माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन

0
278

माजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह (८२) यांचे काल रविवारी दिल्लीत निधन झाले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. गेल्या सहा वर्षांपासून ते कोमामध्ये होते. दि. २५ जून रोजी त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. काल रविवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचे सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी निधन झाले. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह होती.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांनी १९९९ ते २००४च्या दरम्यान संरक्षण, विदेश आणि अर्थ मंत्रालयाचा कारभार सांभाळला होता. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने लढवलेल्या २०१४च्या निवडणुकीत भाजपने त्यांना बाडमेर मंतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारली होती. त्यावेळी नाराज झालेल्या जसवंत सिंह यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेत अपक्ष निवडणूक लढवली. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली. त्याचवर्षी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे ते सहा वर्ष कोमामध्ये होते. भारतीय लष्करात असलेल्या जसवंतसिंह यांनी नंतर राजकारणात पाऊल टाकले. भाजपची स्थापना करणार्‍या नेत्यांमध्ये जसवंतसिंह यांचाही सहभाग होता. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात त्यांनी भाजपचे प्रतिनिधित्व केले होते.

पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांना दुःख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना, जसवंतसिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे ते देशासाठी लढले. त्यांच्या निधनाने दुःखी असल्याचे ट्विट केले आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना, जसवंतसिंह हे त्यांच्या बौद्धिक क्षमतांसाठी आणि देशाच्या सेवेसाठी कायम स्मरणात राहतील असे म्हटले आहे.