– चित्रा प्रकाश क्षीरसागर
स्व. माधवी देसाई यांच्या प्रेरणेने सुरू झालेले अखिल गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे यंदाचे हे तप:पूर्ती साहित्य संमेलन आहे. माधवीताईंचा आशीर्वाद या रूपाने हे संमेलन श्री तुळशीमाता पांडुंरग महिला मंडळातर्फे आम्ही पणजी शहरात घेत आहोत. हे संमेलन भरविताना आम्हांला आनंद तर होत आहेच, परंतु त्यासाठी गेले वर्षभर राबताना झालेले श्रम या संमेलनाच्या यशस्वीतेने दूर होत आहेत, हेही जाणवते. माधवी देसाई या खंबीर नेतृत्वगुण असलेल्या लेखिका. त्यांनी क्रिया करून करवावी इतरांकरवी| हा समर्थ रामदास स्वामींचा उपदेश जीवनात अनुसरला. गेली अकरा वर्षे हे संमेलन अव्याहतपणे व दरवर्षी नव्या जोमाने साजरे होत आहे.
दहा संमेलने माधवीताई हयात असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर हे संमेलन कसे होते, याबाबत कित्येकांनी शंका व्यक्त केली होती. परंतु शिवनाथी, शिरोडा येथे झालेले अकरावे साहित्य संमेलन माधवी देसाई यांचा वारसा परिपूर्णपणे चालविणारे असे भव्य दिव्य आणि शिस्तबद्धपणे साजरे झाले. यंदाचे हे संमेलनाचे बारावे वर्षे. बारा वर्षांचा काळ हा एका तपाचा असतो. साहित्याची तपश्चर्या करण्याचे व्रत माधवीताईंनी आपल्या समवेत आलेल्या प्रत्येक सखीला दिले. साहित्य प्रेमातून सुरू झालेला प्रवास अनेकांना लिहिता करणारा ठरला. त्यातून लक्ष्मी जोग, प्रतिभा वासुदेव कारंजकर अशा लेखिका प्रकाशात आल्या. त्याचप्रमाणे या सार्याच संमेलनात अनेक पुस्तकेही प्रकाशित झाली. साहित्य संमेलनाने काय साध्य होते? हे सोहळे हवेतच कशाला?? असे अनेक प्रश्न उपस्थित करणार्यांना नावे ठेवण्याची सवय असते. परंतु त्यातील आनंद घेणे हे सर्वसामान्यांना आवडते. अशी लहान लहान संमेलने त्या त्या परिसरातील साहित्यिक, साहित्यप्रेमी आणि वाचकांसाठी सुवर्णसंधीच असते. माधवी देसाई यांच्या हयातीत फोंडा शहरात नऊ संमेलने झाली. दहावे संमेलन प्रथमच फोंडा शहराच्या बाहेर घेण्यात आले, ते माधवी देसाई यांच्या निवासाच्या परिसरातील बांदिवडे गावात श्री महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात. मी फोंडा शहरातील व बांदिवडे येथे झालेल्या अनेक साहित्य संमेलनात सुरुवातील प्रेक्षक म्हणून तर नंतर नंतर सक्रिय होत गेले. या संमेलनातील वातावरणाने मला भुरळच घातली होती. माधवीताईंचा सहवास तेथे मिळे हे आणखी आनंदाचे कारण असे. त्यांचा करारीबाणा, खंबीर नेतृत्व यामुळे महिला अधिकाधिक तरतरीत व उत्साही होत. आपणही या संमेलनाचा हिस्सा व्हावा म्हणून धडपड सुरू असायची. ती कवयित्री संमेलनात मी दोन वेळा सहभागी होता आले त्या रूपाने ती मिळाली. हे संमेलन आपण ताळगावात घ्यावे. आपल्या तुळशीमाता पांडुरंग महिला मंडळाच्या बॅनरखाली घ्यावे ही इच्छा अनेक वर्षे मनात घर करून होती. दहाव्या संमेलनात माधवीताई देसाई आणि शारदा ग्रंथ प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्ष संगीता अभ्यंकर व इतर पदाधिकार्यांकडे मी ती इच्छा पुन्हा प्रकट केली. माधवीताई हयात असतानाच ही इच्छा मी प्रकट केली होती. परंतु त्या हयात असताना ती पूर्ण झाली नाही. आता प्रत्यक्ष या संमेलनाचे शिवधनुष्य पेलण्यासाठी तुळशीमाता पांडुरंग महिला मंडळाच्या सहाय्य घेऊन मी सक्रिय होत गेले. माधवी देसाई यांच्या पश्चात अकरावे संमेलन शिरोडा येथे शिवनाथी मंदिराच्या प्रांगणात झाले. तेथे मी शारदा ग्रंथ प्रसारक मंडळाच्या पदाधिकार्यांकडे ही इच्छा परत एकदा प्रकट केली. मध्यंतरीच्या काळात ही बोलणी सुरूच होती. अकराव्या संमेलनात ही इच्छा आगळ्या रीतीने पूर्ण झाली. त्या संमेलनाच्या सांगतेवेळी बाराव्या महिला साहित्य संमेलनाची धुरा आमच्याकडे सोपविली गेली. संमेलनासाठी ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रत आणि त्याबाबतचे पत्र माझ्याकडे सोपविले गेले. श्री तुळशीमाता पांडुरंग महिला मंडळाची सचिव या नात्याने मी ती जबाबदारी स्वीकारली. वर्षभराच्या काळात महिला मंडळाच्या सर्व सदस्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून हे संमेलन पणजीत १९ ऑक्टोबर रोजी भरविण्याचे भाग्य आमच्या महिला मंडळाला मिळत आहे.
श्री तुळशीमाता पांडुरंग महिला मंडळ, ताळगाव या संस्थेची सुरुवात २००० मध्ये झाली. मात्र संस्थेची नोंदणी करण्यासाठी आम्हाला दोन वर्षे जाऊ द्यावी लागली. त्याची माहिती नसल्याने हा विलंब झाला. शारदा ग्रंथ प्रसारक मंडळाच्या या अखिल गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे
हे तपपूर्ती वर्ष आणि आमच्या महिला मंडळाच्या नोंदणीचेही हे तपपूर्तीचेच वर्ष हा दुग्धशर्करा योग आहे. आमच्या महिला मंडळाने यापूर्वी अनेक मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिरे घेतली आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. पणजीला लागूनच असला तरी पूर्वी हा परिसर ग्रामीण असल्याने येथे साहित्याला पूरक वातावरण नाही. बरेचसे लोक वृत्तपत्र तेवढेच वाचतात. थोड्याच लोकांत साहित्याविषयी कळकळ आहे. आम्ही आमच्या महिला मंडळाच्या सदस्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी दोन वेळा दिवाळी अंक वाचन – महोत्सव घेतला आहे, त्याला महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. एक दोन वेळा कविसंमेलन, कवयित्री संमेलनदेखील आम्ही घेतले. त्या बळावरच आमच्या उत्साही कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन हे संमेलनाचे शिवधनुष्य पेलण्याचा निश्चय केला. त्याची फलप्राप्ती आज होत आहे.
महिला मंडळ हे लोणची, पापड बनविणार्या महिलांचा गट अशीच लोकांची दृष्टी होती. महिला मंडळात महिला एकमेकींच्या साड्या, दागिने अशा गोष्टींवरच चर्चा करीत असतात, असेही पुरुषांचे मत होते. परंतु आज-काल महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. ताळगावातील महिलाही याला अपवाद नाहीत. त्यांनी स्वयंसाह्य गटाची चळवळ ताळगावात तरी अगदी यशस्वी केली आहे. या महिला मंडळाच्या अखत्यारितील महिलांनी पंचवीस स्वयंसाह्य गट तर स्थापन केलेच; परंतु काही महिलांनी स्वतंत्रपणे कामे करून आपल्या कलेला वाव दिला आहे. कुणी मेणबत्ती बनवितात, कुणी शिवणकामातील विविध कलांमध्ये तरबेज झाल्या आहेत. त्यांनी केवळ व्यवसाय किंवा उद्योगात यश मिळविले असे नाही परंतु त्यांनी साहित्यातदेखील रस दाखविला आहे. ताळगाव महिला मंडळाच्या सदस्यांनी पणजी आकाशवाणीवर नाटिका सादर करून साहित्याशी आपला संबंध आहे, हे सिद्ध केले आहे. कोकण मराठी परिषदेतर्फे झालेल्या शेकोटी साहित्य संमेलनात झाशीची राणी ते झाडूवाली अशा विविध वेषभूषेत सवेश अभिनय सादर करून लोकांची वाहव्वा मिळविली होती. या महिलांनी बिल्वदलतर्फे आयोजित ग्रंथ संमेलनात आपल्या अभिनयाची झलक दाखविली
होती. साहित्यातील नायिकांच्या जीवनावर सवेश अभिनयाची झलकही दाखवून आधीही लोकांना ताळगावसारख्या ग्रामीण भागातील महिलाही काही कमी नाहीत, हे दाखवून दिले होते.
या महिलांमध्ये धमक आहे. काहीतरी आगळेवेगळे करून दाखविण्याची तयारी आहे,
हे महिला मंडळाची सचिव म्हणून मला व आमच्या अध्यक्ष सुगंधा बोरकर यांना माहीत होते, म्हणूनच महिला साहित्य संमेलनाचा विडा आम्ही उचलला. त्याला संमेलनाच्या यशस्वितेने मूर्त स्वरूप दिले आहे. ग्रामीण परिसरातील महिलांनाही वाचनाची आवड असते. साहित्यिक कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असते. परंतु त्यासाठी संधी मिळत नाही. आपल्या गावात संमेलन झाले तर त्याचा लाभ घेण्यासाठी महिला तयार होतात. ताळगावातील महिलांना साहित्याची आवड आहे. त्या प्रत्यक्ष लिहित नसल्या तरी त्यांच्या मनात साहित्यप्रेम काठोकाठ भरलेले आहे. मी ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षांनी होकार भरला आणि सर्व महिला कामाला लागल्या. गेले तीन महिने आम्ही राबत आहोत. कुणी भोजन समितीवर तर कुणी स्वागत समितीवर काम करीत आहे. महिलांना आगत स्वागताची तशी जन्मजातच आवड असते. महिलांना कामाची सवय, स्टेजची सजावट असो की ओवाळून स्वागताची संधी. या महिला तयारीला लागल्या आहेत. मंडळाच्या अध्यक्ष सुगंधा बोरकर यांच्या घरी या संमेलनाच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी गेला महिनाभर तर रोजच बैठका होत गेल्या. त्यातील विचारविनिमयातून महिलांनी अनेक पर्याय सुचविले. निधी जमविणे तसे कठीण काम परंतु आमच्या महिला मंडळाच्या अखत्यारीतील स्वयंसाह्य गटाने खारीचा वाटा उचलण्याची तयारी दर्शविली. सगळ्याच महिला तत्परतेने आपापली जबाबदारी पार पाडत असल्याने हे संमेलन यशस्वी होत आहे.
संमेलन कायम स्मरणात राहावे, यासाठी स्मरणिका प्रसिद्ध करण्याचे ठरविण्यात आले. या स्मरणिकेचे काम कुणाकडे सोपवावे अशा विचारात असतानाच ताळगावातील साहित्यिक शांता लागू यांच्या सल्ल्याने आम्ही स्मरणिकेच्या कामाला सुरुवात केली. दया मित्रगोत्री, अनघा आर्लेकर आणि मी एकत्र आलो. परंतु या कामााठी कर्णधार कुणाला करावे, हा प्रश्न होता तो आम्ही सोडविला प्रा. अरुणा गानू यांना विनंती करून. त्यांनी या स्मरणिकेच्या संपादनाची जबाबदारी आनंदाने स्वीकारली आणि आमची समस्या सुटली. त्यांनी स्मरणिकेच्या कामासाठी हरप्रकारे सहकार्य केले. फुलांची सजावट, रांगोळी अशी कामे आमच्या ताळगावातील महिलाच करीत आहेत. महिला संमेलनाच्या आजवरच्या सर्वच संमेलनात हा पायंडा पडला आहे, की महिलांनी, महिलांसाठी महिलांचे असे स्वरूप संमेलनाचे ठरूनच गेले आहे. आम्ही ताळगावच्या श्री तुळशीमाता पांडुरंग महिला मंडळानेदेखील ही प्रथा चालवून हा वारसा जपला आहे. हा माधवीताइरचा आशीर्वादच आहे, अशी तुळशीमाता पांडुरंग महिला मंडळाची या संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका आहे.
………….