>> महिला कॉंग्रेसचा आज पोलीस मुख्यालयावर मोर्चा
महिला पोलीस शिपाई कु. अर्शला पार्सेकर हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सखोल व निःपक्षपाती चौकशी करून कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी अर्शला पार्सेकर हिच्या कुटुंबीयांनी काल पत्रकार परिषदेत काल केली. दरम्यान, महिला कॉंग्रेसने महिला पोलीस शिपाई अर्शला हिच्या मृत्युप्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी आज २४ फेब्रुवारीला संध्याकाळी ४ वाजता पोलीस मुख्यालयावर मोर्चा आयोजित केला आहे.
पत्रकार परिषदेला अर्शला हिची आई क्रिशिला, आजी इंदुमती कलंगुटकर, बहीण वीणा, विकिता, भावजय जयंती यांची उपस्थिती होती. कु. अर्शला वेर्णा पोलीस स्टेशनवर कार्यरत होती. ३० जानेवारीला सकाळी ९.३० वाजता ड्युटीवरून हणजूण येथे घरी परतली. त्याच दिवशी संध्याकाळी ४ वाजल्यापासून तिला उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर तिला खासगी डॉक्टरकडे नेण्यात आले. परंतु, उलट्या काही थांबल्या नाहीत. त्यामुळे १ फेब्रुवारीला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली. तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने ४ फेब्रुवारीला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळी कु. अर्शला हिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यापूर्वी २८ जानेवारीला अर्शला मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सहभागी झाली होती. ही पार्टी २९ रोजी पहाटेपर्यंत सुरू होती, असे विणा पार्सेकर नाईक हिने सांगितले. पोलीस शिपाई कु. अर्शला हिने आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र, अर्शला हिच्या आत्महत्येचे नेमके कारण पोलिसांकडून दिले जात नाही.
अर्शला हिला आत्महत्या करण्यास कुणी प्रवृत्त केले? या प्रश्नाचे उत्तर पोलिसांनी शोधून काढले पाहिजे. तिच्या आत्महत्येला वेर्णा पोलीस स्टेशनवरील एक पोलीस उपनिरीक्षक जबाबदार आहे असा आरोप कुटुंबीयांनी केला. या उपनिरीक्षकाने कु. अर्शला हिला लग्नाचे वचन देऊन तिचा गैरफायदा घेतला. यासंबंधी पोलीस खात्याकडे तक्रार करण्यात आली आहे. परंतु, २० दिवस उलटले तरी या प्रकरणाच्या तपासाला गती प्राप्त झालेली नाही. या प्रकरणाची चौकशीसाठी संबंधित उपनिरीक्षकाला निलंबित करून सखोल चौकशी करावी. त्याच्या फोन कॉल्सची सविस्तर माहिती घ्यावी. अर्शला हिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर सदर उपनिरीक्षक गायब झाला होता. अर्शलाची तिच्या महिला पोलीस मैत्रिणीने सुध्दा विचारपूस केली नाही, असेही कुटुंबीयांनी सांगितले.
महिला कॉंग्रेसने या प्रकरणाची दखल घेऊन सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली होती. संबंधित उपनिरीक्षकाचे नाव घेऊन थेट आरोप केला होता. तथापि, या प्रकरणाच्या तपासाला गती प्राप्त न झाल्याने महिला कॉंग्रेस पोलीस मुख्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
‘त्या’ उपनिरीक्षकाची राखीव दलात बदली
वेर्णा पोलीस स्टेशनवरील महिला पोलीस शिपाई कु. अर्शला हिच्या आत्महत्या प्रकरणामुळे वादग्रस्त बनलेल्या उपनिरीक्षकांची तातडीने पोलीस राखीव दलात बदली करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयातील अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी बदलीचा आदेश जारी केला आहे.