– डॉ. सोमनाथ कोमरपंत
डॉ. अनिल अवचट यांचे ‘माझी चित्तरकथा’ हे पुस्तक माझ्यासमोर आहे. सतत समोर ठेवावे असेच ते पुस्तक आहे. मागे त्यांनी ‘छंदाविषयी’ हे पुस्तक लिहिले. त्यातही चित्रकलेच्या छंदाविषयी त्यांचे आत्मनिवेदन होते. पण पुढे त्यांनी हे ‘स्वानंदाचे जिव्हार’ एवढे जिव्हारी लावून घेतले की लेखक, विचारवंत, कर्ते समाजसुधारक, शिल्पकार म्हणून ज्याप्रमाणे ते ओळखले जातात; त्याप्रमाणे उत्कृष्ट चित्रकार म्हणूनही त्यांनी स्वतंत्र मुद्रा निर्माण केलेली आहे. आपल्या चित्राखाली ते कधीही स्वाक्षरी करत नाहीत. पण त्यांची हत्तींची, झाडांची, मोरांची, आगळ्या-वेगळ्या प्रकारांत साकार झालेल्या माणसांची चित्रे पाहताक्षणीच ती अनिल अवचटांची आहेत हे सहज ओळखता येते. मयूराकृतीच्या रूपाने त्यांनी तर आता नाणेच पाडलेले आहे. अथपासून इतिपर्यंत पुन:पुन्हा वाचावे असे हे पुस्तक आहे. ‘‘जगातील तमाम नादिष्ट माणसांना…’’ ते अर्पण केले आहे आणि ‘अखेरचं थोडं’ मध्ये त्यांचे चिंतनशील मन त्यांच्या नेहमीच्या प्रांजळ, पारदर्शी शब्दांत प्रकट झालेले आहे :‘‘मला चित्रांनी काय दिलं, हा प्रश्न मी सत्तरीत पोहोचल्यावर स्वत:ला विचारतोय. मला चित्रांनी निसर्गातली भव्यता पाहायला शिकवलं, तसंच सूक्ष्मता न्याहाळायलाही. मी माझ्यातल्या अज्ञातालाही बाहेर येऊ दिलं. त्या नकळत गेलेल्या रेषा आजही चित्रांत दिसतात. पेन्सिलचित्रातल्या आताच्या डोंगरात लपलेली आधीची झाडं डोकावतात. या अज्ञाताच्या स्पर्शानं ज्ञातामधले दोषही कमी होत गेले. हे चित्र माझं आहे, त्या अमक्यापेक्षा मी सरस काढतो… वगैरे भाग गळून पडला. ते चित्र आहे, आणि ते घडताना मी तिथे होतो. या चित्राला माझा हातभार लागलाय ही किती भाग्याची गोष्ट!
त्यामुळे ती चित्रं माझी आहेतही आणि नाहीतही!’’
सर्जनशील कलावंत या दृष्टीने मनोदर्शनाची कला डॉ. अनिल अवचट यांना अवगत झाली आहे. त्यांचे मन इथे प्रकट झालेले आहे. शिवाय दुसर्यांची मने ते ओळखतात. पेन्सिलीच्या, रंगीत खडूच्या अथवा स्केच पेनच्या फटकार्याने चित्राकृती साकार करावी, त्याप्रमाणे कमीत कमी शब्दांत ते सहवासातील माणसांची स्वभावचित्रे उभी करतात. स्वत:विषयी काही सांगणे महाकठीण. एकीकडे तोल गेला तर त्याला आत्मश्लाघेचे रूप प्राप्त होते. आत्मविलोप करावा म्हटले तर बोलणे किंवा लिहिणेच खुंटले.
डॉ. अवचटांनी यांतला कोणताही मार्ग पत्करलेला नाही. स्वत:विषयी त्यांनी छान सांगितले आहे. छान आणि मोजक्या शब्दांत सांगितले आहे. निर्भय वृत्तीने सांगितले आहे. गोष्टीवेल्हाळपणाचे विलोभनीय रूप येथे अनुभवायला मिळते.
‘‘मी काही रूढार्थाने चित्रकार नाही. स्वत:च्या आनंदासाठी चित्रं काढण्याचा विरंगुळा शोधलेला मी एक माणूस आहे.’’
कला हे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे स्फुरण मानले तर डॉ. अनिल अवचटांमध्ये ते पुरेपूर सामावलेले आहे. ‘या बहुरूपी’ प्रतिभावंताला किती कला अवगत असाव्यात? आत्मनिर्भर वृत्तीने ते चित्रकलेकडे वळले. कागदाचा अवकाश छोटा असू दे अथवा मोठा असू दे त्यांच्या हस्तस्पर्शाने तो सप्राण होतो. श्रीमंत कागदापेक्षा कागदावरची श्रीमंती मग प्रत्ययास येते. त्यांच्या चित्रांत किती हळुवार रेषा? रेषांची किती गुंतवळ? किती ठळक रेषा? किती सौष्ठवपूर्ण रेषा? रेषारेषांची किती वैशिष्ट्यपूर्ण वाकवळणे? एवढे असूनही ‘माझी चित्तरकथा’मध्ये ते उद्गारतात:
‘‘मी काही मोठा चित्रकार नाही. मी माझ्यापुरता चित्रकार आहे. माझ्या कागदावर माझी रेघ ही स्वतंत्रपणे फिरते. त्यामधे कोणी येऊ शकत नाही. ती जशी स्वयंभू आहे. ती मन मानेल तशी फिरते. हे चित्र आजच्या फॅशनला धरून आहे, की कुणाला जुने-पुराणे वाटेल, याचाही ती विचार करत नाही. मीही फक्त सुरूवातीलाच तिच्याबरोबर असतो – ‘टेक ऑफ’पुरता.’’
‘माझी चित्तरकथा’ या आत्मनिवेदनाला प्रसन्न, संयत, अभिरूचिसंपन्न आत्मस्वर लाभलेला आहे. यात वृत्तिगांभीर्य आहे. नर्मविनोद तर पदोपदी आढळतो तो कुणाच्या वैगुण्यावर किंवा विसंगतीवर आधारलेला नाही. त्याची जातकुळी अभिजात वळणाची आहे. शब्दनिष्ठ विनोदापेक्षा बुद्धिचापल्य त्यात अधिक आहे. त्याला त्याचा म्हणून ‘अवचटस्पर्श’ आहे. त्यांची कलेकडे पाहतानादेखील समाजसन्मुख मन कुठे लपून राहत नाही. पॉल क्ले या आवडत्या चित्रकाराचे वाक्य त्यांनी उद्धृत केलेले आहे; ते पुरेसे बोलके आहे:
‘‘ज्या परिस्थितीमुळे पिळवटून जाऊन आम्ही चित्रे काढतो, ती चित्रं, ज्यांनी ती परिस्थिती निर्माण केली त्यांच्याच बंगल्यातल्या भिंती सजवतात!’’ पुढे डॉ. अवचट म्हणतात :
‘‘किती खरं आहे! आणि विदारकही. चित्रं विकत घेणारी माणसं कोण? त्यांच्याकडे इतकी महागडी चित्रं घ्यायला इतका वरकड पैसा कुठून येतो? त्या चित्ररसिकांना भोवताली पसरेल्या जनसागराची कल्पना असते काय? …अनेक प्रश्न मनात येऊन जातात.’’ हे वाचून आपण अंतर्मुख होतो. डॉ. अवचटांच्या चित्रकलेचा आस्वाद घेता घेता समाजमनाच्या तळाशी जातो हे कळतदेखील नाही. असे हे उत्कृष्ट निर्मितीमूल्ये असलेले आणि देखणे पुस्तक त्यांनी आपल्याला नुकतेच दिलेले आहे. त्यांच्या आयुष्याभराच्या चिंतनाची ही ‘चित्र+लिपी’ आहे. यापुढेही डॉ. अवचट चित्रे काढतच राहतील. अर्थात त्यांना अनेक मिती असतील. संस्कृतमध्ये ‘विचित्र’ म्हणजे ‘विशेषेन चित्रितं विचित्रम्|’ म्हणजे या अवलिया माणसाची चित्रे ‘विचित्र’ असतील. पण ती आपणास आनंद देतील हे निश्चित. पुणे-मुंबई भौगोलिक अंतर आता आणखीन कमी झालेले आहे. मुंबई महानगराचे जे यक्षप्रश्न ते पुणे या महानगराचे झालेले आहेत. पुण्याच्या सम्यक जीवनाशी एकरूप झालेल्या डॉ. अवचटांनी ते आपल्या वैचारिक आणि ललित लेखनातून प्रभावीपणे मांडलेले आहे. पण जाच सहन करत असताना आईने तन्मयतेने काढलेल्या रांगोळीमधून, ओतुरच्या डोंगरांच्या रांगांमधून आणि तुरळकपणे दिसणार्या वृक्षनक्षीमधून डॉ. अवचट जे शिकले ते सारे संचित आपल्या चित्रांमधून ओतलेले आहे. पण आपण काही तरी विशेष केले आहे असे या माणसाला वाटतच नाही. ते म्हणतात :
‘‘निसर्गाने कलावंत ही वेगळी जमात निर्माण केलीय असं मला वाटत नाही. प्रत्येकात निर्मितीची बीजं असतातच; पण पालक, शाळा, भोवतीचे कॉमेंट करणारे लोक या सगळ्यांमुळे ती रुजली जात नाहीत, बुजून जातात. अमका माणूस लेखक, तमका चित्रकार, अमका गायक… अशा जमाती का निर्माण व्हाव्यात?’’
डॉ. अवचटांच्या चित्रकलेत प्रा. मे. पुं. रेगे यांना आदिम कला दिसली. दि. के. बेडेकरांसारख्या विचारवंत, आणि मर्मज्ञ कलासमीक्षकाला या चित्रांत आगळे-वेगळे सौंदर्य दिसले. प्रभाकर पाध्ये यांच्यासारख्या अभिरुचिसंपन्न साहित्यिकाला ती आवडली. प्रा. शरच्चंद्र चिरमुले यांच्याकडे कुमार गंधर्व आले असता तुमच्या पिशवीत चित्रे असली तर यांना दाखव असा आग्रह धरला. डॉ. अवचटांनी आपल्याला कविता कळत नाही असे मंगेश पाडगावकरांना ते घरी आलेले असताना सांगितले. त्यांची चित्रे बघून पाडगावकर म्हणाले :
‘‘अहो, ही कविताच आहे. कविता कळत नाही म्हणता! कविता म्हणजे आणखी काय असतं?’’
डॉ. अवचटांची चित्रे म्हणजे अशा थोरामोठ्यांचा कौतुकाचा विषय झाला. पॉल क्ले, व्हॅन गॉव्ह, गोगँ, सिझान, पिकासो पासून अमृता शेरगिलपर्यंतच्या चित्रकारांशी त्यांनी मनाने सुखसंवाद जुळविला. रवींद्रनाथांनी साठाव्या वर्षी चित्रकलेला प्रारंभ केला. ऐंशीव्या वर्षापर्यंत त्यांनी जवळजवळ दोन हजार चित्रे काढली. डॉ. अवचटांची चित्रे असंख्यात भरतील. या पुस्तकात त्यांच्या जीवनप्रवासातील वाक-वळणे आहेत. ओतुरचे दिवस आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयातील दिवस आहेत. मेडिकल कॉलेजमधील दिवस आहेत. डॉ. सुनंदा अवचट यांच्याबरोबरचा सहजीवनाचा सुंदर आलेख आहे. मुक्ता आणि यशोदा या निरागस मनाच्या बालकांबरोबर अनेक कलांच्या साथसंगतीने घालविलेले आनंदाचे दिवस आहेत. यशो मुक्ताला एकदा म्हणाली होती – ‘‘ आपल्या बाबाला नं, मोराशिवाय काही काढताच येत नाही!’’ पुढे मोर हेच डॉ. अवचटांचे सुखनिधान ठरले. त्यांना पिसारा रेखाटायचा होता; मोर निमित्तमात्र होता. मोठ्या माणसांनी त्यांना प्रोत्साहन दिले त्याप्रमाणे जवळच्या मित्रांनी त्यांच्या या कलासाधनेला हातभार लावला. त्याविषयीची कृतज्ञताभाव डॉ. अवचटांच्या मनात ओथंबून राहिला आहे. रमेश बिडवे या मेडिकलमधील मित्राला ते विसरलेले नाहीत. त्रिभुवनच्या बाबतीत ते म्हणतात :
‘‘समुद्रात अनेक थेंब आहेत हे सगळे जाणतातच, पण प्रत्येक बिंदूत समुद्र असतोच, हे थोडके लोक जाणतात. वा:! म्हणजे त्रिभुवनने मला समुद्रही दाखवला होता आणि प्रत्येक थेंबातला समुद्रही दाखवला होता.’’
या प्रांजळ अनुभूतीत डॉ. अवचटांचे आत्मचिंतनही आहे; काव्यही आहे. पुस्तक खर्या अर्थाने सृजनशाळा आहे. ते घरोघरी गेले पाहिजे. म्हणजे घरोघरी चालणारी टी. व्ही.ची घरघर थांबेल. मुले चित्रे काढण्यात मग्न होतील.
हे पुस्तक डॉ. अवचटांचे आहे. तरी हा सुरेख रंगमेळ आहे. यात रेखा आहेत, रंगही आहेत. मनमोहक संहिता आहे. म्हणजे या पुस्तकात त्रिमितींतील एकात्मता आहे. याला सुहास कुलकर्णी यांचे संपादन आणि त्यांना सहाय्य गौरी कानेटकरांचे लाभलेले आहे. श्याम देशपांडे यांची कल्पकता इथे सत्कारणी लागलेली आहे. त्या त्या रंगाच्या कागदावर ती ती चित्रे समुचित पद्धतीने मांडलेली आहेत. त्यांना मिताक्षरांमधील बोलक्या आशयाची जोड इथे वाचणारा आणि उपभोक्ता एका विश्रब्ध सृष्टीत प्रवेश करतो. नकळत. ही जादु-ई-नगरी डॉ. अनिल अवचट या अवलिया माणसाची आहे. हा माणसांमधील ‘माणूस’ आहे याची प्रचिती येते.