महाराष्ट्रात सत्तास्थापनेवर झाले कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमत

0
116

>> आज मुंबईत शिवसेनेबरोबर महत्त्वाची बैठक

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बैठकांमधून महाराष्ट्रात सरकार स्थापनेविषयी एकमत झाले आहे. या दोन्ही पक्षांचे नेते आज मुंबईत शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीतील सर्व माहिती शिवसेनेला दिल्यानंतर मुंबईत सरकार स्थापनेचा फॉर्म्युला व अन्य विषयांबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ही माहिती काल पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांना सरकार स्थापनेबद्दल दावा कधी करणार असा प्रश्‍न विचारला असता चव्हाण म्हणाले की खाते वाटप, मुख्यमंत्रीपद व अन्य कोणत्या मुद्द्यांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे एकमत झाले याची माहिती शिवसेनेबरोबर चर्चा केल्यानंतर देऊ. तसेच आमच्या बरोबर असलेल्या मित्र पक्षांनाही विश्‍वासात घेण्यात येईल असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकालानंतर तीन आठवड्यांपासून सरकार स्थापनेचा पेच निर्माण झाला होता. मात्र आता नव्या आघाडीतील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील बैठक सत्र संपल्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिन्ही पक्षांदरम्यान आज शुक्रवारी होणार्‍या चर्चेनंतर याबाबत अधिक स्पष्ट संकेत मिळणार आहेत.