>> अंत्यसंस्काराला दुर्गाभाट फोंड्यात लोटला जनसागर
फोंडा मतदारसंघाचे माजी आमदार तथा निवृत्त पोलीस उपअधीक्षक लवू मामलेदार यांच्या पार्थिवावर काल रविवारी दुपारी दुर्गाभाट-फोंडा येथील स्थानिक स्मशानभूमीत शोकाकूल स्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले. शनिवारी दुपारी बेळगाव येथे लवू मामलेदार यांना रिक्षा चालकाने क्षुुल्लक कारणांवरून मारहाण केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता.
शनिवारी रात्री उशिरा लवू मामलेदार यांचे पार्थिव फोंडा येथे दाखल झाले. त्यानंतर रात्री उपजिल्हा इस्पितळामधील शवागरात पार्थिव ठेवण्यात आले. रविवारी सकाळी दुर्गाभाट येथील निवासस्थानी दाखल करण्यात आले.
हजारो लोकांची गर्दी
मालेदार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी दुपारपर्यंत हजारो लोकांनी गर्दी केली. यात सभापती रमेश तवडकर, कृषिमंत्री रवी नाईक, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, माजी खासदार विनायक तेंडुलकर, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, आमदार गणेश गावकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गिरीश चोडणकर, मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, माजी मंत्री महादेव नाईक, माजी मंत्री दीपक पाऊसकर, फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष आनंद नाईक, नगरसेवक रितेश नाईक, नगरसेवक विश्वनाथ ऊर्फ अपूर्व दळवी, केतन भाटीकर, राजेश वेरेकर तसेच अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.
ढवळीकर गहिवरले
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना मामलेदार यांचे पार्थिव पाहून अश्रू अनावर झाले. यावेळी ढवळीकर यांनी मामलेदार यांच्या स्मृतींना उजाळा दिला. ढवळीकर हे एकेकाळचे लवू मामलेदार यांचे शालेय मित्र होते. लवू मामलेदार यांना फोंड्यातून मगो पक्षाची सुदिन ढवळीकर यांनी उमेदवारी दिली होती. त्यावेळी निवडून येऊन मामलेदार यांनी ढवळीकर यांचा विश्वास सार्थ ठरवला होता.
कर्नाटकने कारवाई करावी रवी नाईक यांची मागणी
काल रविवारी गोव्यात माजी आमदार लवू मामलेदार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बोलताना फोंड्याचे आमदार आणि कृषिमंत्री रवी नाईक यांनी मामलेदार यांच्या आकस्मित निधनावर खंत व्यक्त केली. यावेळी रवी यांनी, कर्नाटक सरकारने या प्रकरणी तपास करत संशयितावर व दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. मामलेदार यांची मुले बेळगाव येथे शिकत असल्याने त्यांची सतत तिथे ये-जा असायची. मामलेदार यांना त्यांच्या गाडीची रिक्षाला धडक बसल्याची माहितीही नव्हती. त्यांच्याकडून जाणून बुजून हे कृत्य झाले नव्हते. मात्र तरीही मामलेदार यांना मारहाण करण्यात आली. गोव्यातील अनेक लोकांची बेळगावमध्ये ये-जा सुरू असते. अशा घटना घडत राहिल्या तर गोव्यातील लोकांसाठी बेळगावला जाणे कठीण होऊन बसेल. याचा विचार करून कर्नाटक सरकारने या प्रकरणी ठोस पावले उचलत कारवाई करावी अशी मागणी रवी नाईक यांनी केली.