मांडवी पुलावर कामगारांना कारची धडक, एकाचा मृत्यू

0
3

>> दोघे गंभीर, चालकास अटक

येथील जुन्या मांडवी पुलावरील खड्डे जेट पॅचर मशीनच्या साहाय्याने बुजविण्याचे काम बुधवारी उत्तररात्री करणाऱ्या तीन कामगारांना भरधाव मारुती कारगाडीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
कारगाडीचा चालक मद्याच्या नशेत असल्याने वैद्यकीय तपासणीमध्ये स्पष्ट झाले आहे. पणजी पोलिसांनी कारचालक संकेत शेट (वळवई – फोंडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

मांडवी पुलावर दिवसाच्या वेळी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असल्याने जुन्या मांडवी पुलावरील खड्डे रात्रीच्या वेळी बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले होते.
खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना एका भरधाव मारुती कारगाडीने (जीए 05 एफ 6447) तीन कामगारांना धडक दिल्यानंतर पुढे जेट पॅचर मशीनला धडक दिली. या अपघातात अमित यादव, अभयराय निर्मल आणि धीरज शर्मा (सर्व उत्तर प्रदेश) हे कामगार गंभीर जखमी झाले. त्यांना ताबडतोब बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले. गोमेकॉमध्ये अमित यादव (24) याचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.