- डॉ. आरती दिनकर
पणजी
आजच्या बदललेल्या जीवनशैलीत जास्त त्रास महिलांना होत आहे. जीवनशैली बदलली, खानपान राहणीमान बदलले तरी आपण स्वतः किती बदलायचं; या जीवनशैलीचे जे फायदे आहेत ते घ्यायचे की आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सहन करायचे ते या महिलांनी ठरवायचंय!!
आजची स्त्री शिक्षणामुळे, आर्थिक सक्षमीकरणामुळे थोडाफार मोकळा श्वास घेत आहे. काळाची गरज म्हणून महिला आज नोकरी- व्यवसायानिमित्त घराच्या उंबरठ्याबाहेर पडून आर्थिक मदतही घराला करीत आहे. स्त्री संसार सांभाळून तारेवरची कसरत करत आहे अशी गुळगुळीत वाक्ये उगाळून ‘स्त्री कमकुवत आहे..’ असेच चित्र उभे करण्यात येते. मी तर म्हणेन तिचं सामाजिक परिवर्तन तिच्या आरोग्यासाठी कुचकामी ठरत आहे. मला वेळ मिळत नाही; घर, मुलं, नवरा, ऑफिस यातून स्वतःसाठी वेळ मिळत नाही असे ’गोंडस’ कारण सांगितले जाते. असे म्हणून आजची स्त्री स्वतःचे आरोग्य निरामय ठेवण्यासाठी प्रयत्न करत असताना स्वतःला फसवत असते. आज.. नाही उद्या.. मग परवा असं करून आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. मग वाटतं- खरंच महिला सर्वार्थाने सक्षम आहे का? हा प्रश्न एक दिवसाचा नाही. घरातील स्त्री ’पाठीचा कणा’ असते. तिच्यावर सगळं घर उभं असतं. ती थकली, भागली तरी तिला करायलाच हवं असं गृहीत धरलं जातं आणि तीही स्वतःहूनच सगळ्या जबाबदार्या पार पडते. पण हे कुठपर्यंत… तर जोपर्यंत ती आजारी पडत नाही तोपर्यंत! आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करावं असेही म्हणत नाही. घरातील हा पाठीचा कणा मोडला.. म्हणजेच ती आजारी पडली.. तर सगळं घर डिस्टर्ब होतं… असा एक सूर उमटला जातो. मी तर म्हणते अशी वेळ कशाला यावी? घरातील कामे- व्यवहार सगळ्यांनी वाटून घेतले तर घरातील स्त्रीवर त्याचा बोजा पडणार नाही. सगळ्यांनी कामे वाटून घेतल्यामुळे स्त्री आजारी पडणार नाही, पर्यायाने घरातील इतरही लोक आजारी पडणार नाहीत पण प्रत्येकालाच व्यवस्थित झोप, व्यायामाला वेळ, स्वतःचे छंद जोपासायला वेळ, तसेच एकमेकांसाठी वेळ हे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे मनाचे व शरीराचे आरोग्य उत्तम प्रकारे राहू शकते. त्यामुळेच वाटते त्यांनी स्वतःसाठी वेळ देऊन आरोग्यसक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी आजच्या महिलांनी आरोग्यसाक्षर होणे काळाची गरज आहे.
आर्थिक सुबत्ता, आधुनिक यंत्रे, साधने आले तरी आजची स्त्री आनंदी, सुखी आहे असे म्हणता येणार नाही. नोकरी व घर यामध्ये तिचं भावविश्व दबून जाते. तिची घालमेल होते. भावनिक सुरक्षितता तिला अंतर्मुख करते. याचा परिणाम आरोग्यावर व्हायला लागतो. घरातील स्त्री आजारी पडली तर घरातील लोकांसमोर प्रश्नचिन्ह असतं हिचं नेहमीचं रडगाणं …असं म्हणून इतरांप्रमाणे तीही स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. स्त्रीमध्ये सहनशीलता हा चांगला गुण असला तरी आरोग्याच्या बाबतीत कुचकामी ठरतो. स्त्री ही सहनशील, चिवट आहे हे पालुपद, वारंवार घोळलेलं वाक्य म्हणून स्त्रीनं सहनशीलतेचा दागिना लेऊन आयुष्यभर सहनच करीत राहायचं? सुधारलेल्या महिलांनी या कामी पुढाकार घेऊन ‘सहन न करता स्वतःच्या आरोग्याकडे गांभीर्याने बघावे..’ असे सुचवावेसे वाटते.
कधीतरी स्त्रीच्या सोशिकतेचा अंत झाला की मग इतरांना तिचे महत्त्व कळते. वेळीच काळजी घेतली असती.. उपचार केले असते तर? या परिस्थितीमध्ये मुळात स्त्रीची चूक आहे असे मी म्हणेन. इतरांनी दुर्लक्ष केले तरी वेळेवर उपचार घेणे हे तिच्याही हाती असतं. ’दिस इज द हाय टाईम’! आरोग्याविषयी कुठलीही शंका आली की त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार केले तर वेळ व पैसा यांचा अपव्यय टाळू शकतो. कधीकधी लहान लक्षणांचे रूपांतर मोठ्या रोगात होते तेव्हा वेळीच सावध व्हा, नेहमी जरी असं घडत नसलं तरी एखादे वेळेस आरोग्याचे मोजमाप करताना डॉक्टर सांगतात- तुम्हाला असं झालंय… मग धावपळ होण्यापेक्षा वेळेतच(वेळेवर नाही) स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या., चाळिशीनंतर खाणे कमी करा. दर सहा महिन्यांनी रक्त तपासण्या करा. यात विशेष करून हिमोग्लोबिन व रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासा. चालण्याचा सर्वांगसुंदर व्यायाम करा. बरोबरीने योगासने- प्राणायाम शास्त्रोक्त पद्धतीने करा. यामुळे शरीर लवचिक होते. पोहायला येत असेल तर पोहायला जा. उत्साही रहा. मन तंदुरुस्त ठेवा. आजच्या काळात सक्षम व आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे- आहार-विहार यात सातत्य ठेवा, नाहीतर ‘नव्याचे नऊ दिवस’ करून आरोग्य तंदुरुस्त राहणार नाही. वेळीअवेळी जेवण, व्यायामाचा अभाव तसेच व्यायामाचा अतिरेक किंवा उपाशी राहणे या गोष्टींनी आरोग्य उत्तम राहील किंवा वजन कमी होईल हा समज मनातून काढून टाका.
मुख्य म्हणजे मनात सकारात्मक विचार ठेवा. मानसिक तक्रारी शारीरिक तक्रारींना आमंत्रण देतात व शारीरिक तक्रारी वाढल्या की मानसिक दौर्बल्य येते. मग जीवनातील उत्साह करपून जातो. आपल्या आरोग्याचा रिमोट आपल्याच हातात असतो तो कुठे कंट्रोल करायचा व कुठले चैनल लावायचे ते आपल्याच हातात आहे.
आपले व्यक्तिमत्त्व खुलून दिसावे, आपण आकर्षक दिसावे यात सध्या अनेक महिला सतत प्रयत्न करीत असतात. मेकअपचे थर चेहर्याला तात्पुरता आकर्षकपणा देत असले तरी तो कायमस्वरूपी नसतो. नैसर्गिक सौंदर्य आपले व्यक्तिमत्त्व फुलवते. शृंगार करणे हा प्रत्येक स्त्रीचा स्थायिभाव आहे. ती नटणारच, मात्र परंपरेनुसार फरक पडत गेला आहे. अभिव्यक्तीच्या विकासासाठी सौंदर्याची जोपासना ही अत्यावश्यक बाब आहे, त्याचबरोबर निरामय आरोग्य हाच बाह्य सौंदर्याचा मूलाधार असल्याने महिलांनी सर्वप्रथम मनाचे सौंदर्य व समतोल आहारावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे
आजचे युग हे स्पर्धात्मक युग आहे. या स्पर्धेत आपलेच वर्चस्व असावे असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. काळाची गरज म्हणून अर्थार्जनासाठी महिला घराबाहेर पडतात तेव्हा तिला अनेक प्रसंगांना, संकटांना तोंड द्यावे लागते. यावेळी ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असेल तर आरोग्याच्या बाबतीत तिला त्रास होणार नाही. बर्याचदा तर काही तरुण मुली व्यवसायात, नोकरीत इतक्या गुरफटलेल्या असतात की त्यामुळे त्यांच्या आरोग्याला त्या दुय्यम स्थान देतात. अशा काही मुली किंवा महिला माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी येतात तेव्हा.. उसाचा रस काढला तर कसे उसाचे चिपाड होते तशी त्यांची स्थिती झालेली असते. सगळा जीवनरसच शोषला जातो. कधी चेहर्यावर मुरूम, केसात कोंडा होणे, केस गळणे, डोळ्यांखाली काळी- निळी वर्तुळे, ऍसिडिटी, शौचास साफ नसणे हे तर नित्याचेच. केस, मुरूम वगैरे तक्रारींसाठी आधी ब्युटीपार्लरचा आधार घेतला जातो; पण त्यातून निरामय आरोग्य कुठून मिळणार? त्यासाठी पोटातून औषधे घ्यावी लागणार व बरोबरीने समतोल आहार, योग्य झोप, ऋतुमानानुसार फळे, भाज्या… रुचेल पटेल तेवढे खावे. कृत्रिम पदार्थ खाणे टाळावे. निसर्गाच्या सान्निध्यात महिन्यातून एकदातरी मित्र-मैत्रिणी सहकुटुंब जावे. आजच्या स्त्रीला बर्याचदा घर व करिअर सांभाळताना समतोल साधता येत नाही. याचा परिणाम आरोग्यावर होतो पण तिने जर मनावर घेतलं तर सहज शक्य आहे.
मात्र अजूनही वाटतं.. ग्रामीण भागात तसेच शहरी भागात महिला मंडळे, संस्था, सोशल वेल्फेअर बोर्ड किंवा महिला व बालकल्याण केंद्रांद्वारे आरोग्यविषयक शिबिरे, व्याख्याने व जनजागृती करून आरोग्याविषयी सक्षमीकरण करणे गरजेचे आहे; नव्हे ती काळाची गरज आहे, कारण आजच्या बदललेल्या जीवनशैलीत जास्त त्रास महिलांना होत आहे. जीवनशैली बदलली, खानपान राहणीमान बदलले तरी आपण स्वतः किती बदलायचं; या जीवनशैलीचे जे फायदे आहेत ते घ्यायचे की आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सहन करायचे या महिलांनी ठरवायचं!!