माजी कसोटीपटू नाडकर्णी यांचे निधन

0
120

भारताचा अष्टपैलू खेळाडू बापू नाडकर्णी यांचे वयाच्या ८७व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. बापू नाडकर्णी पवईतील हिरानंदानी गार्डन येथे मुलीकडे राहत होते. तिथेच काल त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

बापू नाडकर्णी यांची जगातील सर्वात कंजुश फिरकी गोलंदाज अशी ओळख होती. ते एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू होते. १९५५ ते १९६८ यादरम्यान ते भारताकडून कसोटी सामने खेळले होते. १९५१-५२ मध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या संघातून त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. फिरोजशहा कोटला मैदानावर १६ डिसेंबर १९५५ रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात बापूंनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पहिले पाऊल ठेवले. भारतीय क्रिकेट संघाकडून बापू ४१ कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी ८८ बळी टिपले व फलंदाजीतही उपयुक्त योगदान दिले. १ शतक व ७ अर्धशतकांसह १ हजार ४१४ धावा त्यांच्या नावावर आहेत. कसोटीत सलग २१ षटके निर्धाव टाकण्याचा विश्वविक्रम बापूंनी १४ जानेवारी १९६४ रोजी इग्लंडविरुद्ध नोंदविला होता.