माझा गुरु माझी आई

0
8830

– अनुराधा गानू

प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही रूपं बघतो. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये आपण गुरुला साक्षात परब्रह्म मानले आहे. तसा गुरु मला माझ्या आईमध्ये मिळाला.

माझा पहिला आणि कायमचा गुरु माझी आई. तिनं मला नुसतंच श्री ग णे शा किंवा अ आ इ ई शिकवलं नाही तर माझ्या आयुष्याचा श्रीगणेशाच तिनं केला. तिनं मला बोलायला शिकवलं, चालायला शिकवलं, लिहायला शिकवलं, वागायला शिकवलं. खरं म्हणजे तिनं माझ्यावर चांगले संस्कार करून जगण्याची एक दृष्टीच मला दिलीय. पुढे शाळेत शिकवलेल्या पुस्तकी शिक्षणापेक्षाही महत्त्वाचं शिक्षण तिनं मला दिलेय. एक माणूस म्हणून जगण्याचं.
तिनं मला केवळ उपदेशाचे डोस पाजून, धाक दाखवून, मारून मुटकून नाही शिकवलं, तर तिच्या संस्कारांतून, तिच्या वागण्या-बोलण्यांतून, तिच्या कृतितून, तिच्या संयमातून मी एकेक गोष्टी शिकत गेले; घडत गेले. तिनं दिलेल्या शिकवणीचं, तिनं केलेल्या संस्काराचं बोट धरून न अडखळता चालतेच आहे अजूनपर्यंत!
माझी आई खरंच सौंदर्यवान होती. पण त्याहूनही तिनं केलेले संस्कार जास्त सुंदर होते. अतिशय सुंदर, शांत, सात्त्विक, सोज्वळ चेहरा आणि तेवढीच साधी स्वच्छ, निर्मळ राहणी. रूप आणि गुण हे दोन्ही आईच्या ठिकाणी विशेषत्वाने एकवटलेले. त्यामुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसायचं. चेहर्‍यावर त्रागा, नाराजी इतकंच काय पण कधी एक आठीसुद्धा आम्ही बघितली नाही. आरोग्याचं तर तिला जणू वरदानच मिळालं होतं. शेवटपर्यंत म्हणजे अगदी वयाच्या ९३ व्या वर्षिसुद्धा स्वत:ची कामं ती स्वत:च करत असे. तिला कधीही विचारा, ‘‘आई, कशी आहेस?’’ की एका शब्दात उत्तर मिळायचं – ठणठणीत! स्वावलंबन आणि चेहरा कायम हसतमुख ठेवणं, हे मी तिच्याचकडून शिकलेय.
आलेल्या संकटांवर, अडचणींवर धैर्याने, शांतपणे, मनाचा तोल ढळू न देता, संयमाने कशी मात करायची हे कृतितून तिनं आम्हाला शिकवलं. एकदा माझ्या वडिलांना मुदतीचा ताप (टायफॉइड) आला होता. त्या काळी ह्या तापावर फारशी औषधं नव्हती. त्यांतून माणूस क्वचितच वाचत असे. आम्ही मुलं तेव्हा लहान होतो. ४२ दिवसांचा ताप उलटला, पण आई डगमगली नाही. नंतर एकदा माझे वडिल ज्या कंपनीत कामाला होते ती कंपनीच बंद पडली. वडिलांचा पगार थांबला. घरात मिळवणारं आणखी कोणीच नव्हतं. त्याही प्रसंगाला तिनं तितक्याच धैर्यानं आणि शांतपणे तोंड दिलं. माझी सख्खी आत्या दोन वर्षे अंथरूणाला खिळून होती. तिचंही सगळं आईनेच केलं. माझ्या काकूची शेवटची दोन वर्षे तिनंच सेवा केली. १९६१ मध्ये पुण्यात पानशेत धरण फुटलं. प्रचंड पूर आला. अनेकांची घरे जमिनदोस्त झाली. वीज ठप्प झाली. माझ्या आतेबहिणीच्या घरातील सर्व सामान वाहून गेलं. १० माणसांच तिचं अख्ख कुटुंब आमच्याकडे राहायला आलं. त्यांचही आईनंच केलं. पण कधी तक्रार नाही, कुरकुर नाही की कधी कपाळावर आठी नाही.
नात्यांतल्या प्रत्येकाचं तिला कौतुक होतं. कोणाच्याही दुर्गुणांचा पाढा तिनं कधी वाचला नाही. ती म्हणायची प्रत्येकांतले चांगले गुण तेव्हढेच आपण बघावेत, बाकी सर्व सोडून द्यावे. आपल्या बोलण्यांतून, वागण्यातून कळत नकळतसुद्धा दुसर्‍याचं मन कधी दुखवू नये. हा संस्कार तिनं आपल्या नातवंडांपर्यंत रुजवला आहे. ‘‘अरेला कारे’’ म्हणून काहीही साध्य होत नाही. मनं मात्र दुखावतात. वादाचे विषयच टाळले तर आयुष्य खूप सुखकारक होऊ शकतं हा तिचा संदेश. परिस्थिती बेताची असूनसुद्धा मनातली चलबिचल तिनं कधी प्रदर्शित केली नाही. ‘दु:ख पोटाच्या आत आणि सुख ओठाच्या बाहेर’ असावे असं ती नेहमी आम्हांला सांगायची. आई तर ती आमची होतीच; पण प्रत्येक नातं तिनं प्रेमाने, जिवापाड जपलं होतं. सगळ्याच नात्यांना तिनं आपल्या परीने योग्य न्याय दिला होता. त्यामुळे सगळ्यांनाच ती हवी हवीशी वाटायची. सगळ्यांनाच तिचा आधार वाटायचा.
जुन्या पिढीबरोबर त्यांच्या विचाराने आणि नवीन पिढीबरोबर त्यांच्या विचाराने ती रमत गेली. गरीब मुलांना शोधून कधी फीसाठी, कधी वह्या-पुस्तकांसाठी, कधी चप्पलांसाठी, कधी कपड्यांसाठी ती जमेल तेव्हढी मदत करायची. त्यातच तिनं आपला देवधर्म मानला, आपली व्रतवैकल्य मानली. दुसर्‍याला मदत करणं हा तिचा धर्मच होता. तिची देवावर श्रद्धा होती पण कर्मकांडावर नव्हती. मी आणि माझा दादा जेव्हा काही सामाजिक काम करायला जायचो तेव्हा ती म्हणायची, ‘‘चालले लष्कराच्या भाकरी भाजायला.’’ पण हा वारसा तर तिनंच आम्हांला दिला होता. हे संस्कार तर तिनंच आमच्यावर केले आहेत. दासबोध, ज्ञानेश्‍वरी तिनं वाचले नाहीत. पण ते ग्रंथ ती जगली हे तर खरंच.
माणसं तीन प्रवृत्तीनं जगतात. विकृती, प्रकृती आणि संस्कृती. विकृती म्हणजे जे माझं आहे ते माझंच; पण दुसर्‍याचंही ओरबाडून घ्यायचं. स्वत:च्या पोळीवर तूप घ्यायचंच पण दुसर्‍याची पोळी तूपासकट आपल्या पानांत ओढून घ्यायची. प्रकृति म्हणजे माझे आहे ते मला पुरे. दुसर्‍याचं मला नको. मला माझी पोळी तूप मिळाली, पुरे झालं. पण संस्कृती म्हणजे मला कमी पडले तरी चालेल पण दुसर्‍याची गरज आधी भागवायची. आपण पोळी-तूप खात असताना, दुसरा आला तर त्याला तूपासकट आपल्यांतली अर्धी पोळी द्यायची. त्याची गरज आधी भागवायची. याच संस्कृतीत ती जगली. ही संस्कृती तिनं शेवटपर्यंत जपली. ना त्यांत काय किंवा शेजारी काय, कोणाची कसली अडचण असली तर आई तिथे जाणारच. आमच्या नातलगांपैकी कितीतरी नातलगांची लग्नं, बाळंतपणं, मंगळागौरी, आमच्या घरी झाल्येत. नाही म्हटलं ती आर्थिक झळ तिला बसली असेलच ना? पण कधी तक्रार नाही. आमच्या घरी पाहुणा नाही असा एक दिवसही गेला नाही. सगळ्यांच ती आनंदानं करायची. पाहुण्यांच्या पानांत तूप वाढायचेच. मग आठ दिवस आपण तूप न खाता कसर भरून काढायची. पण घराचा आब राखणं महत्त्वाचं.
तिला खूप शिकायचं होतं. स्वत:च्या पायावर उभं राहायचं होतं. ती म्हणायची अगं बाई प्रत्येकानं, मग ती मुलगी असो वा मुलगा शिक्षण हे तर घ्यायलाच पाहिजे आणि स्वावलंबी सुद्धा व्हायलाच हवं. वेळ काळ सांगून येत नसते. पण तिचा काळ जुना होता. दुसरी नंतर शिक्षण थांबलं. १२ व्या वर्षी लग्न झालं. मग शिकायचं राहूनच गेलं. या दोन गोष्टींचा सल मात्र तिच्या मनात राहून गेला कायमचा. मग तिनं आम्ही दोघी बहिणी आणि आमची वहिनी, आम्हांला शिकायला प्रोत्साहन दिलं. स्वत:च्या पायावर उभं राहायला शिकवलं. घरच्या कामाची जबाबदारी, नातवंडांची जबाबदारी स्वत:वर घेतली. दुपारी मस्तपैकी झोपलेली मी तिला कधीच बघितली नव्हती. सतत कामात गुंतून राहणे हे तिनंच मला शिकवलं. ती म्हणायची मन आणि डोकं कशात तरी व्यस्त असले म्हणजे नको ते विचार मनाला शिवतसुद्धा नाहीत.
माझी मुलगी तिला म्हणायची, ‘‘आजी, नेहमी म्हणतेच, देवानं मला सगळं भरभरून दिलंय. काही कमी नाहीयेय. मग दिवसभर जप का ग करतेस?’’ यावर तिचं उत्तर असायचं, ‘‘अगबाई, देवानं मला खरंच सगळं दिलंय. जप करून आता एकच मागणं आहे देवाकडे – मला चालता बोलता मरण यावं. माझं करायची वेळ कोणावरही येऊ नये.’’
आणि झालंही तसंच. देवानं तिचं मागणं, तिचा जप मान्य केला. आणि तिला अलगद उचलून नेलं. दुपारी एक वाजता ठणठणीत असलेली माझी आई चार वाजता प्रथमच निवांतपणे झोपी गेली. तिचं अस्तित्व संपून गेलं. अगदी बटन दाबून दिवा ऑफ करावा तसं.
…………