यापुढे अजून बराचकाळ लोकांना घरातून बाहेर पडताना चेहर्यावर मास्क घालावा लागणार आहे. त्यामुळे मास्कचा राज्यात तुटवडा भासू नये व ते सहज उपलब्ध व्हावेत यासाठी राज्यातील महिला स्वयंसेवी गटांची मदत घेऊन सुमारे २ लाख मास्कची निर्मिती करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले
मुरगाव व सत्तरी तालुक्यातील काही महिला स्वयंसेवी गटांना यापूर्वीच मास्कची ऑर्डर देण्यात आलेली असून ते तयार करण्यासाठी लागणारे साहित्य त्यांना पुरवण्यात आले असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले. राज्यात १०८ रुग्णवाहिका सेवा देणार्या जीव्हीके या कंपनीने १५ हजार मास्कसाठी ऑर्डर आम्हाला दिली आहे असेही श्री. राणे यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील
आरोग्यकेंद्रे सुरू करणार
राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्य सेवेबाबत गैरसोय दूर करण्यासाठी केपे, नेत्रावळी (सांगे), आगोंद (काणकोण), ठाणे, केरी (सत्तरी), पाळी-सुर्ला (डिचोली) येथील आरोग्य केंद्र सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहेत. ग्रामीण आरोग्य केंद्र, उपआरोग्य केंद्रे लवकरच कार्यरत केली जाणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
राज्यात सध्या मास्कचा तुटवडा आहे. मात्र लॉकडाऊनचा काळ संपल्यानंतर सगळेच लोक कामानिमित्त बाहेर पडणार असून सर्वांनाच मास्कचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी मास्क उपलब्ध होतील याकडे आम्ही लक्ष देणार असून २ लाख मास्क तयार करण्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे मंत्री राणे म्हणाले. कोरोनापासून जनतेच्या सुरक्षेसाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचे यावेळी मंत्री श्री. राणे म्हणाले.