महाराष्ट्रात शिवसेना-भाजप यांच्यात अखेर युती

0
79

शिवसेनेला मिळणार १२ मंत्रिपदे
अखेर महाराष्ट्रात शिवसेना-भाजप यांच्यात सत्तेच्या वाट्यासाठी युती झाली असून त्यात शिवसेनेला १२ मंत्रिपदे मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या १२ व भाजपच्या १० नव्या मंत्र्यांना शुक्रवारी सकाळी विधानभवनाच्या प्रांगणात होणार्‍या समारंभात मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. मात्र खातेवाटपाबाबत अजून चित्र अस्पष्टच असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेच्या कोणाची मंत्रिपदी वर्णी लागेल याची उत्सुकताही ताणली गेली असल्याचे वृत्त आहे. कॅबिनेट मंत्रिपदासाठी सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते व डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या नावांची चर्चा आहे. तर राज्यमंत्रिपदासाठी दादा भुसे, विजय आवटी, रविंद्र वायकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, अर्जुन खोतकर, दीपक केसरकर, उदय सामंत, दीपक सावंत यांची नावे घेतली जात आहेत. मंत्रिपदासाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग चालल्याची चर्चा आहे.
शिवसेनेला कोणती खाती मिळणार आहेत याविषयी अजून घोषणा झाली नसल्याने तर्कवितर्क सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेला कमी महत्त्वाची खाती मिळणार असे म्हणणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केली आहे. एमएसआरडीसी, परिवहन ही खातीही महत्त्वाची आहेत. तसेच शिवसेनेने केंद्रात एक कॅबिनेट व एका राज्यमंत्रिपदाची मागणी केली असून त्याला अजून प्रतिसाद मिळालेला नाही याकडेही किर्तीकर यांनी लक्ष वेधले.