महावणवा

0
12

दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये लॉस एंजेलीसच्या आसपासच्या परिसरात सध्या महाभयंकर वणवे लागल्याची दृश्ये दूरचित्रवाणीवर सतत पाहायला मिळत आहेत. हॉलिवूड हिल्ससह आजूबाजूच्या परिसरांमध्ये ठिकठिकाणी भडकलेले हे वणवे पाहून जणू अणूबॉम्ब फेकला गेल्यासारखे वाटते आहे, असे हताश उद्गार लॉस एंजेलिस काऊंटीच्या शेरीफनी काढले, ह्यावरून त्या भागातील प्रत्यक्ष परिस्थिती किती विदारक असेल याची कल्पना येईल. यापूर्वी ब्राझीलमधील अमेझॉनच्या जंगलांना अशाच भीषण आगी लागल्या होत्या, तेव्हाही अवघ्या जगाने भयचकित होऊन तो विनाश पाहिला होता. यावेळीही काही वेगळी परिस्थिती नाही. पॅसिफिक पॅलीसॅडस्‌‍ आणि अल्टाडिव्हामधील आगीतच तब्बल 34 हजार एकर एवढा विशाल परिसर जळून भस्मसात झाला आहे. असेच वणवे आजूबाजूच्या भागांतही लागले आहेत. उपग्रहांनी घेतलेल्या चित्रांतून ह्या आगीची भीषणता सहज ध्यानी येते. प्रत्यक्षदर्शींनी तर जणू नरकात पोहोचल्यासारखे वाटते असे उद्गार परिस्थिती पाहून काढले. ह्या वणव्यांत आतापर्यंत दहाजण मृत्युमुखी पडले आहेत, तर लाखो नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. गेली वीस वर्षे सतत पडत असलेला दुष्काळ, यंदा गेले अऩेक महिने पुरेसा पाऊसच न होणे अशा कारणांखातर ह्या जंगलांतील झाडेझुडुपे कोरडी ठणठणीत पडली आहेत. त्यात सध्या वाहणाऱ्या वेेगवान व़ाऱ्यांमुळे लागलेली आग पसरत चालली आणि बघता बघता आटोक्याबाहेर गेली. एक आग पसरत असतानाच दुसरी, तिसरी अशा एकाचवेळी चार पाच ठिकाणांहून आग पसरत गेल्याने बघता बघता गावेच्या गावे, घरेदारे त्या अग्नितांडवाच्या कक्षेत येत गेले. वास्तविक, अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशामध्ये, जेथे एखादा गुन्हा घडण्यापूर्वीच कायद्याचे रक्षक दाखल झालेले असतात, जेथे सर्व यंत्रणा अत्याधुनिक साधनसामुग्रीनिशी सज्ज असतात, अशा अमेरिकेमध्ये अशा प्रकारचे वणवे लागणे, लोकांना स्थलांतरीत व्हावे लागणे, आगीमध्ये पॅरिस हिल्टन, अँथनी हॉपकिन्स, बिली क्रिस्टल यांच्यासारख्या सेलिब्रिटींची कोट्यवधींची घरे जळून खाक होणे, हे कल्पनेच्याही पलीकडचे आहे. आज हे वणवे विझवायला अग्निशमन यंत्रणा अपुरी पडल्याचे दिसते आहे. परिणामी आग विझवायला पुरेसे लोक नसल्याने कॅलिफोर्नियाच्या ज्ञात इतिहासातला तर हे सर्वांत भीषण अग्नितांडवच म्हणावे लागेल. ह्या भीषण अग्नितांडवात अक्षरशः अब्जावधीची संपत्ती नष्ट झाली आहे. लूटमार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या वीस जणांना ताब्यात घेतले गेले आहे. एखाद्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपद्ग्रस्तांना मदत करण्याऐवजी त्यांचाच ऐवज लुटणाऱ्या महाभागांना ते अगदी अमेरिकतले असले तरी काय म्हणावे. शहरेच्या शहरे ह्या अग्नितांडवात बेचिराख झाली आहेत. एडविन हबलसारख्या खगोलशास्त्रज्ञाने जेथे बसून अवकाशाचा वेध घेतला, ती माऊंट विल्सनची वेधशाळा देखील ह्या वणव्याच्या कचाट्यात सापडली. एकाच वेळी किमान सहा ठिकाणी स्वतंत्रपणे वणवे भडकलेले आहेत. त्यांना वेगवेगळी नावे बहाल केली गेली असली, तरी त्यांची परिणती शेवटी एकच आहे. जागतिक हवामान बदलाची फार मोठी चर्चा गेल्या काही वर्षांत होत असते. हवामान अत्यंत बेभरवशाचे झालेले आहे. त्याचाच परिणाम म्हणून दुष्काळ, अतिवृष्टी, आगी अशी संकटे मानवजातीवर कोसळत आहेत. गोव्यामध्ये सत्तरीच्या जंगलांमध्ये यापूर्वी अशाच प्रकारे आगी लागल्या होत्या त्यांची आठवण लॉस एंजेलिसच्या ह्या अग्नितांडवाने जागी केली आहे. अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची क्षमता जर अमेरिकेसारख्या प्रगत देशात नसेल, तर विकसनशील राष्ट्रांच्या बाबतीत काय होईल. त्यामुळे हवामान बदलाच्या आणि जागतिक तापमानवाढीच्या विषयाला जगाने खरोखरच अतिशय गांभीर्याने घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. केवळ सप्ततारांकित परिषदगृहांतून होणाऱ्या परिषदांमधून कागदोपत्री करारमदार आणि पोकळ चर्चा पुरेसे नाहीत. प्रत्यक्ष जमिनीवरील कार्य व्हावे लागेल आणि जगभरातील सर्व सत्तांना मानवजातीच्या कल्याणाच्या व्यापक उदात्त हेतूने एकत्र यावे लागेल. आज देशोदेशी यादवी आहे. प्रत्येक देश शेजारी देशांशी संघर्ष करतो आहे. परिणामी सर्वत्र अशांतता आहे. प्रत्येकजण केवळ स्वतःचाच विचार करतो. व्यापक मानवकल्याणाचा विचार कोणीच करताना दिसत नाही. अशा नैसर्गिक आपत्तींना जगावर ओढवू द्यायचे नसेल तर तळागाळापासूनच्या प्रयत्नांची जरूरी आहे. त्यासाठी पर्यावरण हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय व्हायला हवा. तो केवळ परिषदांमधून बोलायचा विषय उरू नये. ही पर्यावरणविषयक सजगता जेव्हा निर्माण होईल तेव्हाच अशा आपत्तींना अवरोध करणाऱ्या गोष्टींची सुरूवात जगभरात होऊ शकेल.