- – पौर्णिमा केरकर
स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या मनाला समाधान देणारे काम केले तर त्यात आनंद असेल. त्यासाठी धडाडी, बुद्धिमत्ता, आवड आणि काम करण्याप्रतीची समर्पित भावना असणे गरजेचे आहे. अर्थार्जनाची गरज ही निव्वळ प्रतिष्ठितपणासाठी नसून आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासासाठी तो सक्षम प्रवास आहे.
सकाळी उठायचे… सडा-सारवण करायची… तुळशीला पाणी घालून मग तिच्या दिवसाची सुरुवात व्हायची. शेकडो वर्षे लोटली तिचा हा दिनक्रम असाच होता. जग झपाट्याने बदलत गेले. विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती झाली. सावित्रीबाईनी तिच्या शिक्षणाची वाट मोकळी केली. रस्ता सरळसोट नव्हता, तरीही तिनं आव्हान पेललं. पूर्वी नवरा बाहेरून कमवून आणायचा, तर घरची महिला कुटुंबाला अन्न शिजवून वाढायची. मुलांची, सासू-सासर्यांची दुखलीखुपली काढायची. पैसा सहजपणे हातात घोळण्याचे ते दिवस नव्हते. शेतात आपल्याकडे जे पिकते ते इतरांना देणे व इतरांकडून त्यांच्याकडे जे उपलब्ध असेल ते घेणे, असा सगळा व्यवहार भावना-संवेदनांना प्राधान्य देऊन केला जायचा.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मात्र स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र बदल होत गेला. इतकी वर्षे उंबरठ्याआत असलेलं तिचं कार्यक्षेत्र विकसित करण्यासाठीचे मोकळे आकाश आता तिच्या कवेत आले होते. शिक्षण, बदलते सामाजिक, सांस्कृतिक, व्यावहारिक जीवन, तिला तिच्या अभिव्यक्तीसाठी मिळणारा स्पेस ही सर्व या शतकाची तिला मिळालेली देणगी होती. स्त्रियांना आत्मभानाची जाणीव झाली होती. पतिनिधनानंतर ती आता स्वतःला कोंडून घेत नाही, तर परिस्थितीचे भान बाळगून अर्थार्जन करण्यासाठी बाहेर पडत आहे. शिक्षण, बदलते सामाजिक वातावरण, आवडीच्या क्षेत्रात कमीअधिक प्रमाणात मिळणारी कामाची संधी, घरातील जुन्याजाणत्यांचा अर्थार्जन करू पाहणार्या स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन यात फरक पडला आहे. परिस्थितीतून ती बरेच काही शिकू लागली आहे. तिचं कार्यक्षेत्र विस्तारलेलं असून जीवनातील सर्वांगाला स्पर्शून जाणारं तिचं व्यक्तिमत्त्व अधिकाधिक विकसित होत आहे.
गोव्यासारख्या छोट्या राज्यात साधन-सुविधांची उपलब्धता असून प्रत्येक घरातील महिलेने ठरवले तर तिला स्वावलंबी जीवनाकडे वाटचाल सहज करता येईल. ‘सततचे कष्ट आणि महिला’ असे समीकरणच तयार झालेले आहे. त्याच्यात शिस्त आणि अभ्यास याची जोड मिळाली तर कष्टाचे चीज होईल.
आजची महिला शिकलेली आहे. रोजगाराच्या अनेक संधी तिच्यासाठी उपलब्ध आहेत. तिला स्वतःला आपल्या मनाचा कल कोठे आहे हे ओळखता येऊ लागलेले आहे. कौटुंबिक स्तरावरही बर्याच मोठ्या प्रमाणात मोकळीक मिळू लागलेली आहे. आणि मुख्य म्हणजे, नवरा कमावता असला तरीही स्वतःचे वेगळे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, आत्मविश्वासपूर्ण जगण्यासाठी तिला आर्थिक स्वावलंबन गरजेचे आहे.
सुशिक्षित बेरोजगारी सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आपल्या समाजात मुलीचं लग्न जुळविताना मुलगा कमावता आहे की नाही, म्हणजे तो नोकरी करतो की त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे याकडे बारकाईने लक्ष दिले जात असे. मुलगी नोकरी करणारी आहे की नाही हे तेवढेसे महत्त्वाचे मानले जात नसे. प्रत्यक्षात संसार करताना मात्र घरात महिन्याच्या शेवटी आर्थिक टंचाई भासता कामा नये म्हणून काटकसरीने तिला घरखर्चासाठी दिलेल्या पैशांचा ती वापर करायची. तिची ही पुंजी ती तांदळाच्या नाहीतर कडधान्याच्या डब्यात सुरक्षित ठेवायची. कधी कनवटीला तर कधी पदराच्या गाठीला बांधलेली अडल्या-नडल्या वेळी तिची ती कमाई उपयोगी पडायची. हे असे व्यवहार चातुर्य घराघरांतील महिलांमध्ये होते. आजही आहे.
‘कोपरी’, ‘भिशी’च्या माध्यमातून त्यांचा आर्थिक व्यवहार चालायचा. आज याच तिच्या कल्पकतेला आधुनिक आणि मोठ्या प्रमाणात व्यावहारिक स्वरूप आलेले आहे. जागोजागी महिला मंडळे, बचत गटांची निर्मिती झालेली आहे. महिला मोठ्या संख्येने एकत्रित येऊन काम करीत आहेत. सरकारी पातळीवरील अनुदानाचा लाभ घेत आर्थिकदृष्ट्या
सक्षम होण्यासाठीची तिची धडपड चालू आहे. हे चित्र सुखावणारे आहे खरे, परंतु दुसर्या बाजूने निव्वळ आर्थिक लाभ एकमेकांना वाटून घेत राजकीय हेतूने प्रेरित असलेले असंख्य गट स्त्रियांच्या क्रियाशील व्यक्तित्वाला घातक ठरत आहेत. स्त्रियांनी आपली उपजत क्षमता लक्षात घेऊन त्यादृष्टीने अर्थार्जनासाठी, स्वावलंबी जीवनासाठी काय करता येईल याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
सामूहिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्तरांवर याचा विचार केला तर त्याचा फायदा होईल. बांगलादेशात महंमद युनूस या अवलियाने स्वयंसहाय्य गटांच्या माध्यमातून क्रांती घडवून आणली आहे. घरगुती छोटे-छोटे व्यवसाय निव्वळ कुटुंब चालविण्यासाठी करत असलेल्या महिलांना मोठं काही करण्यासाठी आर्थिक साहाय्य मोठी बँक देत नव्हती. परिणामी,
हा महिलावर्ग आपल्या कुटुंबापुरताच मर्यादित राहिला. युनूस यांनी या परिस्थितीचा आढावा घेत, या महिलांना एकत्रित करीत, त्यांच्यातील कल्पकतेला व्यावहारिक जोड देत आर्थिक स्वावलंबनाची मुहूर्तमेढ रोवली.
शिकायचे ते फक्त सरकारी नोकरी मिळविण्यासाठीच! नोकरी नाही मिळाली तर बेरोजगार. शिक्षण फुकट. परिणाम, निराशा-चिंता यांनी घेरले जाणं. कधीकधी याहीपेक्षा घातक पाऊल उचलून जीवनाचा शेवट करून घेण्याइतपत टोकाचा विचार होतो. पूर्वी बायकांचं विश्व चूल आणि मूल एवढ्यापुरतंच होतं असं आजही वारंवार आपल्याला ऐकू येतं. आज आपण चौफेर विकसित झालो आहोत. कर्तृत्ववान, बलशाली आहोत हे सिध्द झाले आहे. आकाशभरारी घेतलेल्या स्त्रिया, तरुणी दिसत आहेत. असे असताना चूल आणि मूल यांची जबाबदारी आपण पूर्णपणे झटकून टाकू शकलो आहोत काय? उलट पद कोणतेही असो, ही स्वखुशीने घेतलेली जबाबदारी आपल्या आत्मानंदाचे, समाधानाचे कारण आहे. सकारात्मक विचार केला तर लक्षात येईल की ही दोन्ही साधने आपल्याला अर्थार्जन करणारी आहेत. पारंपरिक संवेदनशीलतेला धक्का न लावता नावीन्याची जोड देत हे काम व्हायला हवे. आज लोकांकडे पैसा आहे पण वेळ नाही. महिला गटांनी घरगुती पारंपरिक अन्न शिजवून त्याद्वारे व्यवसायात जम बसवावा. अलीकडे सामूहिकरीत्या महिला एकत्रित येऊन लग्न, धार्मिक विधी, इतर घरगुती सण-समारंभासाठी ऑर्डर घेऊन जेवण पुरवितात. सरसकट त्यात तोच-तोचपणा असतो. आधुनिक जीवनशैलीचा प्रभाव त्यावर दिसतो.
याव्यतिरिक्त जर अशा प्रसंगी त्या-त्या प्रदेशाच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करून, आपल्या सभोवताली असलेल्या जुन्या-जाणत्यांशी संवाद साधून व्यवहार संवेदनशील करता येऊ शकतो. फक्त शीत-कढीच नाही तर इतर अनेक शाकाहारी, मांसाहारी अन्नपदार्थ आहेत. शिवाय प्रत्येक सणाची स्वतःची वेगळी खाद्यपरंपरा आहे. बदलत्या ऋतुमानानुसार आपल्या आहारात बदल व्हायचे. वेगळ्या वाटेने ज्यांना जायचे असते ती व्यक्तिमत्त्वे या बदलांचा आपल्या व्यवहारात कल्पक वापर करू शकतात. उदाहरण द्यायचे झाले तर बचत गटामार्फत लग्नाच्या ऑर्डर्स घेतल्या जातात. बुफे जेवणावळीत गोबी मंच्युरियन, मिरची भजी, फ्राईड राईस, गुलाबजामुन वगैरे वगैरे तेच तेच पदार्थ दिसतात. गोबी ही आपल्या प्रदेशाची ओळख नाही. साधारणपणे लग्न मोठ्या प्रमाणात असतात तो कडक उन्हाळा असतो. याचा विचार करून कच्या कैरीचं पन्ह, लोणचं, फणसाची भाजी, सोलकढी, लाल (उकडा), सफेद भात, खतखते, मणगणे… गोडाचे तर एवढे वैविध्यपूर्ण पदार्थ आहेत की त्यांचे संशोधन करून जर हा व्यवसाय केला तर गिर्हाईकांची पावले आपोआप वळतील. पापडांचे तर कितीतरी प्रकार. ते तयार करण्याची पद्धती वगैरेवर एखादी महिला अर्थार्जनाचा विचार करू शकते.
घरबसल्यासुद्धा सरकारी, निमसरकारी आस्थापनात, घरापासून दूर राहून शिकणार्या विद्यार्थ्यांना, इतर अनेकांना घरगुती जेवण जर मिळत असेल तर ते हवेच असते. ‘अन्नपूर्णा हॉटेल’ची संकल्पना महिला सामूहिकरीत्या राबवू शकते. आपल्या प्रदेशाची खास ओळख असणारे एकही अन्नगृह दिसत नाही.
विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या नोकरदारांना ते आजार घेऊनच काम करावे लागते. त्यांच्या जेवणाच्या वेळा, पथ्यपाणी व्यवस्थित होत नाही. मधुमेही लोकांची तर ही मोठी समस्या होऊन बसली आहे. या पार्श्वभूमीवर हे असे एका हॉटेलच्या माध्यमातून, सामाजिक भान बाळगून, अन्न पुरवून आर्थिक समाधानाची प्राप्ती होऊ शकते. सामूहिकतेने आणि वैयक्तिक पातळीवरही याचा विचार करता येईल. वेगळी वाट चोखाळून मार्गक्रमण करणार्यांना संघर्ष करावा लागतो, परंतु निष्ठेने प्रवास केला की त्याचे फळ मिळतेच!
पाळणाघर हीसुद्धा समाजाची आजची मोठी गरज आहे. मुलाना सांभाळून त्यांच्यावर संस्कार करणारी एकत्रित कुटुंबपद्धती आज विरळ होत आहे. कामाधंद्यासाठी महिला बाहेर पडत आहेत. संसार… मुलं… हे तर प्रत्येकीचं स्वप्न. अशावेळी तिला आपल्या मुलांसाठी सुरक्षित जागा हवी असते. ती पैसे खर्च करायला तयार असते. म्हणून पाळणाघर चालवून एखादी महिला मुलांना आपलेपणा देऊ शकते. हा अर्थार्जनासाठीचा व्यवसाय असेल, पण त्याला आत्मीयतेची, सेवाभावी वृत्तीची जोड हवी. मुलांविषयी आत्मीयता नसेल, फक्त पैसा कामविण्याचे माध्यम म्हणून याचा विचार केला तर ते चुकीचे ठरेल.
एक व्यक्ती म्हणून विविध कलागुणांचा समुच्चय आपल्या व्यक्तिमत्त्वात झालेला असतो. त्यात शिवण-टिपणापासून मेंदी, रांगोळी, विणकाम, भरतकाम, ड्रेस डिझाईन, केसांच्या आकर्षक रचना, इतर अनेक कलाकुसरी अनेकींना येत असते, त्याला अर्थार्जनाची जोड देता येते.
आपल्याकडे अनेक पारंपरिक व्यवसाय आहेत. जसे की बांबूकाम, गोधडी शिवणे, कपयाळाचे लहान मुलांसाठी ‘गोदडूले’, लग्नासाठी लागणार्या कर्यांवरील कलाकुसर, दिवाळी-चतुर्थीच्या वेळचे पारंपरिक खाद्यपदार्थ वगैरे. आताच्या महिलांसाठी तर व्यवसायाचे विविध दरवाजे खुले आहेत. शिक्षणाचा वाढता विस्तार, घेतलेले पदवी, पदव्युत्तर शिक्षणातील स्पेसिएलायझशन व्यावहारिक उपयोगात आणता येते. ‘पणजी भगिनी मंडळ’ या संस्थेला दशकांची परंपरा आहे. त्यांनी स्थापन केलेल्या महिला बँकेने आज कित्येक महिलांना आत्मनिर्भर केले. छोटे-मोठे व्यवसाय वैयक्तिक पातळीवर करणार्या महिलांनी एकत्रित येऊन काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. मेणकुरेच्या ‘प्रगती सेल्फ हेल्प गटा’ने सामूहिक शेती करून त्याचा वापर त्या आपल्या केटरिंगच्या व्यवसायासाठी करीत आहेत. लघुउद्योग करण्यासाठी उत्सुक असलेल्यांसाठी सरकारी योजना आहेत, त्यांचा लाभ घेता येतो. छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी प्रत्येक वेळी घरातून बाहेर पडायला हवे असे नाही. आज महिला बर्यापैकी लॅपटॉप हाताळतात. समाजमाध्यमांचे त्यांना चांगले ज्ञान आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. या माध्यमातून त्या अर्थार्जन करणारे व्यवसाय निवडू शकतील. सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक अशा सर्वच पातळ्यांवर आज असंख्य संधी उपलब्ध आहेत. आपल्या आवडीनुसार त्या-त्या क्षेत्रात काम केले तर त्याचे समाधान मिळते.
हिमाचल प्रदेशात अशा अनेक जागा आहेत त्या तिथे बर्फाच्छादित डोंगराआडून येणारा सूर्य पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक नियोजित वेळेच्या अगोदरच आलेले असतात. त्या हवेत ते गारठतात. त्यांना गरम पेय हवे असते. तिथे अनेक जण- खास करून महिला- फक्त काही तासांसाठी चहाचा व्यवसाय करतात. तो एवढा तेजीत चालतो की संपूर्ण दिवस त्या स्वतःसाठी, घरचं करण्यासाठी मोकळ्या असतात. फक्त नोकरी करून पैसा कमावणे म्हणजे कामाला आहे असे नाही. स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या मनाला समाधान देणारे काम केले तर त्यात आनंद असेल. त्यासाठी धडाडी, बुद्धिमत्ता, आवड आणि काम करण्याप्रतीची समर्पित भावना असणे गरजेचे आहे. अर्थार्जनाची गरज ही निव्वळ प्रतिष्ठितपणासाठी नसून आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासासाठी तो सक्षम प्रवास आहे.