माजी सरपंचांवरील हल्ल्याप्रकरणी कारमालकास अटक

0
4

>> हल्ल्यात वापरलेली कार देखील जप्त; मांद्रे पोलिसांकडून अन्य संशयितांचा शोध सुरू

मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर हल्ला प्रकरणी वाहनमालक पुंडलिक हरिजन याला काल अटक करण्यात आली. त्याचाही ह्या हल्ल्यात सहभाग होता. तसेच ह्या हल्ल्यात वापरलेली कार देखील मांद्रे पोलिसांनी जप्त केली. मात्र ज्यांनी प्रत्यक्षात हल्ला केला, ते बुरखाधारी हल्लेखोर अद्याप सापडलेले नाहीत. मांद्रे पोलीस त्यांच्या शोधात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर यांनी दिली.

बुधवारी सकाळी कारमधून आलेल्या 5 बुरखाधारी व्यक्तींनी मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर खुनी हल्ला केला होता. ही घटना आस्कावाडा-मांद्रे येथील मठाजवळ घडली होती. कारमधून आलेल्या 5 बुरखाधारी हल्लेखोरांनी ‘तुका मायकल जाय’ अशी विचारणा करत थेट लोखंडी सळईने त्यांच्यावर हल्ला केला होता.
या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी कारवाई करत काल हल्ल्यात वापरलेले वाहन (क्र. जीए-08-के-5119) जप्त केले. तसेच चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले होते, त्यापैकी एका सोडण्यात आले, तर वाहनमालक पुंडलिक हरिजन याला या प्रकरणी अटक करण्यात आली. त्याचा ह्या प्रकरणात सहभाग आढळून आला आहे.

आरोलकरांकडून कोनाडकरांची विचारपूस
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी काल महेश कोनाडकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.
अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार : आरोलकर
महेश कोनाडकरांच्या भेटीनंतर स्थानिक पत्रकारांकडे बोलताना, ज्यांनी या प्रकरणात आपला हात असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या विरोधात आपण अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा आमदार जीत आरोलकर यांनी दिला. या प्रकरणात जे कोणी गुंतलेले आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असेही आरोलकर यांनी सांगितले.