माजी मुख्यमंत्री कमलनाथ, अशोक गेहलोत यांच्या पुत्रांना काँग्रेसची उमेदवारी

0
15

नकुलनाथ, वैभव गेहलोत उतरणार रिंगणात; लोकसभेसाठी 43 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी जाहीर केली. दुसऱ्या यादीत काँग्रेसने 43 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. 5 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांचा त्यात समोवश आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांना छिंदवाडामधून, तर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांना जालोरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी काँग्रेसने 8 मार्च रोजी 39 जणांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यात राहुल गांधींसह काही महत्त्वाच्या उमेदवारांचा समावेश होता. अशा प्रकारे काँग्रेसने आतापर्यंत 82 नावांची घोषणा केली आहे.

दिल्लीत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि अजय माकन यांनी दुसरी यादी जाहीर केली. 43 उमेदवारांमध्ये 10 जण खुल्या वर्गातील, 13 जण ओबीसी, 10 एसी, 9 एसटी आणि एका मुस्लीम उमेदवाराचा समावेश आहे.
काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) दुसरी बैठक सोमवारी सायंकाळी पार पडली होती. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि सीईसी सदस्य उपस्थित होते. या बैठकीला संबंधित राज्यांतील काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. या बैठकीनंतर काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी समोर आली.

काँग्रेसने दुसऱ्या यादीत आसाम, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंड या 5 राज्यांसह केंद्रशासित प्रदेश दमण व दीवमधील उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने आसाममधील सर्वाधिक 12 जागांवरील उमेदवार घोषित केले आहेत. राजस्थान आणि मध्यप्रदेशमधील प्रत्येकी 10 उमेदवार जाहीर केले आहेत. गुजरातमधील 7 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. उत्तराखंडमधील 3, तर दीव व दमणमधील 1 उमेदवार काँग्रेसने जाहीर केला आहे.

काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांना आसामच्या जोरहाट येथून उमेदवारी देण्यात आली आहे. नकुलनाथ यांना मध्य प्रदेशच्या छिंदवाडा मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. राजस्थानच्या जालोर लोकसभा मतदारसंघातून वैभव गेहलोत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवारी यादीतील 76.07 टक्के उमेदवारांचे वय 60 पेक्षा कमी आहे. या तरुण उमेदवारांना जनता निवडून देईल, अशा विश्वास अजय माकन यांनी व्यक्त केला.

दुसऱ्या यादीतही काँग्रेसचे
गोव्यातील उमेदवार गायब

काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काल जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत गोव्यातील दोन्ही जागांवरील उमेदवाराच्या नावांचा समावेश नाही. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी मागील आठवड्यात जाहीर केली होती, त्यात सुध्दा गोव्यातील दोन्ही जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली नव्हती. भाजपचा दक्षिण गोव्यातील उमेदवार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार जाहीर केले जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांच्या नावांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवाराच्या नावांची छाननी करून ती केंद्रीय निवडणूक समितीकडे सादर करण्यात आली आहेत. मात्र पक्षाच्या उमेदवारांच्या दोन याद्या समोर आल्या तरी त्यात अद्याप गोव्यातील उमेदवार जाहीर झालेले नाहीत.