महिला, ओबीसी, एस्‌सी, एस्‌टीना न्याय ः कामत

0
135

मडगाव, मुरगाव, केपे, म्हापसा व सांगे या पाच पालिका निवडणुकांसाठीचे नव्याने प्रभाग आरक्षण करण्यात आल्याने महिला, इतर मागास वर्गीय तसेच अनुसूचित जाती व जमातीतील लोकांना न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दै. नवप्रभाशी बोलताना दिली. सरकारने चुकीच्या पद्धतीने केलेल्या आरक्षणाला विरोध केला नसता व न्यायालयात दाद मागितली नसती तर वरील लोकांना न्याय मिळाला नसता, असे कामत म्हणाले.

थोडी खुशी थोडा गम- चोडणकर
पाच नगरपालिका निवडणुकांसाठी काल नव्याने करण्यात आलेल्या प्रभाग आरक्षणाबाबत बोलताना प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीशचोडणकर हे म्हणाले की नव्याने करण्यात आलेल्या आरक्षणामुळे महिला,अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच इतर मागास वर्गातील लोकांना न्याय मिळाला आहे. मात्र, अजूनही आरक्षणबाबतच्या निकषांची योग्य प्रकारे अमलबजावणी झालेली नाही. प्रभाग आरक्षण हे फिरत्या पद्धतीने व्हावे लागते. त्याचा अवलंब करण्यात आला नसल्याचे चोडणकर यांनी स्पष्ट केले. काही प्रमाणात न्याय मिळाला असल्याने खुशी तर अजूनही आरक्षणासंबंधीच्या निकषांच्चा अवलंब करण्यात आला नसल्याने आपण दुःखी आहे. म्हणूनच नव्याने केलेले आरक्षण हे आपणासाठी ‘थोडी खुशी थोडा गम’ असे असल्याचे ते म्हणाले.

मतदार यादीतील घोळ दूर व्हायला हवा ः ढवळीकर
पाच नगरपालिकांसाठीचे नव्याने जे प्रभाग आरक्षण करण्यात आले आहे. त्यासंबंधी प्रतिक्रिया देताना मगो नेते व आमदार सुदिन ढवळीकर म्हणाले की, बर्‍याचशा प्रभागांतील मतदार यादीच सदोष आहे. सत्ताधारी भाजपचे आपल्या कायद्यासाठी बर्‍याच प्रभागांतील लोकांची नावे ते ज्या प्रभागात राहतात तेथून काढून दूरच्या प्रभागांत घातली आहेत. या मतदार यादीतील हा घोळ प्रथम दूर करायला हवा. तो दूर न करता केलेल्या आरक्षणाला काहीही अर्थ नसल्याचे ढवळीकर म्हणाले. आता नव्याने जे आरक्षण केले आहे ते कसे काय केले आहे तेही पहावे लागणार असल्याचे ते म्हणाले.