महिला साहित्य संमेलन आणि मी

0
142
  • प्रतिभा कारंजकर (फोंडा)

श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्था, फोंडा आणि कला व संस्कृती संचालनालय, गोवा सरकार आयोजित १७ वे गोमंतक महिला साहित्य संमेलन उद्या रविवार दि. २० ऑक्टोबर रोजी ढवळी-फोंडा येथे सकाळी ९ ते सायं. ५.४५ या दिवसभराच्या कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त हा लेखन प्रपंच…

फोंड्यात शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेच्या स्थापनेनंतर ‘‘आपण वर्षातून एक महिला साहित्य संमेलन भरवू’’ हे विचारबीज पेरले माधवीताईंनी आणि सुरवात झाली एका नव्या पर्वाला. या बिजातून अंकुरलेल्या रोपट्याला पालवी फुटली. शाखा बहरल्या. त्याचं रुपांतर वृक्षात झालं आणि अजूनही तो वृक्ष बहरतोच आहे. त्यामागे सक्रिय असलेल्या साहित्यवेड्या सर्व स्त्रियांचे महत्त्वाचे योगदान आहे, हेही तितकेच खरे आहे. विचार पुढे नेणारे भोई या पालखीला लाभले आणि ती दिंडी अंगाखांद्यावर मिरवीत नेणार्‍या, तिची शान वाढवणार्‍या साहित्यिक स्त्रिया या पालखीत समाविष्ट होत गेल्या.. अजूनही होत आहेत.

साहित्य क्षेत्रातल्या या उपक्रमाशी मी आधी परिचित नव्हते पण साल २००५ नंतर मी थोडं थोडं लिहिण्याचं धडपडत धाडस करत होते. त्यावेळी पहिल्यांदा मी या प्रवाहाचा एक भाग बनले. आणि तेव्हापासून आजतागायत या प्रवाहातल्या स्त्रोतांचा, नव्या नव्या विचारांचा, कार्यक्रमांचा मनापासून आस्वाद घेते आहे. त्यातून ‘मीही काही करू शकते’ ही प्रेरणा मिळवत गेले. प्रत्येक संमेलन म्हणजे माझ्यासाठी एक स्फूर्तिदायक असा अनुभव होता.

माझ्या दृष्टीने आकाशमोगरी या झाडाची उपमा या संमेलनासाठी अगदी सार्थ ठरेल. ज्या झाडाच्या कळ्यासुद्धा आपल्याला आदल्या रात्री दिसत नाहीत तेच झाड पहाटे उठून पाहिलं तर शुभ्रधवल फुलांच्या मोहोरानं इतकं गच्च भरून गेलेलं असतं की पानही दृष्टीस पडत नाही त्याचं. आणि अवचित असा परिमळ सबंध परिसरात दरवळू लागतो. आपला गंध पसरवत जणू ते सांगत असतं आपल्या अस्तित्वाची महती, आम्हा स्त्रियांसारखंच काहीसं. आम्हा स्त्रियांच्या मनातल्या कितीतरी न उमलणार्‍या कळ्या इथे येऊन उमलायला, बहरायला लागल्या आणि त्याची जाणीव होणं हे तिच्यासाठी खूपच गरजेचं होतं. माझ्यासारख्याच अनेक स्त्रियांचे हात लिहिते झाले आहेत. ‘होय मलाही हे जमू शकतंय’, हा आत्मविश्‍वास मनात निर्माण झाला तो या संमेलनामुळे. जे काही लिहीत गेले त्याला दाद मिळत गेली आणि लिहिण्याचा उत्साह वाढत गेला. तो सुगंध अधिकच दरवळू लागला. अजून काही, अजून काही नवीन नवीन करण्याची उमेद मनात साठत गेली. याला कारण संमेलनाद्वारे भेटलेल्या मोठमोठ्या महनीय व्यक्ती. त्यांचे अनुभवाचे बोल दरवेळी मार्गदर्शक, दिशादर्शक बनत गेले.

‘अरे याही आपल्यासारख्याच साधारण स्त्रिया पण त्यांनी मनात ठरवलं आणि करून दाखवलं मग आपणही प्रयत्न करायला काय हरकत आहे?’ ही ज्योत मनात तेवती ठेवली ती त्यांच्या विचारांनी आणि संमेलनांनी. त्या सर्व स्त्रिया आज मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. तितकी उंच झेप नाही घेता येणार पण प्रयत्न करायला काय हरकत आहे?.. असा विश्‍वास मनात पेरला गेला. एक गृहिणी असल्याने माझा कागद-पेनशी संबंध फक्त वाणसामानाची यादी करण्यापुरताच होता, पण तो संबंध माझ्याशी पुन्हा जोडला गेला. मी पुन्हा एक विद्यार्थिनी बनले. या शारदांच्या प्रांगणातली एक होतकरू शिष्या बनले. जे जे त्यांच्याकडून ऐकलं ते ते हृदयावर कोरण्याचा प्रयत्न करत गेले. माझ्यासारख्याच अनेक जणींना असाच अनुभव आला असेल.

ज्या दिवशी संमेलन असतं त्या दिवशीची सकाळ उजाडते तीच मुळी एक मनात नवा वेगळा विचार घेऊन- रोजचं रांधा वाढा उष्टी काढा याचा दबडका आणि दुपारची थोडीशी मुद्दाम काढलेली सवड वाचनासाठी… या रोजनिशीला छेद देणारी थोडी वेगळी वाट. सकाळपासून मनात एक नवी हुरहूर निर्माण होते- आज काय ऐकायला मिळणार किंवा कोण कोण भेटणार याची. रांगोळ्या, फुलांची पखरण यांनी होणारं स्वागत, ग्रंथ दिंडीनंतर आयता मिळणारा नाश्ता आणि एकामागून एक येणारी रंगतदार सत्र यात जेवायची वेळ कधी झाली हेसुद्धा कळत नाही. कधी नव्हे ते आम्हाला इथे माहेरवाशिणीसारखं वाटतं, कारण जेवणाचे ताटही आमची वाट बघत असतं. तोच पुढच्या सत्रातील कार्यक्रमांची पर्वणी सुरू होते. वेगवेगळे विषय हाताळले जातात. दरवेळी नव्या ज्ञानात भर पडत असते. कधी ई-बुक कुहूविषयी, नव्या टेक्नॉलॉजीची ओळख, कधी सिनेमा-नाट्य कलाकारांशी मारलेल्या दिलखुलास गप्पा, व्यासंगी, विद्वान अशा साहित्यिकांच्या तोंडून काही ऐकायला मिळणं हे नशिबानेच प्राप्त होत असतं. खगोल शास्त्रात फेरी मारून आणणारे सत्र माहितीप्रद होतं आणि दरवेळीप्रमाणेच लेखिका, कवयित्री, गायिका, शास्त्रज्ञ कुठल्याही क्षेत्रातील संपन्न असे व्यक्तिमत्त्व असो, मुलाखत घेण्यात, त्यांना बोलतं करण्यात माहीर असलेल्या आमच्या संगीताताई शेवटचे सत्र अगदी आनंदाच्या टिपेवर नेऊन ठेवण्यात यशस्वी होतातच आणि असं आनंदानं भरून ओसंडून वाहणारा एक स्रोत मनात साठवत आम्ही जड अंतःकरणाने घरचा मार्ग धरतो. भरगच्च अशा कार्यक्रमाने दिवस कसा संपला तेही कळत नाही. पण मनात मात्र पुढच्या वर्षीच्या संमेलनाचे विचार तेव्हापासूनच घोळू लागतात.

संमेलनाचा तो दिवस अगदी आयुष्यभरासाठी माझ्या मनावर कोरला गेलाय त्याला कारणही तसेच होते. मला त्यावर्षी संमेलनाला येणार्‍या अतिथी म्हणून लाभलेलं व्यक्तिमत्त्व माननीय अरुणाताई ढेरे यांना फोंड्याला घेऊन येण्याची जबाबदारी दिलेली होती. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे सगळी कामे स्त्रियाच वाटून घेतात… अगदी गाडीचा ड्रायव्हर, फोटोग्राफर, छपाई, बॅनर्स, सभागृहबुकिंग, सजावट, पाहुण्यांची व्यवस्था सारी जबाबदारी स्त्रियांवरच असते. नावाप्रमाणेच स्त्रियांचे अधिपत्य, सहभाग असलेला हा कार्यक्रम म्हणता येईल. सारे कसे आखीव- रेखीव- योजनाबद्ध असते.
अरुणाताईंशी त्या प्रवासात अगदी एखाद्या मैत्रिणीसारख्या गप्पा झाल्या. हेही भाग्य मिळाले ते या संमेलनाच्या निमित्तानेच. शिवाय या संमेलनात मी माझ्या पुस्तकांचे अनावरण केले. तेही दोन वेळा. आम्हा स्त्रियांसाठी ही गोष्ट अभिमानास्पद वाटावी अशीच आहे. आपल्याच व्यक्तिमत्त्वाची आपल्याला कुणी नव्याने ओळख करून द्यावी असा तो क्षण असतो. आणखी एक स्मरणात राहणारा क्षण म्हणजे माधवीताईंनी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आणि ‘‘तुम्ही पुस्तक नाही का काढत?’’ हा प्रश्‍न. मला त्यातली विशेष माहिती नव्हती पण तरीही त्यांनी त्यांच्याकडचे प्रकाशकांचे नंबर्स मला दिले, ‘‘माझं नाव सांग ते मला ओळखतात’’ हा इतका उत्तेजनाचा शब्दही माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा देऊन गेला. आईच्या मायेने केलेले मार्गदर्शन आणि पुढे केलेला मदतीचा हात, शाबासकीची एक थाप हा माझ्यासाठी अनमोल ठेवाच लाभला होता. आम्ही माधवीताईंच्या लेकी म्हणवून घेण्यात धन्यता वाटावी इतकं त्याचं मोल नक्कीच होतं.