>> जीत आरोलकर गटाकडून मोठा उलटफेर; दयानंद सोपटेंना धक्का
पंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंच निवडीला २४ तासांचा अवधी उलटत नाही, तोच मांद्रे पंचायतीचे सरपंच महेश कोनाडकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. सोमवारी अन्य सर्व पंचायतींबरोबरच मांद्रेच्या सरपंचपदासाठी निवडणूक होऊन माजी आमदार दयानंद सोपटे गटाच्या महेश कोनाडकर यांची सरपंचपदी निवड झाली होती. मात्र त्यानंतर अवघ्या २४ तासांतच आमदार जीत आरोलकर गटातील पंच सदस्यांनी मोठा उलटफेर करत कोनाडकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला.
मांद्रे पंचायतीचे सरपंच म्हणून महेश कोनाडकर यांची सोमवारी सरपंचपदी निवड झाली होती. मात्र दुसर्याच दिवशी त्यांच्यावर अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याची वेळ आली. काल गटविकास कार्यालयात त्यांनी पंच सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर एकूण सात पंच सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस दाखल केल्याने मांद्रे पंचायत क्षेत्रात खळबळ माजली. जीत आरोलकर गटातील पंच सदस्यांच्या या खेळीने दयानंद सोपटे यांना मोठा धक्का बसला आहे.
मांद्रेचे सरपंच महेश कोनाडकर यांच्याविरोधात पेडणे गट विकास अधिकारी मनिष केदार यांच्याकडे दाखल अविश्वास ठरावावावर प्रशांत नाईक, तारा हडफडकर, मिशेल शेरॉन आमरोज फर्नांडिस, रॉबर्ट फर्नांडिस, किरण सावंत, अमित सावंत या सात पंच सदस्यांनी सह्या केल्या आहेत.
आपण कधीच पंचायतीच्या राजकारणात पडलो नाही. ज्यावेळी पंचायतींच्या सरपंचांची निवड झाली, त्यावेळी माजी आमदाराने आपल्या पंचायती जाहीर केल्या, त्याचा परिणाम आज दिसून आला, अशी प्रतिक्रिया आमदार जीत आरोलकर यांनी दिली. दरम्यान, याविषयी सरपंच महेश कोनाडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
मांद्रे पंचायत मंडळ
अमित सावंत, प्रशांत नाईक, महेश कोनाडकर, तारा हडफडकर, राजेश मांद्रेकर, मिशेल शेरॉन आमरोज फर्नांडिस, किरण सावंत, रॉबर्ट फर्नांडिस, चेतना पेडणेकर, मिंगेल फर्नांडिस, संपदा आसगावकर.
पंच सदस्यांनी रेडीतील गणेशासमोर घेतली शपथ
जीत आरोलकर यांनी आपल्या गटातील सर्व पंच सदस्यांना सोबत घेऊन काल रेडी-वेंगुर्ला येथील गणेश मंदिरात श्रींचे दर्शन घेतले. यावेळी या पंच सदस्यांनी एकसंध राहण्याची शपथ घेतली.