महिलादिन ः एक आनंदसोहळा

0
50
  • मीना समुद्र

‘महिला’ या शब्दात धरणीची क्षमाशीलता, धारणक्षमता, सृजनशक्ती आणि बुद्धीचे सार्वभौमत्व यांचा मिलाफ आहे. साहित्य-संगीत-नृत्य-नाट्य-वक्तृत्व अशा सार्‍याच क्षेत्रांत हिला आघाडीवर आहेत आणि ज्ञानाची अन् विज्ञानाची सर्व क्षेत्रे त्यांनी आपल्या विद्येच्या जोरावर, जिद्दीच्या बळावर पादाक्रांत केली आहेत. जगण्याची कला त्या उत्तम जाणतात. त्यामुळेच त्या सर्वत्र पूज्य असायला हव्यात. वंदनीय ठरायला हव्यात. आहेतही! होत्याही! जीवनात सत्य-शिव-सुंदराची स्थापना करणार्‍या समस्त महिलांना येत्या महिलादिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

मार्च महिन्याच्या ८ तारीखला केवळ भारतातच नव्हे तर सगळ्या जगात अतिशय महत्त्व आहे. हा दिवस म्हणजे ‘जागतिक महिलादिन’! एखाद्या विशेष सण-समारंभासारखा मोठ्या धामधुमीने उत्सवी स्वरूपात तो साजरा होतो. हा उत्सव, समारंभ महिलांचा असला तरी यामागचे आयोजन-नियोजन कधीकधी पुरुषवर्गाचे असते आणि त्यात त्यांचा सहभागही असतो. हे कशामुळे घडते? तर स्त्रियांविषयी, महिलांविषयी असणार्‍या आस्थेमुळे आणि आदरामुळे! त्यांच्या सार्‍या कार्यकर्तृत्वामुळे आणि सहकार्यामुळे! त्यामुळेच या स्त्रियांच्या, महिलांच्या कार्याचा- विशेषतः समाजाभिमुख किंवा समाजनिष्ठ कार्याचा सन्मान- त्या महिलांचा सत्कार, महिलांच्या योगदानाचा गौरव, महिलांचं सबलीकरण वा सशक्तीकरण आणि त्यासाठी त्यांना मार्गदर्शन, महिला-जागरण, महिला-मुक्तिदिन, महिलांचे विविध गुणदर्शन, कलादर्शन, खेळ अशा वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. यात महिला प्रामुख्याने अत्यंत उत्साहाने, अतिशय आनंदाने भाग घेतात. अतिशय मुक्तपणाने, हसतमुखाने वावरतात. विचारांची देवाण-घेवाण करतात. असा हा त्यांच्यासाठी खास असलेला महिलादिन! एक आनंदसोहळा!

या ‘महिला’ शब्दाची सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी केलेली फोड आणि त्यामुळेच तयार झालेली व्याख्या आठवते आणि आवडतेही! ‘महिला’ शब्दात ‘मही’ आणि ‘इला’ एकवटल्या आहेत असे त्यांचे म्हणणे! र्‍हस्व-दीर्घ, संधी वगैरेचे व्याकरण आपण बाजूला ठेवू; पण या शब्दात व्यापलेला अर्थ आणि त्याचा आशय हा फार फार महत्त्वाचा. कुणालाही पटेल असाच! ‘मही’ म्हणजे पृथ्वी आणि ‘इला’ म्हणजे सरस्वती. ‘महिला’ शब्दात या दोन्हींचा संगम झाला आहे. ‘मही’ ही अतिशय महान, पवित्र, प्रातःस्मरणीय मानली जाते. कारण तिच्यातून सृजन होते. सृष्टीचा, प्राणिमात्रांचा- सार्‍या चराचराचा जन्म तिच्यातून होतो. ती त्यांना धारण करते, त्यांचे भरणपोषण करते, त्यांना छत्रछाया देते, त्यांचा आधार होते. म्हणून तर समुद्रवसना, पर्वतस्तनमंगला असणार्‍या या पृथ्वीचे आपण प्रातःस्मरण करतो. ती सृजनशील तशीच सहनशील आहे. मृदुमुलायम आहे तशीच कठीण-कणखरही आहे. तिच्याजवळ मातीचे मार्दव आणि विद्येचे वैभव आहे. जलसंपृक्त अशी काळीजमाया तिच्याजवळ आहे. महिलाही अशाच असतात. आपली मातृरूपा करुणामयी माया अन् छाया त्या सर्वांना देत असतात. ‘इला’ म्हणजे सरस्वती. सर्व प्रकारच्या विद्या आणि कलांची ही देवता. तिच्या आशीर्वादानेच आमचे जीवन ज्ञानसमृद्ध आणि सौंदर्यसंपन्न बनते. तिच्या स्मरणाने आणि सहवासाने आपल्याला सर्वोच्च आनंद, समाधान आणि मनःशांती लाभते.

एकूण काय तर ‘महिला’ या शब्दात धरणीची क्षमाशीलता, धारणक्षमता, सृजनशक्ती आणि बुद्धीचे सार्वभौमत्व यांचा मिलाफ आहे. साहित्य-संगीत-नृत्य-नाट्य-वक्तृत्व अशा सार्‍याच क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत आणि ज्ञानाची अन् विज्ञानाची सर्व क्षेत्रे त्यांनी आपल्या विद्येच्या जोरावर, जिद्दीच्या बळावर पादाक्रांत केली आहेत. जगण्याची कला त्या उत्तम जाणतात. त्यामुळेच त्या सर्वत्र पूज्य असायला हव्यात. वंदनीय ठरायला हव्यात. आहेतही! होत्याही!
खरे तर फार पूर्वी मनूच्या काळी अशी स्थिती होती. महिलांना अत्यंत आदराचे स्थान होते. त्यांच्या ‘मनुस्मृती’ ग्रंथात लिहिलेल्या या ओळी- ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः|’ जिथे नारीची, स्त्रीची पूजा होते, तिचा आदरसन्मान केला जातो तिथे देवता रमतात, वास करतात, याची साक्ष देतात. पूर्वीच्या काळी गार्गी-मैत्रेयीसारख्या स्त्रिया वादस्पर्धेत भाग घेत. चर्चा करत. विद्वत्‌गोष्टींमध्ये त्यांना मानाचे स्थान असे. त्यांची मते विचारात घेतली जात. त्यावर विचारविनिमय होत असे.

अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा|
पंचकं ना स्मरेन्नित्यं महापातकनाशनम्‌॥
या श्‍लोकात वर्णिलेल्या स्त्रिया या वेगवेगळ्या स्तरातल्या होत्या. अहिल्या ही ऋषिपत्नी. पतीच्या गैरसमजुतीने आणि शापाने शिळा झालेली. पण श्रीरामाने तिचा उद्धार करून तिचे निर्दोषत्व सिद्ध केले. पाच पांडवांशी एकनिष्ठ असणारी पांचाली- द्रौपदी- एक तेजस्वी अग्निकन्या. एकपत्नी रामाची एकनिष्ठ कोमलहृदया पत्नी सीता, वालीने कपटाने पळविलेली सुग्रीवपत्नी तारा, लंकाधिपती रावणाची सुंदर-सुशील-शहाणी असणारी पत्नी मंदोदरी… या सार्‍यांनी आपले शील, आपले पावित्र्य जपले आणि भारतीय सुसंस्कारांचा एक आदर्श आपल्यापुढे निर्माण केला. अशा या वेदपुराणातल्या आदर्श स्त्रियांच्या, आदर्श महिलांच्या यादीत वेगवेगळ्या क्षेत्रांत नाव कमविणार्‍या आजच्या काळातल्या कितीतरी स्त्रियांची नावे घेता येतील. त्याकाळी वनवास, विजनवास भोगावा लागला आणि आजच्या काळात यंत्रयुगातले कष्ट आणि तंत्रयुगातले नष्ट नाहीसे करत सोसावा लागणारा जनवास किंवा जनात राहून सहावा लागणारा विजनवास यांस महिला तोंड देत आहेत. दमछाक करणार्‍या उंच-उंच लाटांशी टक्कर देत आहेत. अडचणींच्या अनंत डोंगरदर्‍या पार करत आहेत. वेगवेगळ्या वाटा-वळणं शोधत, रस्ते मार्ग आखत पुढे पुढे वाटचाल करीत आहेत. उंच-उंच भरार्‍या घेत आहेत. कर्तृत्वाने आकाश ठेंगणे करीत आहेत. हे सारे कशाच्या जोरावर? सरस्वतीच्या वरदहस्ताच्या जोरावर! सावित्रीबाई फुले यांनी पेटविलेल्या ज्ञानज्योतीच्या प्रकाशाच्या जोरावर! मुलींच्या शिक्षणासाठी शेणगोळे आणि दगडधोंडे अंगावर झेललेल्या, शिव्यागाळ-अपशब्द सहन केलेल्या आणि आपले कार्य निर्लेपपणे पुढे चालू ठेवणार्‍या सावित्रीबाई या तारांगणात शोभणार्‍या चंद्राच्या रोहिणीसारख्याच- तेजस्वी, सत्यव्रती, प्रेमळ, ज्ञानपथी!
महिलादिनाला ‘महिला मुक्तिदिन’ किंवा ‘स्त्री मुक्तिदिन’ म्हणतात हे खरे या अर्थाने की त्यांना अज्ञानापासून, अडाणीपणा-अशिक्षितपणापासून मुक्ती मिळाली. ही पुरुषवर्गापासूनची मुक्ती नव्हे! अंधारातून उजेडाकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. दुर्गा, काली, लक्ष्मी, गौरी, अंबा अशा फक्त दैवी रूपांतून वावरणारी स्त्री आता मनुष्यरुपिणी झाली. आपल्या अखंड, अविरत कामातून दैवीप्रताप दाखवू लागली. मध्ययुगीन काळात परकीय आक्रमणं आणि सर्वत्र माजलेले, मातलेले अन्याय, अत्याचार, अराजक यामुळे तिची प्रतिमा मलीन झाली; नव्हे, तशी ती केली गेली. पुरुष म्हणजे शूरवीरतेचा, पराक्रमाचा मूर्तिमंत पुतळा आणि खरं तर स्वीकार, अनुकंपा, क्षमा ही जगण्याची सूत्रे अनुसरणार्‍या महिला या कोमल, भित्र्या, स्वसंरक्षणास अपात्र अशी समजूत करून दिली गेली. पडदाप्रथा, गोषा किंवा घुंगट यांमध्ये ती बंदिस्त राहू लागली. ती पुरुषाची वामांगी झाली. कधी अस्तित्व नाकारले गेले, कधी संपवले गेले. डोके वर काढताच तिला ठेचले जाऊ लागले. सर्वत्र पुरुषप्रधान संस्कृती फोफावली. स्त्रियांना दुय्यम स्थान मिळाले. अडाणी समाजात आणि सुशिक्षितांतही तिच्यावरचे अत्याचार, जाचक नियम वाढले. मारहाण, जोरजबरदस्ती, जुलूम, बोलण्याचा मार ती मुकाट्याने सहन करू लागली. तिचे संचारक्षेत्र मर्यादित झाले. कन्या, पत्नी, माता, बहीण… तिचे कोणतेही रूप तिचे सत्त्व पाहणारे आणि स्वत्व गमावून बसलेलेच राहिले. सीमित झाले. उंबरठ्याआड बंदिस्त झाले. आजही शहरी, ग्रामीण भागांत हीच स्थिती आहे.

गोमंतकीय कवयित्री रेखा मिरजकर यांनी एका कवितेत म्हटल्याप्रमाणे- तळहाताच्या रेषांवर सुख-दुःख लिहिलेलं असतं ही लहानपणीची समजूत खरी आहे की नाही पाहण्यासाठी ती तळहाताच्या रेषा निरखत राहिली. बदल होईल अशी अपेक्षा करत राहिली. गडद, पुसट अशा त्या अनाकलनीय रेषा तिने हाताची मूठ वळवली तेव्हा तिची साथ सोडून गेल्या. त्या मुठीत मग सामर्थ्य आले, धैर्य आले. कर्तृत्वाचा आलेख मांडत भर उन्हात ती तळपत चालू लागली तेव्हा त्या आत्मसिद्धेवर आभाळानेही मायेची सावली धरली. अशा स्वयंसिद्धा सैन्यदल, वायुदल, पोस्टमन, ब्युटिशीयन, फॅशन डिझाईनर, केटरिंग, हॉटेल, राजकारण, व्यवस्थापन, क्रीडाक्षेत्र, इव्हेंट मॅनेजमेंट, रेल्वे-बस-रिक्षाचालक, आंतराळ वीरांगनाही बनत आहेत. अशीच एक आत्मसिद्धा चेन्नईची ज्योती नैनवाल. तीन वर्षांपूर्वी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या झटापटीत तिचे पती दीपक नैनवाल यांना वीरगती प्राप्त झाली. तेव्हा दोन मुलांची आई असलेल्या केवळ ३३ वर्षीय ज्योतीने आर्मीत प्रवेश केला आणि ती लेफ्टनंट बनली.

उत्तर प्रदेशातल्या बांदा जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात दलित, मागास समाजात जन्मलेल्या कविता देवी यांनी गावातल्या एका स्वयंसेवी संस्थेत सहा महिने शिक्षण घेतले आणि नंतर पत्रकारितेत पदवी घेतली. घर आणि गाववाल्यांच्या विरोधात जाऊन त्यांच्याच समस्या, त्यांचेच प्रश्‍न मांडण्यासाठी ‘महिला डाकिया’ नावाची पत्रिका तिने सुरू केली. ‘खबर लहरिया’तून अनेक सामाजिक प्रश्‍नांना, स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडली. त्यांना ‘चमेलीदेवी’ पुरस्काराने गौरविले गेले आणि ‘रायटिंग वुइथ फायर’ या त्यांच्यावरील माहितीपटाला ‘ऑस्कर’चे नामांकन मिळाले.

सातार्‍याची सुकन्या अपर्णा फाळके अमेरिकेतील ‘नासा’मध्ये युवा संशोधक म्हणून काम करत असताना तिची अवकाश संशोधक म्हणून निवड झाली. कोल्हापूरमधील एका रिक्षाचालकाच्या या मुलीला वयाच्या २१ व्या वर्षी अमेरिकन कंपनीकडून ४१ लाखांचे पॅकेज मिळाले. कोरोनाच्या महासंकट काळात डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, शिक्षक यांनी जीवाची पर्वा न करता अतुलनीय धैर्याने काम केले. ‘मिस वर्ल्ड कॉन्टेस्ट’मध्ये हरियाणाच्या डॉ. मानुषी छिल्लर हिने विजेतेपद पटकावले तेव्हा शेवटच्या निर्णायक फेरीला तिला प्रश्‍न विचारण्यात आला होता, ‘सर्वात जास्त पगार कोणत्या क्षेत्रातील लोकांना मिळाला पाहिजे?’ तेव्हा तिचे उत्तर होते- ‘आईला! आईच्या कामाचे मोल कुणी करत नाही.’ जगात यावरून चर्चा झाली. ‘फोर्ब्स’द्वारे संचलित वेबसाईट ‘सॅलरी.कॉम’वर रिसर्च झाला आणि आई जे काम करते त्यासाठी इतर माणसे ठेवली तर एका आईला एक वर्षाला एक लाख पंधरा हजार डॉलर्स पगार मिळायला हवा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. आत्मा आणि ईश्‍वर यांचा मिलाफ असलेली आई ही तिच्या अंगभूत कर्तव्यक्षतेने, प्रेम-सेवा-करुणा-काळजी-कौतुक या भावनेने, जिव्हाळ्याने, वात्सल्याने जे काही मुलांसाठी, घरासाठी करते त्याला तोड नाही. आजकाल त्या गृहिणीही असतात आणि नोकरदारही असतात. पण सारे काही इतक्या सहजपणे, शक्यतो सर्व बाजू संभाळत करत असतात. पुरुषांचा स्वभाव एक घाव दोन तुकडे असा बर्‍याचदा आक्रमक असतो. पण महिला घरचे-बाहेरचे, नात्याचे सारे रेशिमबंध टिकवून ठेवणार्‍या असतात. अतिशय समंजस, विचारीपणाने निर्णय घेताना दिसतात. सर्वांचे हित साधताना दिसतात. कधी गौरी-गणपतीच्या वेळी अशा ‘मखरात न बसलेल्या, वर्षानुवर्षे आपल्या संसारात खरोखर ‘उभ्या’ असलेल्या माझ्या सर्व मैत्रिणी, मावशी, आत्या, काकू, वहिनी, बहिणी, आई आणि तुमच्यासारख्या गौरींना नमस्कार’ अशी सार्थ पोस्ट आली होती.
विं. दा. करंदीकर ज्ञानपीठ विजेते थोर साहित्यिक. त्यांनाही गृहिणीचे केवढे अप्रूप-
ओचे पदर बांधून पहाट उठते तेव्हापासून झपाझपा वावरत असतेस,
लहानमोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात,
स्वागतासाठी सुहासिनी, वाढताना यक्षिणी, भरवताना पक्षिणी,
साठवताना संहिता, भविष्याकरिता स्वप्नसती-
संसाराच्या दहाफुटी खोलीत, दिवसाच्या चोवीस मात्रा बसवणारी
तुझी किमया मला अजून समजलेली नाही…
अशा अतिशय चपखल शब्दांत त्यांनी गृहिणीचे, महिलेचे वर्णन केले आहे. प्रिया, कांता, सखी अशी तर ती असतेच, पण योग्य सल्ला देणारी, निर्णय घेणारीही असते.

आपल्या संस्कृतीत अर्धनटीनटेश्‍वराचे रूप काय सांगते? महिला आणि पुरुष ही जीवनरथाची दोन चाके असे आपण नेहमीच म्हणतो. त्यांच्यातील सख्य, परस्परांवर विश्‍वास, प्रेम, आदर हवा. हा समतोल असेल तर, एकमेकांच्या जबाबदार्‍या, कष्टाची जाणीव असेल तर, दोन्ही परस्पर पूरक आहेत हे ओळखले तर खरा ‘महिलादिन’ साजरा होईल. समाजरथ सुरळीत चालेल.
या दोन्हीतील तोल ढळल्यामुळे स्त्रियांच्या हक्कांचा, त्यांच्या मतांचा प्रश्‍न निर्माण झाला. पुरुषांच्या बरोबरीने किंवा वरचढ काम करूनही वेतन कमी आणि अपमानास्पद स्थिती या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १९०८ साली न्यूयॉर्कमध्ये सोशॅलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकेच्या परिषदेत १५,००० मजूर, कामगार महिलांचा मोर्चा निघाला. त्यांच्या समस्यांकडे व मागण्यांकडे लक्ष गेले. १९१० साली क्लारा बेटकिनने डेन्मार्कला कोपनहेमनच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ही समस्या मांडली. मतदानहक्क, जादा वेतन, कामाची वेळ कमी करण्यासंदर्भातले मुद्दे मांडण्यासाठी १७ देशांतून १०० महिला उपस्थित राहिल्या आणि मागण्या मान्य झाल्या. ग्रेगरियनप्रमाणे हा दिवस ८ मार्च असल्याने तेव्हापासून हा ‘महिलादिन’ साजरा होतो. १९७५ ला संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिल्यावर दरवर्षी एक विशिष्ट सूत्र घेऊन तो साजरा करण्यात येतो.
जीवनात सत्य-शिव-सुंदराची स्थापना करणार्‍या समस्त महिलांना येणार्‍या महिलादिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!