>> पाच बुरखाधारी व्यक्तींकडून लोखंडी सळईने मारहाण; आस्कावाडा-मांद्रे येथील घटना
‘तुका मायकल लोबो जाय’ असे म्हणत कारमधून आलेल्या 5 बुरखाधारी व्यक्तींनी मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर खुनी हल्ला केला. ही घटना काल आस्कावाडा-मांद्रे येथील मठाजवळ घडली. या हल्ल्यानंतर कोनाडकर यांना तातडीने सुरुवातीला तुये हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. दरम्यान, मांद्रे पोलिसांनी महेश कोनाडकर यांच्यावरील खुनी हल्ल्याप्रकरणी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 352, 118(1), 26 (2), 324 (2) यानुसार गुन्हा नोंदवला आहे.
सविस्तर माहितीनुसार, महेश कोनाडकर हे नेहमीप्रमाणे काल सकाळी आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेले होते, तेथून परतत असताना आस्कावाडा-मांद्रे येथील मठाजवळ अचानक एक कार त्यांच्यासमोर येऊन थांबली. त्या कारमधून 5 बुरखाधारी व्यक्ती खाली उतरले आणि ‘तुका मायकल जाय’ अशी विचारणा करत थेट लोखंडी सळईने त्यांच्यावर हल्ला केला. कोनाडकर यांनी आरडाओरड करताच हल्लेखोर घटनास्थळावरून कारमधून पसार झाले.
तुये येथील हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत दाखल केलेल्या महेश कोनाडकर यांची कळंगुटचे आमदार मायकल लोबो, मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे, मांद्रेचे सरपंच मिंगेल उर्फ रोजा फर्नांडिस, माजी सरपंच ॲड. अमित सावंत, माजी सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक, माजी सरपंच प्रदीप हडफडकर, बाबूसो हडफडकर, उपसरपंचा तारा हडडफडकर, धारगळचे माजी सरपंच भूषण उर्फ प्रदीप नाईक, जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, देवेंद्र प्रभुदेसाई यांनी भेट घेऊन विचारपूस केली.
…तर थेट मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर धडक
24 तासांच्या आत पाचही हल्लेखोरांना अटक करावी आणि त्यामागील सूत्रधाराचे नाव जाहीर करावे, अशी मागणी मांद्रे पंचायत मंडळाने केली आहे. 24 तासांच्या आत हल्लेखोरावंर कारवाई झाली नाही, तर थेट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर धडक देऊ, असा इशाराही पंचायत मंडळाने दिला. यानंतर काल सायंकाळी मांद्रेतील नागरिकांनी पोलीस स्थानकावर धडक देऊन हल्लेखोरांना अटक करावी, या मागणीचा पुनरुच्चार केला.
हल्ल्यामागे कारण काय?
काही दिवसांपूर्वी मांद्रे येथील प्रसिद्ध सप्ताहाच्या निमित्ताने कळंगुटचे आमदार मायकल लोबो हे आले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत एका टी-स्टॉलवर चहापानासाठी माजी सरपंच महेश कोनाडकर व माजी सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक हे बसले होते. त्याचवेळी काही पत्रकारांनी तुम्ही मांद्रे मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीत इच्छुक आहात का? असा सवाल मायकल लोबो यांना केला होता. त्यावेळी त्यांनी आपण मांद्रेतून निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मायकल लोबो हे मांद्रे मतदारसंघात निवडणुकीला उभे राहणार अशी चर्चा रंगत होती. त्याचाच कुणीतरी राग महेश कोनाडकर यांच्यावर हल्ला करत काढला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.
हल्लेखोरांना 24 तासांत अटक करा;
लोबो यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद राजधानीपर्यंत उमटले आहेत. कळंगुटचे आमदार मायकल लोबो, माजी आमदार दयानंद सोपटे यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने पर्वरी येथे मंत्रालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन महेश कोनाडकर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना चोवीस तासात अटक करण्याची मागणी केली.
कोनाडकर यांच्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशयित आरोपींना अटक करून त्यांची योग्य चौकशी केली पाहिजे. या हल्ला प्रकरणामागील सूत्रधाराला जनतेसमोर आणण्याची गरज आहे. या मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन हल्लेखोरांवर कारवाई करण्याची विनंती आपण पोलीस महासंचालकांना केली आहे, असेही आमदार लोबो यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मांद्रेच्या पोलीस निरीक्षकांची बदली
महेश कोनाडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मांद्रेचे पोलीस निरीक्षक शरीफ जॅकीस यांची उत्तर गोवा राखीव दलात तडकाफडकी काल बदली करण्यात आली. मोपाचे पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर यांच्याकडे मांद्रेचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.