>> आंदोलक शेतकर्यांचा निर्धार, ट्रॅक्टर मोर्चा रद्द
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सिंघू सीमेवर गेले ३६ दिवस आंदोलन करत असलेल्या शेतकर्यांनी काल जोवर केंद्र सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोवर नवीन वर्ष साजरे करणार नाही असा इशारा दिला आहे. आंदोलन करत असलेल्या शेतकर्यांसाठी अद्यापपर्यंत कोणतीही दिलासादायक गोष्ट घडलेली नाही. त्यामुळे शेतकर्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र काल गुरूवारी शेतकर्यांनी आपला टॅ्रक्टर मोर्चा रद्द केला.
बुधवारी झालेल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात सरकारने वाढते वीजदर आणि पेंढा जाळल्याबद्दल दंड याबद्दल शेतकर्यांच्या चिंतेकडे लक्ष वेधले होते. परंतु ती नवे वर्ष साजरे करण्यासाठी पुरेशी चांगली बातमी नसल्याचे मत शेतकर्यांनी व्यक्त केले. अद्याप नवीन शेती कायदे रद्द करणे आणि त्यांच्या पिकांना किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी देणे बाकी असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
बुधवारी शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात नव्या कृषी कायद्यांबाबत झालेल्या चर्चेत कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे शेतकर्यांचे आंदोलन चालू राहणार आहे. मात्र शेतकर्यांनी गुरुवारी आयोजित केलेला ट्रॅक्टर मोर्चा रद्द केला आहे. तसेच शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चा सुरू राहणार असून आता नववर्षात ४ जानेवारीला चर्चेची नवी फेरी होईल.
दरम्यान, बुधवारी नवे कायदे रद्द न करण्याचा निर्धार केंद्राने कायम ठेवला. कायदे करण्याच्या प्रक्रियेप्रमाणे ते मागे घेण्याची प्रक्रियाही प्रदीर्घ असते, असे केंद्राकडून शेतकरी नेत्यांना स्पष्ट सांगितले आहे. किमान आधारभूत मूल्याची हमीबद्दल लेखी आश्वासन देण्यास केंद्र तयार असून हमीभाव पूर्वीप्रमाणे कायम राहतील, याचाही केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी पुनरुच्चार केला.