महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या घडामोडींना आला वेग

0
74

पंतप्रधान आज, राजनाथ उद्या मुंबईत
महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेसाठी पडद्याआड वेगवान हालचाली सुरू असून भाजपचे महाराष्ट्रासाठीचे केंद्रीय निरीक्षक म्हणून गृहमंत्री राजनाथ सिंह सोमवारी मुंबईत दाखल होणार आहेत. तर त्याआधी आज शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही एका कार्यक्रमानिमित्त मुंबईत येणार असल्याचे वृत्त आहे. मात्र सरकार स्थापनेविषयी अधिकृत घडामोडी सोमवारपासूनच सुरू होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.भाजपचा महाराष्ट्रातील जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे भाजपबरोबर युतीचे सरकार घडविण्यास राजी झाल्यानंतर मुंबईतील सरकार स्थापनेच्या अनौपचारिक चर्चा-बैठकांना वेग आला असून शपथविधी समारंभाची लगबगही सुरू झाली आहे.
उद्धव मोदींना भेटणार नाहीत
राजनाथसिंह हे भाजप विधीमंडळ बैठकीवेळी उपस्थित राहण्यासाठी सोमवारी येथे दाखल होणार आहेत. तर पंतप्रधान मोदी एका खाजगी इस्पितळाचे उद्घाटन करण्यासाठी मुंबईत आज येणार आहेत. मात्र या भेटी दरम्यान त्यांचे राजकीय स्वरुपाचे कार्यक्रम होण्याबाबत अस्पष्टता आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मोदी यांना भेटण्यासंबंधात काही ठरलेले नाही असे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ पैकी १२२ जागा भाजपने प्राप्त केल्यानंतर येथील भाजपचे निरीक्षक म्हणून राजनाथ सिंह यांची नियुक्ती करण्यात आली होती. भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक सोमवारी होणार असून राजनाथ यावेळी अध्यक्षस्थानी असतील.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या रविवारी दिल्लीत एनडीएच्या खासदारांची बैठक बोलावली असून या बैठकीस शिवसेनेचे खासदारही उपस्थित राहणार आहेत.
फडणवीसांनंतर गडकरीही
संघ प्रमुखांना भेटले
दरम्यान, महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असल्याची चर्चा असल्याच्या पार्श्‍वभूमीवर फडणवीस यांनी शुक्रवारी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुखांची भेट घेतली. त्या पाठोपाठ शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही संघ प्रमुखांची भेट घेतली. मात्र आपली भेट राजकीय स्वरुपाची नव्हती असा दावा गडकरी यांनी केला. लागोपाठ दोघांनीही संघ प्रमुखांची भेट घेतल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. गडकरी शुक्रवारी स्कूटरवरून संघ कार्यालयात आले. आपली ही भेट वर्षपद्धतीची दिवाळीची भेट असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील राजकारण सोडून अन्य महत्त्वाच्या विषयांवर आपण भागवत यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.