बोरकर