महाराष्ट्र, हरयाणात शांततेत मतदान

0
112

महाराष्ट्र आणि हरयाणा या राज्यांच्या विधानसभांसाठी काल अनुक्रमे ६०.५ व ६५ टक्के एवढे मतदान झाले. दोन्ही राज्यांमध्ये गुरुवार दि. २४ रोजी मतमोजणी होणार आहे. काल मतदानाची वेळ संपल्यानंतर विविध एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले. त्यातील बहुतेकांनी महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुती व हरयाणात भाजपच्या मोठ्या विजयाचे भाकीत केले आहे.

मुंबईत काल सकाळी मतदान केलेल्या नामवंतांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, उध्दव ठाकरे, सचिन तेंडुलकर, राज ठाकरे, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह बॉलिवूड कलाकार अमिर खान, माधुरी दीक्षित, लारा दत्ता, सलमान खान आदींचा समावेश होता.

हरयाणात मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह कॉंग्रेसचे भूपिंदर सिंग हुडा, दुष्यंत चौटाला आदींचे भवितव्य सीलबंद झाले आहे. भाजप राज्यात ७५ जागांचे लक्ष्य पार करणार असा विश्‍वास खट्टर यांनी व्यक्त केला आहे.

महायुतीला १९२ ते २१६
जागा : एबीपी एक्झिट पोल
मुंबई : महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला १९२ ते २१६ जागा मिळण्याचा अंदाज एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काल मतदानाची वेळ संपल्यानंतर हा एक्झिट पोल जाहीर झाला. त्यात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीला ५५ ते ८१ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर अन्य पक्षांना ४ ते २१ जागा मिळण्याची शक्यता नमूद केली आहे.