मागण्या मान्य न केल्यास संप करणार

0
5

>> सरकारला कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा इशारा

कदंब वाहतूक महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगारवाढ व इतर प्रश्नावर येत्या ऑक्टोबर 2023 पर्यत निर्णय न घेतल्यास संप करण्याचा इशारा आयटक या कामगार संघटनेचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी येथील आयटकच्या कार्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना काल दिला.

कदंब वाहतूक मंडळाचे कामगार आयटक या कामगार संघटनेशी सलग्न आहेत. कदंब वाहतूक महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा विषय काही वर्षे प्रलंबित आहे. कदंब कर्मचाऱ्यांच्या सुमारे 34 महिन्यांच्या थकबाकीचा प्रश्न प्रलंबित आहे. कदंब व्यवस्थापनाने कामगारांचा भविष्य निर्वाह निधी 12 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आणल्याने कर्मचाऱ्यांना बरेच नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच, कामगारांचे इतर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, असे फोन्सेका यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व संबंधितांकडे कदंब महामंडळाच्या कामगारांचे विविध प्रश्न मांडण्यात आले आहेत. सर्वांनी हे सगळे प्रश्न सोडविण्याचे केवळ आश्वासन दिले आहे. प्रत्यक्षात कृती काहीच केली जात नाही. आता, येत्या ऑक्टोबर 2023 अखेरपर्यंत कदंब महामंडळाच्या कामगारांच्या प्रश्नावर तोडगा न काढण्यास संपाची रीतसर नोटीस दिली जाणार असून मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभरात आंदोलन केले जाणार आहे, असा इशारा फोन्सेका यांनी दिला. राज्यातील बालरथ कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा देऊन आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. आता, त्याच धर्तीवर कदंब महामंडळाच्या कर्मचारी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.