>> भाजप प्रदेशाध्यक्षांची ठाम भूमिका; युतीत ठिणगी पडणार?
स्वराज्य रक्षणासाठी तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना प्रसंगी जिंकलेल्या किल्ल्यांवर पाणी सोडावे लागले होते; तद्वत येत्या निवडणुकीत युतीसाठी काही मतदारसंघांवर पाणी सोडावे लागेल; मात्र मांद्रे मतदारसंघावर भाजपचा दावा कायम राहील, अशी ठाम भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी जाहीर केली. येत्या निवडणुकीत भाजप 101 टक्के मांद्रे मतदारसंघ जिंकेल, असा आत्मविश्वसही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, मांद्रेत मगोचे जीत आरोलकर हे विद्यमान आमदार आहेत; मात्र त्यांच्या ह्या भूमिकेमुळे भाजपबरोबर सत्तेत असलेल्या मगोची अडचण झाली आहे.
मांद्रे येथे जिल्हा पंचायत सभागृहात सोमवारी रात्री उशिरा आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मांद्रेचे माजी आमदार तथा पक्ष प्रवक्ते दयानंद सोपटे, उत्तर गोवा भाजप अध्यक्ष दया कारबोटकर, मांद्रे मतदारसंघाचे भाजप प्रभारी प्रा. गोविंद पर्वतकर, भाजप प्रवक्ते तथा माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, मांद्रे भाजप मंडळाचे अध्यक्ष उत्तम पोखरे आदी उपस्थित होते.
राज्यात सत्ता मिळवण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. 2027 च्या निवडणुकीत भाजपचे राज्य येण्यासाठी काही अंशी तह करावा लागेल; प्रसंगी जिंकून येणारे मतदारसंघही सोडावे लागतील; मात्र मांद्रे मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्याबाबत आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही, असे दामू नाईक यांनी स्पष्ट केले.
पक्ष कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून संघटितपणे कार्य करण्याची गरज आहे. पक्षाने दिलेली पदे ही मिरवण्यासाठी नसून कार्य करण्यासाठी आहेत याचे भान ठेवा आणि पक्षासाठी स्वार्थ बाजूला ठेवून काम करा, त्याचे फळ निश्चितच मिळेल, असा सल्लाही नाईक यांनी दिला.
भाजप अंत्योदय तत्वावर काम करणारा एकमेव पक्ष आहे, त्यासाठी सरकार आणि पक्ष संघटनेने हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. युवा आणि नारी शक्तीच्या जोरावर आपल्याला 2027 मध्ये 27 हून अधिक जागा जिंकण्याचे स्वप्न साकार करायचे आहे. त्यासाठी निस्वार्थपणे कार्य करा. पक्ष निश्चितच प्रत्येकाच्या कार्याची दखल घेईल, असेही नाईक यांनी नमूद केले.
जसे आपण जिंकण्याचे श्रेय घेतो, त्या प्रमाणे हरल्यानंतरही त्याची जबाबदारी घेऊन पुन्हा जिंकण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य ठरते असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले. ती जबाबदारी घेण्याची वेळ आता आली आहे. मागील चूक सुधारून 2027 च्या निवडणुकीत 27 चा आकडा पार करण्यासाठी आपल्याला कठोर मेहनत करावी लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडूनही भूमिका स्पष्ट
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांमध्ये पक्षकार्याविषयी कळकळ आणि तळमळ असायला हवी, तरच आपण येणाऱ्या निवडणुकीत आपले उद्दिष्ट पूर्ण करू शकू. मागील निवडणुकीत थोड्याशा फरकाने आम्हाला मांद्रे मतदारसंघ गमवावा लागला याचे शल्य आम्हा सर्वांनाच आहे. त्याची पुनरावृत्ती होऊ न देण्याचा संकल्प आतापासूनच आपल्याला करायला हवा. कोणत्याही परिस्थितीत मांद्रेवर भाजपचा दावा राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.