मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा चालूच राहील

0
93
सात सुरक्षा रक्षकांनी कालपासून आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले. (छाया : किशोर स. नाईक

अजितसिंह राणे : आमरण उपोषणास प्रारंभ
गोवा नोकर भरती सोसायटीच्या कर्मचार्‍यांची मागणी सरकारने पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने लेखी आश्‍वासन देण्याचे टाळल्याने संतप्त बनलेल्या कर्मचार्‍यांनी काल दुपारपासून आमरण उपोषणास सुरूवात केली आहे.माधवी वायंगणकर, अर्चना नाईक, विठोबा नाईक, सुरेंद्र नाईक, सुहास पालेकर, शाबी पेडणेकर, सागर नारगी व शंभू गावस यांचा आमरण उपोषणास बसलेल्यांमध्ये समावेश आहे.
मागण्या पूर्ण होईपर्यंत कामगारांचा लढा चालू राहील, असे सांगून सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळेच कामगारांना हा मार्ग पत्करावा लागला, असे कामगार महासंघाचे अध्यक्ष अजितसिंग राणे यांनी सांगितले. आपण उपोषणास का बसला नाहीत, असा पत्रकारांनी राणे यांना प्रश्‍न केला असता, आपण उपोषणास बसल्यास सरकार राजकारण करीत असल्याचा आपल्यावर आरोप करील. त्यामुळेच आपण उपोषणास बसलो नाही, असे राणे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी चर्चेस बोलावल्यास तयार : राणे
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी कामगारांच्या प्रश्‍नावर चर्चेस बोलावल्यास आपण जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. सोसायटीच्या कर्मचार्‍यांचा विषय नवा नसून पर्रीकर यांच्या काळातही तो लावून धरला होता.
पार्सेकर यांनाही त्याची कल्पना असावी, असे राणे म्हणाले. स्वाती केरकर यांचेही दुपारी झालेल्या जाहीर सभेत भाषण झाले. त्यांनी सरकार मानवी हक्कांचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप केला.
प्रक्रिया पूर्ततेसाठी अवधीबाबत संबंधितांना भान हवे होते
उपोषणप्रश्‍नी मुख्यमंत्री पार्सेकरांचे वक्तव्य
रोजगार भरती सोसायटीच्या कर्मचार्‍यांना न्याय देण्याच्या अनुषंगाने सरकारी पूर्ततेसाठी अवधी हवा याचे भान त्यांची दिशाभूल करणार्‍यांना असायला हवे होते, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल सांगितले. तसेच या कर्मचार्‍यांवर आपले सरकार मुळीच अन्याय करणार नसल्याचेही ते म्हणाले.
आपण दोन दिवसांपूर्वीच सर्व कर्मचार्‍यांना न्याय देण्याचे जाहीर आश्‍वासन दिले होते. असे असतानाही उपोषणास बसण्याची गरज काय, असा प्रश्‍न त्यांनी केला. सोसायटीच्या कर्मचार्‍यांना मानव संसाधन महामंडळात सामावून घेण्याचे सरकारने ठरविले आहे. त्यामुळेच जाहिरात प्रसिद्ध करून मुलाखती घेण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे ते म्हणाले.
उपोषणास बसणार्‍यांनी सरकारवर विश्‍वास ठेवला पाहिजे. आपले सरकार सामान्य लोकांवर अन्याय करणारे नाही, असे पार्सेकर यांनी सांगितले.