>> मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडवी नदीतील सहा कॅसिनोना आणखीन ६ महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय काल घेण्यात आला आहे.
हे सहा कॅसिनो येत्या सप्टेंबर २०२० किंवा पर्यायी जागेबाबत निर्णय होईपर्यत तिथेच राहणार आहेत. राज्य सरकारकडून गेल्या कित्येक वर्षापासून मांडवीतील कॅसिनोंना दर सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जात आहे. मांडवी नदीतील कॅसिनो हटविण्याची मागणी केली जात आहे. तर, सरकारकडून पर्यायी जागा उपलब्ध केल्यानंतर कॅसिनो हटविण्यात येणार आहेत, असे सांगितले जात आहे.
मांडवी नदीतील दोन कॅसिनो जहाज वेरेच्या दिशेने स्थलांतरित करण्याचा आदेश बंदर कप्तान खात्याने जारी केलेला आहे. तथापि, स्थानिक लोकांच्या विरोधामुळे दोन कॅसिनोंचे स्थलांतरण करण्यात आलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दोन वीज उपकेंद्रांना मंजुरी
मंत्रिमंडळाच्या बैठकीत कळंगुट आणि दवर्ली – मडगाव येथे दोन वीज उपकेंद्रासाठी मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
खलाशांना मुरगाव बंदरातून आणणार ः लोबो
कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणार्या गोमंतकीय खलाशांना मुरगाव बंदरातून गोव्यात आणण्यात येणार आहे. कोविड १९ चाचणी नकारात्मक आल्यास १४ दिवस क्वारंटाईन करून घरी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना काल दिली. देशातील सर्व राज्यातील कोविडबाधित रुग्णांची संख्या शून्यावर येईपर्यत पर्यटन, विमानसेवा सुरू होणे कठीण आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.