अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, जनजीवन विस्कळीत
महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरातमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. गुजरातमधल्या अनेक शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक राज्यांत पुढील काही दिवस वादळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गुजरातमध्ये मुसळधार
जुनागडमध्ये पुराच्या पाण्यात काहीजण अडकले होते. त्यांना एनडीआरफच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. काही ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले जात आहे.
दिल्लीवरही पुराचे संकट
राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. पण दिल्लीतल्या पुराचे कारण यमुना नदीच्या पाणी पातळीत झालेली वाढ हे आहे. काही ठिकाणी पुराचे पाणी ओसरत असतानाच यमुनेच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली असून दिल्लीवर पुराचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशात कहर
मध्य प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सिहोरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून तिथे 14 जण जखमी झाले आहेत. या पावसामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून बाधित भागातील वीज खंडित करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात पूरस्थिती
महाराष्ट्रातील यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यवतमाळमध्ये अनेक गावांना पूराने वेढले आहे. तथील गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.
कर्नाटकात 32 जणांचा मृत्यू
कर्नाटक राज्यातही मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कर्नाटकात पूर आणि मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 32 जणाचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्त भागात शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत.
आज उद्या पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा या राज्यांत पुढील 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 25 जुलैपासून राज्यात मान्सून पुन्हा एकदा जोर धरणार असून 25-26 जुलै रोजी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील 13 जिल्ह्यांतील शेकडो गावांना पुराचा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर इतर भागात ढगाळ हवामान अपेक्षित आहे. गुजरातमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. देवभूमी द्वारका, राजकोट, भावनगर आणि वलसाड जिल्ह्यांत येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडू शकतो. जुनागडमध्ये रविवारी पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.