महिला हॉकी संघ नवव्या स्थानी

0
128

भारतीय महिला संघाने काल मंगळवारी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने जाहीर झालेल्या हॉकी क्रमवारीत नववे स्थान प्राप्त केले आहे. विश्‍वचषक स्पर्धेपूर्वी दहाव्या स्थानी असलेल्या भारताने स्पर्धेतील ‘अंतिम ८’मधील प्रवेशाच्या जोरावर एका स्थानाची सुधारणा केली आहे. शोर्ड मरिन यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाच्या खात्यात ११३८ गुण आहेत.

विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीत पराभूत झालेल्या आयर्लंडने मोठी झेप घेत थेट आठवे स्थान आपल्या नावे केले होते. स्पर्धेपूर्वी १६व्या स्थानी असलेल्या आयर्लंडला चौदाव्या स्थानापलीकडे कधीच जाता आले नव्हते. आयर्लंडचा ६-० असा धुव्वा उडवून विश्‍वविजेतेपद पटकावलेला नेदरलँड्‌सचा संघ २३०० गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ऑक्टोबर २०११ पासून अग्रस्थानी असलेल्या नेदरलँड्‌सच्या जवळपासदेखील दुसर्‍या संघाला जाता आलेले नाही.

सहाव्या स्थानी समाधान मानावे लागल्यानंतरही इंग्लंडने (१७४८ गुण) आपला दुसरा क्रमांक राखला आहे. पॅन अमेरिका विजेत्या अर्जेंटिनाला (१६१०) मागे टाकून ऑस्ट्रेलियाने (१६४० गुण) तिसर्‍या स्थानी उडी घेतली आहे. राष्ट्रकुल विजेत्या न्यूझीलंडची (-२, १४७५ गुण) सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. जर्मनीचा (+ १, १५५१) संघ पाचव्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाला ३-१ असे नमवून कांस्यपदकाला गवसणी घातलेल्या स्पेनने सुधारणा करत सातवे स्थान मिळविले आहे. क्रमवारीत भारतानंतर कोरिया (-१, १० वे स्थान), चीन (-३, ११वे स्थान) व अमेरिका (-५, १२वे स्थान) यांचा क्रमांक लागतो.