>> शिखा पांडेचे आयसीसीला आवाहन
महिलांचे क्रिकेट अधिक रंगतदार करण्यासाठी लहान आकाराचा चेंडू व कमी लांबीच्या खेळपट्टीची आवश्यकता नसल्याचे टीम इंडियाची प्रमुख मध्यमगती गोलंदाज शिखा पांडे हिने सांगितले. अनावश्यक बदल न करण्याचे आवाहनही तिने आयसीसीला केले.
सोफी डिव्हाईन व भारताची फलंदाज जेमिमा रॉड्रिगीस यांचा समावेश असलेल्या आयसीसी वेबिनारपूर्वी शिखाने अनेक ट्विट्स करत आपले मत मांडले. शिखा ही झुलन गोस्वामी हिच्यानंतर भारताची दुसर्या क्रमांकाची सर्वांत यशस्वी मध्यमगती गोलंदाज आहे. ‘क्रिकेट रंगतदार करण्यासाठी बदल होणार असल्याचे अनेक बातम्या वाचनात आल्या. क्रिकेटचा विस्तार करण्यासाठी व अधिक आकर्षक करण्यासाठी बदल विचाराधीन असल्याचे अनेकांकडून ऐकले, परंतु, बदलाची गरज नाही.’ असे हवाई दलात अधिकारी पदावर असलेल्या शिखाने सांगितले. शिखाच्या नावावर १०४ वनडे सामन्यांत ११३ बळींची नोंद आहे. आपले म्हणणे मांडताना शिखाने १०० मीटर धावणे व २० यार्ड (संभाव्य) खेळपट्टीची तुलना केली. ऑलिंपिकमध्ये महिला धावपटूला पुरुष खेळाडूंप्रमाणेच १०० मीटर धावावे लागते. पुरुष खेळाडूने १०० मीटरसाठी नोंदविलेली वेळ ग्राह्य धरली जाते. महिला असल्यामुळे तिला ८० मीटर धावून तिने नोंदविलेल्या वेळेची पुरुष खेळाडूची तुलना केली जात नाही, असे शिखाने सांगितले. शिखाने चेंडूचा आकार लहान करण्याला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करत वजनामध्ये छेडछाड केली तर मात्र याचे गंभीर परिणाम गोलंदाजांना भोगावे लागतील, असे शिखाला वाटते. महिलांचे क्रिकेट हळुहळू आकार घेत आहे. महिला खेळाडू मोठे फटके खेळू शकत नाहीत हे ठरवून सीमारेषेचे अंतर कमी करण्यालादेखील शिखाने विरोध दर्शवला आहे. महिला क्रिकेट अधिक रंगतदार बनवायचे असेल तर सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण करा. डीआरएस, स्निको, हॉटस्पॉट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करा. तळागाळातून क्रिकेटपटू तयार करण्यासाठी ‘ग्रासरुट’मध्ये अधिक गुंतवणूक करा, असे आवाहनही शिखाने केले.
महिला व पुरुषांच्या क्रिकेटची तुलना न करण्याचे आवाहनही शिखाने केले. ८ मार्च रोजी एमसीजीवर महिला टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी मैदानावर ८६,१७४ लोक उपस्थित होते. परंतु, हा केवळ अपवाद झाला. भविष्यात मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते महिलांच्या सर्वच सामन्यांना हजेरी लावतील, असा विश्वासही तिने व्यक्त केला.