माजी वीजमंत्री व माजी आमदार आलेक्स सिक्वेरा यांची कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती काल कॉंग्रेस प्रवक्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी पत्रकार परिषदेतून दिली. सिक्वेरा यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांना पक्ष सदस्य म्हणून निलंबित करण्यात आले आहे.
गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश काढल्याचे प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षविरोधी कारवाया करणारे कॉंग्रेसचे दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सुभाष फळदेसाई यांना आलेक्स सिक्वेरा हे सारखे पाठीशी घालत होते. लोकसभा निवडणुकीच्या दिवशी फळदेसाई यांनी कॉंग्रेसचे दक्षिण गोवा जिल्हा कार्यालय बंद ठेवल्याने पक्षाची मोठी गैरसोय झाली होती. पक्षाचे दिवंगत नेते राजीव गांधी यांच्या जयंती कार्यक्रमाला त्यांनी पक्षविरोधी कारवाया करणार्या दोघा नेत्यांना आणून कार्यक्रम केला होता. या पार्श्वभूमीवर पक्षाने सुभाष फळदेसाई यांना पक्षातून निलंबित केल्यानंतर आलेक्स सिक्वेरा यांनी सुभाष फळदेसाई यांची बाजू घेताना पक्षावर टीका केली होती व ती काही वृत्तपत्रातही प्रसिध्द झाली होती. त्यामुळे आलेक्स सिक्वेरा याना पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले.
‘मद्य संस्कृती’च्या मुद्याला कॉंग्रेसची बगल
दरम्यान, दारू पिणे ही गोव्याची संस्कृती आहे असे जे विधान भाजपचे प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिश्किता यांनी केले आहे. त्याविषयी तुमचे काय म्हणणे आहे असे पत्रकारांनी कुतिन्हो यांना विचारले असता त्या म्हणाल्या की सध्या भाजप व मगो यांच्यात गोव्याच्या संस्कृतीवर भांडण सुरू आहे, असे सांगून त्यांनी मूळ प्रश्नाला बगल दिली.