चंचीतील सुपारी ः 2
- डॉ. जयंती नायक
गोव्यात आज शेतीसंस्कृती हळूहळू लुप्त होत चालली आहे. चिखलकाल्यासारखा उत्सव मुलांना मातीशी, त्याच्या मूळ संस्कृतीशी अजिजीनं जोडणारा आहे. मुलांनाच नाही तर आपल्या मातीपासून दूर जात चाललेल्या मोठ्यांनासुद्धा तो तिच्या सान्निध्यात परत आणणारा आहे.
चिखलकाला! चिखल कालवण्याचा आणि तो अंगाला माखून घ्यायचा एक आगळा-वेगळा, अद्वितीय असा सोहळा! मुळात आदिमांनी निर्मिलेला आणि तद्नंतर कालप्रवाहात अभिजन संस्कृतीत पोहोचलेला हा उत्सव. आनंद, उत्साह आणि भक्तिभाव या तीन रसांत आकंठ नहालेला हा उत्सव मानव आणि प्रकृती यांचे अतूट नाते प्रमाणित करणारा आहे.
गोव्यात गेल्या आठवड्यात म्हणजे आषाढ शुद्ध द्वादशीला सांगे, फोंडा, डिचोली आणि मार्शेल या चार ठिकाणी हा उत्सव संपन्न झाला. यांतील मार्शेलच्या चिखलकाल्याला गोवा सरकारने राज्य उत्सव म्हणून जाहीर केल्याने आणि पर्यटन खात्याने जाहिरात केल्याने याला प्रचंड गर्दी होती, राजकीय थाट होता. मी प्रत्यक्षात या उत्सवाला उपस्थित राहिले नसले तरी त्याची जी क्षणचित्रे प्रसिद्धी माध्यमांतून तसेच सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली, त्यावरून सहभागी झालेल्या खेळगड्यांचा, भाविकांचा प्रचंड उत्साह बघितला आणि मन खूपच प्रसन्न झाले. मन प्रसन्न झाले म्हणण्यापेक्षाही अंतर्मनातून आनंद उमलला. मनात आलं, या उत्सवाच्या निमित्ताने का होईना, येथील माणसांचं मातीशी नातं वृद्धिंगत होत आहे.
चिखलकाला हा पुरुषांचा उत्सव. त्यामुळे लहान-थोर पुरुष मंडळी यात सहभागी झाली होती. सर्वांगाला चिखल माखून पारंपरिक खेळ-मस्ती करीत होती. विविध कृष्णलिला सादर करीत होती. गोकुळातील कृष्ण-गोपांचे खेळ खेळत होती. प्रत्येक खेळगडी नखशिखान्त चिखलाने माखला होता. त्यांच्या आनंदाला उधाण आले होते, सर्वांगाला चंदनाची उटी सारवल्याप्रमाणे त्यांच्या तोंडावर आनंद ओसंडून वाहत होता. आपण ह्या लौकिक जगाचे वारस नाही, तर कोणत्या तरी अलौकिक जगाचे गडी आहोत, आपण खरोखर त्या कृष्ण-कन्हैयाचे गोकुळातील सवंगडी आहोत, ही भावना त्यांच्या डोळ्यांत भरून दिसत होती.
त्या खेळगड्यांना बघून मी मनात म्हटलं, धन्य बाबा तुम्ही, श्रीकृष्णाचे सवंगडी बनून का होईना, श्रीकृष्ण-गोपाचे सोंग घेऊन का होईना, या मातीचा तुम्ही अंगिकार केलात. तिचा लेप अंगी धारण केलात. तिच्या कणाकणाचा गंध तुम्ही नाकाने हुंगलात. आईच्या उदरातून नवजात शिशूने रक्तरंजित रूपात जन्म घ्यावा, त्याप्रमाणे तुमचा हा अवतार आहे! आज तुम्हाला मातीच्या मातृरूपाचा निश्चितच दृष्टांत झाला असेल… आता त्या मातेची गाथा गात रहा… गात रहा… पुढं जन्म घेणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी….
चिखलकाला हा श्रीविठ्ठलाच्या आराधनेचा, त्याच्या उपासनेचा उत्सव, ही धारणा आज गोव्यातील लोकमानसांत दृढ झाली आहे. श्रीविठ्ठल म्हणजे श्रीकृष्ण. त्यातल्या त्यात आपल्या गोपसंवगड्यांसोबत गोकुळात अनेक लिला करणारा, पावसाच्या चिखलात खेळ खेळणारा बालकृष्ण असा समज असल्याने आषाढ शुद्ध द्वादशीला विठ्ठल- ज्याला पांडुरंग म्हणूनही उल्लेखले जाते- गोव्यात त्याच्या मंदिरांच्या प्रांगणात हा चिखलकाल्याचा उत्सव परंपरेने आयोजित केला जातो. परंतु हे आजचे सत्य असले तरी माझ्या मते या उत्सवाचे मूळ खूपच खोल आहे. संबंधित देवालयांनी कदाचित या उत्सवाची सुरुवात श्रीविठ्ठल मंदिर तिथे बांधल्यानंतर सुरू केली असेल, परंतु मृतिकेची पूजा, चिखलाची पूजा करण्याची परंपरा या भूमीत खूपच आधीची. या भूमीत वसाहत केलेल्या आमच्या शेतीवत्सल पूर्वजांना जेव्हा माती आणि चिखलाच्या निर्मितिशक्तीचा दृष्टांत झाला, तेव्हाच त्यांनी तिची पूजा करायला सुरुवात केली.
आदिमांनी पृथ्वीला म्हणजेच मातीला स्त्रीतत्त्व आणि पावसाला पुरुषतत्त्व मानलेले आहे. माती आणि पावसाचा जेव्हा संयोग होतो, तेव्हाच चिखल बनतो. या चिखलातून नवनिर्मिती होते. या नवनिर्मितीचा आदिमांनी वेगवेगळ्या परंपरांच्या रूपाने आनंदोत्सव साजरा केलेला आहे. प्रसंगी माती आपल्या अंगावर धारण केलेली आहे. शिगम्याची धुळवड ही अशीच परंपरा, जिने आज गुलालोत्सवाचे रूप घेतलेले आहे. मात्र ही माती सुकी असते, धूळरूप असते. गोव्यातील आजची संस्कृती ही विभिन्न संस्कृतींच्या समन्वयातून उदयाला आलेली आहे, त्याचे हे एक प्रमाण आहे.
मूळ हिन्दू, परंतु पोर्तुगीजांच्या धर्मछळामुळे ख्रिस्ती धर्म गळी पडलेल्या गोव्यातील ख्रिस्ती समाजामधील सांज्यांव नाचण्याची परंपरा हीसुद्धा माझ्या मते चिखलाचाच आनंदोत्सव साजरा करण्याचा उत्सव आहे. दरवर्षी 24 जूनला होणाऱ्या उत्सवाच्या दिवशी हमखास संततधार पाऊस पडतो. किंबहुना आठवडाभर तो पडतच असतो. नदी-नाल्यांना पूरही आलेला असतो. पावसाच्या मुसळधारांनी जमीन चिप्प भिजून चिखलाचे रूप घेते. या अशा वातावरणात ख्रिस्ती समाजातील पुरुषमंडळी, ज्यांत पोरंटोरंसुद्धा असतात, ती हातात पिडे म्हणजे माडाच्या चुडतांचा पुढील दांडा घेऊन घरोघरी भेट देतात. पारंपरिक गाणी गात, घराच्या अंगणात तो दांडा जमिनीवर आपटून चिखल कालवतात.
आणखीही काही परंपरा आहेत ज्या चिखलाशी जुळलेल्या आहेत. पाऊस जमीन भिजवतो, त्यामुळे जमिनीचा चिखल होऊन त्यांतून बीज रुजून वर येते. परंतु बीज चांगलं रूजून येण्यासाठी जमिनीचे चांगल्या चिखलात रूपांतर होणे गरजेचे असते. त्यासाठी तिची मशागत करावी लागते. आदिमांना याची जाणीव होती. औत-औजारे यांचा शोध लागण्यापूर्वीचा हा काळ. या काळी त्यांनी पायांनीच माती तुडवली. ज्या वस्तू आपल्या हाताशी उपलब्ध होत्या, त्या वापरून मातीला पावसाच्या पाण्यात एकजीव केले. उस्फूर्तपणे, बेधुंद होऊन केलेल्या या कृतीतून मग नृत्याविष्कार जन्माला आले. माझ्या मते, गोव्यातील चिखलासंबंधी नृत्य-खेळ प्रथा या अशाच उदयाला आलेल्या आहेत.
चिखलकाला म्हणजे कालवलेली माती. ही माती पावसाच्या पाण्याने कालवली जाते. खेळगड्यांच्या नाचण्याने हे कालवण्याचे कार्य सिद्ध होते. कालपरत्वे वेगवेगळ्या संस्कृतींच्या प्रभावामुळे चिखलकाल्याच्या परंपरेचा मूळ उद्देश बाजूला राहिला असावा. तरी लोकसंस्कृती विषयाच्या अभ्यासकांना यामागील मर्म ठाऊक असल्याचे त्यांच्या लेखनातून निदर्शनास येते.
माती म्हणजे पृथ्वीचे प्रतीक रूप. मातीच्या उदरातून बीज अंकुरते. हेच बीज पुढे नवजीवन घडवते… सृष्टी घडवते. माती नाही तर जीवन नाही… जीवन नाही तर हे जग नाही…
मातीचे हे शक्तिरहस्य ज्यावेळी मला उमगले, त्यावेळी माझे मातीवर प्रेम जडले, भक्ती जडली. नाहीतर मीसुद्धा सर्वसामान्यांसारखी पायांना माती लागली की नाक मुरडायची. परंतु जेव्हा मी लोकसंस्कृतीच्या अभ्यासक्षेत्रात उतरले, तेव्हापासून मला मातीचं माहात्म्य समजलं. तिचं मातृदेवता रूप मी जाणलं. आता पायांना लागलेली माती मला अभीर-गुलालासारखी वाटते!
खरं तर सर्वसामान्य हा शब्दसुद्धा इथे वापरणे अयोग्य आहे. कारण मातीला नाक मुरडायची परंपरा ही पांढरपेश्या समाजाची. शेतकरी-कष्टकरी समाज मातीला ‘माय’ मानतो. म्हणूनच त्यांनं मातीचं गुणगान गाणाऱ्या, तिला भक्तिभावे नमन करणाऱ्या कितीतरी प्रथा-परंपरा निर्मिलेल्या आहेत. तिच्या शिल्प-मूर्ती त्याने रचलेल्या आहेत. तो दिवसरात्र तिच्या सान्निध्यात वावरतो. मुसळधार पावसात भिजत, पोटऱ्याभर पाण्यात उभा राहून तिची मशागत करीत असतो. खरा शेतकरी कधी मातीत वावरल्याने वा पावसात भिजल्याने आजारी पडत नाही. पावसात चिखलकाला अंगाला माखून शेत-कुणग्यांनी नांगरणी-खुरपणी केली नाही तर त्यांच्या जन्माचं सार्थक होत नाही.
सर्वसामान्यांच्या भाषेत चिखल म्हणजे घाण. परंतु हा अर्थ मूळ शब्दाला नंतर जुळलेला आहे. मुळात चिखल म्हणजे चिकचिकीत ओल. ‘चिक’ आणि ‘ओल’ या दोन शब्दांच्या समासातून हा शब्द जन्माला आलेला आहे. चिक + ओल = चिकोल किंवा चिखल. चिखलकाल्याच्या उत्सवाने हे सिद्ध केलेले आहे. अंगात निर्मितिक्षमता असलेली, पावसाच्या पाण्यात ओली-चिकचिकीत झालेली माती म्हणजे ‘चिखल.’
मी एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले. माझा गावसुद्धा पूर्णतः शेतीसंस्कृतीवर वसलेला. लहानपणी शेतीसंबंधी साऱ्या प्रथा-परंपरा, सण-उत्सव घरी आवर्जून पाळले जायचे. घरात गुरं-ढोरं होती. परंतु माझी आई थोडी पांढरपेशी संस्कृतीत वाढल्यामुळे मला आणि माझ्या भावांना इतर मुलांबरोबर मातीत वगैरे खेळायला देत नसे. भाऊ थोडे मोठे झाल्यावर तिला गुंगारा देऊन गावच्या मुलांबरोबर मैदानी खेळ खेळायला जायचे आणि मातीत माखून घरी यायचे. पावसाच्या दिवसांत तर ते एकदम चिखलकाल्यातील गडी व्हायचे. मी मात्र तिच्या धाकाला घाबरून घरातच राहायची. त्यामुळे मोठी होईपर्यंत माझं मातीत वावरण झालचं नाही. परंतु लोकसंकृतीच्या अभ्यासानं माझी मातीकडे बघण्याची दृष्टीच बदलली. आज माती मला देवीरूप दिसते आहे. तिची विविध मृतिका रूपं मला ज्ञात आहेत. माझ्यासाठी ती आज अवनी, सातेरी, भगवती, भूमिका, कालिका, शांतादुर्गा, केळबाय… सर्व देवता आहे.
गोव्यात आज शेतीसंस्कृती हळूहळू लुप्त होत चालली आहे आणि शहरी-पांढरपेशी संस्कृती जळी-थळी पाय पसरू लागली आहे. ही संस्कृती आजच्या मुलांना मातीपासून दूर दूर नेत आहे. मातीत पाय घालणं-चालणं, माती हातात घेणं या गोष्टी त्यांच्यासाठी निषिद्ध बनू लागल्या आहेत. अशा पृष्ठभूमीवर चिखलकाल्यासारखा उत्सव मुलांना मातीशी, त्याच्या मूळ संस्कृतीशी अजिजीनं जोडणारा आहे. मुलांनाच नाही तर आपल्या मातीपासून दूर जात चाललेल्या मोठ्यांनासुद्धा तो तिच्या सान्निध्यात परत आणणारा आहे. या उत्सवाला माझा साक्षात दंडवत!