मांद्रेतील किनारी शॅकना पुन्हा लाटांचा तडाखा

0
116

समुद्राच्या पाण्याची पातळी काल २२ रोजी दुपारी ३.३० वा. अचानक वाढून मोठ मोठ्या लाटा किनार्‍यावर धाडकन कोसळत पर्यटन कुटीरे शॅकमध्ये घुसून लाखो रुपयांची नुकसानी झाली. दैनंदिन वापरासाठी आणलेले जिन्नस वाहून गेले, काही व्यावसायिकांनी धावपळ करून लाकडी पलंग खुर्च्या वाचवण्यासाठी बरीच धावपळ केली.

पर्यटन हंगामात दुसर्‍यांदा निसर्गाने या स्थानिक व्यावसायिकाना फटका दिला आहे. पर्यटन हंगामाच्या ऐन तोंडावर अशीच पाण्याची पातळी वाढून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, सुरुवातीला दीड कोटी पेखा जास्त नुकसानी झाली होती. सामान वाहून गेल्याने लाखो रुपये नुकसान सोसावे लागणार आहे .
एकूण सहा शॅकमध्ये पाणी घुसले. पर्यटक जेवणासाठी लाकडी पलंगावर खुर्च्यांवर बसले होते. पाणी अचानक वाढल्याने त्यांचीही तारांबळ उडाली. काही लाकडी पलंग पाण्यात वाहून गेले ते अडवण्यासाठी कामगार तसेच मालकांची धावपळ सुरू झाली. सरकारने या भागाची पाहणी करून नुकसान भरपाई संबंधी प्रक्रिया करण्याची मागणी केली .

मांद्रेचे उपसरपंच तथा व्यावसायिक डेनिस ब्रिटो यांनी प्रतिक्रिया देताना अचानक पाण्याची पातळी आश्‍वे मांद्रे किनारी भागात वाढली असे सांगितले.
पर्यटन हंगामावरच आता सरकारची भिस्त असून खाण व्यवसाय धोक्यात आल्याने सरकारला या पर्यटन व्यवसायातून करोडो रुपये महसूल मिळत असतो. पर्यटन हंगामात कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा सरकारला आजपर्यंत पुरवता आल्या नाहीत, तरीही खाजगी शॅक व्यावसायिकांनी आपपल्या ग्राहकांची सोय करण्यासाठी खर्च करून सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असा सूर नुकसान ग्रस्तांनी व्यक्त केला.