>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद
राज्यातील महिलांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी खास उपाययोजना हाती घेण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांना महिलांच्या विरोधातील गुन्हे रोखण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी खास कार्यशाळा येत्या दीड महिन्यात घेतली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पोलीस मुख्यालयात राज्यातील महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी काल मुख्यमत्री डॉ. सावंत बोलत होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी राज्यातील पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खास बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. महिलांवरील गुन्हे नियंत्रणात आणणे, महिला विरोधातील गुन्ह्यांचा तपास या मुख्य विषयावर चर्चा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
महिलांविरोधातील गुन्हे कोणत्या प्रकारचे आहेत आणि ते कसे आटोक्यात आणता येतील यावर महिला अधिकाऱ्यांच्या सूचना जाणून घेण्यात आल्या आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
जागृती करणार
महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांबाबत विविध पातळ्यांवर जागृती करण्यावर विचारविनिमय करण्यात आला आहे. महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महिलांच्या विरोधात गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. पोलीस खात्यातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्षम बनविण्याचा उद्देश आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
महिला पोलीस कर्मचारी फौजदारी प्रकरणे सोडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. महिला कर्मचाऱ्यांना मुलांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी शाळांना भेट देऊन, पोलीस स्टेशनमध्ये समुपदेशन सेवा पुरवून आणि स्थानिक सरपंच, पंच यांच्याशी सक्रियपणे सहकार्य करून महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करू शकतात, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.