>> ओल्ड गोवा फेस्त व इफ्फीसाठी खबरदारी
राज्यातील सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त आणि इफ्फीच्या समारोप सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील प्रत्येकी एक बॉम्ब शोध आणि निकामी पथक गोवा पोलिसांच्या मदतीसाठी दाखल झाले आहे.
केरळ येथील एका चर्चमधील बॉम्ब स्फोटानंतर राज्यातील पोलीस यंत्रणा इफ्फी आणि सेंट फ्रान्सिस झेवियरच्या फेस्ताच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क बनली आहे.
राज्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. तसेच, जुने गोवा येथील सेंट फ्रान्सिस झेवियरच्या फेस्ताच्या प्रार्थनासभांना प्रारंभ झाला आहे. पोलीस यंत्रणा या दोन्ही कार्यक्रमाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कामाला लागली
आहे. गोवा पोलिसांनी केरळ येथील एका चर्चमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फेस्ताला भेट देणाऱ्या नागरिकांना ओळखपत्र सोबत बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गोवा पोलिसांनी जुने गोवा येथे अनुचित प्रकार हाणून पाडण्यासाठी यशस्वी कवायतसुद्धा नुकतीच केली आहे.
महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक राज्यातील प्रत्येकी एक बॉम्ब शोध आणि निकामी पथक गोव्यात दाखल झाले आहे. इफ्फीच्या समारोप सोहळ्याच्या ठिकाणी बॉम्बशोध पथक तैनात केले जाणार
आहे.
तसेच, जुने गोवा येेथील फेस्ताच्या प्रार्थनासभांच्या वेळी बॉम्ब तपास व निकामी करणारे पथक तैनात केले जाणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.