>> 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान; झारखंडमध्ये 2 टप्प्यांत निवडणूक; दोन्ही राज्यांत 23 नोव्हेंबरला मतमोजणी
केंद्रीय निवडणूक आयोगाने काल महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवनात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व डॉ. सुखबीर सिंग संधू यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या.
महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभांची मुदत पुढील काही महिन्यांत संपणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे. झारखंड विधानसभेची मुदत 5 जानेवारी 2025 ला संपणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा असून, त्यापैकी 29 जागा अनुसूचित जाती, तर 25 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागा असून, त्यापैकी 9 जागा अनुसूचित जातींसाठी, तर 28 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असतील.
हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र व झारखंडमध्ये निवडणूक कधी जाहीर होणार? याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वी राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत 26 नोव्हेंबरच्या आधी निवडणूक घेतली जाईल, असे म्हटले होते. काल अखेर या दोन्ही राज्यांचा निवडणूक कार्यक्रम आणि निकालाच्या दिवसाची घोषणा झाली.
महाराष्ट्रात 9 कोटी
63 लाख मतदार
महाराष्ट्रात 1 लाख 186 मतदार केंद्र आहेत. या केंद्रांवरून राज्यभरात मतदान पार पडेल. राज्यात 9 कोटी 64 लाख 85 हजार 765 मतदार असून, त्यामध्ये 4 कोटी 93 लाख पुरुष मतदार असून, 4 कोटी 60 लाख महिला मतदार आहेत. 1 कोटी 85 लाखी तरुण मतदार असून, 20 लाख 93 हजार नवमतदार आहेत. 6 लाख 2 हजार दिव्यांग मतदार असून, 12 लाख 5 हजार ज्येष्ठ मतदार आहेत. एकूण 1 लाख 186 मतदान केंद्र असून, ग्रामीण भागात 57 हजार 601 आणि शहरी भागात 42 हजार 582 मतदान केंद्र आहेत. राज्यात 100 वर्ष पूर्ण करणारे मतदार 47,776 आहेत. 85 वर्षापेक्षा अधिक वय 42 लाख 43 हजार, तर 6,031 तृतीयपंथी मतदार आहेत.
झारखंडमध्ये मतदार किती?
झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. पहिला टप्पा 13 नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यात 43 जागांवर, तर दुसऱ्या टप्प्यात 38 जागांवर मतदान होईल. झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. झारखंडमध्ये एकूण 2 कोटी 60 लाख 87 हजार 698 मतदार आहेत. त्यापैकही 11 लाख 84 हजार 150 नवमतदार, 3 लाख 67 हजार दिव्यांग मतदार आणि 1 लाख 13 हजार ज्येष्ठ मतदार आहेत. झारखंडमध्ये मतदानासाठी एकूण 29 हजार 562 मतदान केंद्र असणार आहेत.
मतदारांसाठी सुविधा पोर्टल ॲप
निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने ॲप जारी करण्यात आले आहे. या ॲप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशिरापर्यंत मतदान सुरू असेल, तर केवळ फोटो काढून या ॲप्लिकेशन्सवर अपलोड केला की 90 मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथे पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
एटीएमसाठी पैसे घेऊन
जाणाऱ्या वाहनांवर निर्बंध
एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणूक काळात रात्री 6 ते सकाळी 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. पैसा, ड्रग्ज आणि दारुच्या वाहतुकीवर करडी असेल. याकाळात रुग्णवाहिका, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक
पहिला टप्पा : 43 जागा
निवडणुकीची अधिसूचना – 18 ऑक्टोबर
अर्जांसाठी शेवटचा तारीख – 25 ऑक्टोबर
अर्जांची छाननी – 28 ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची तारीख – 30 ऑक्टोबर
पहिला टप्पा मतदान – 13 नोव्हेंबर
दुसरा टप्पा : 38 जागा
निवडणुकीची अधिसूचना – 22 ऑक्टोबर
अर्जांसाठी शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर
अर्जांची तपासणी – 30 ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची तारीख – 1 नोव्हेंबर
मतदान – 20 नोव्हेंबर
मतमोजणी – 23 नोव्हेंबर
दोन टप्प्यात निवडणूक घेण्याचे कारण काय?
झारखंडमध्ये दोन टप्प्यांत निवडणुका पार पडणार आहेत. पहिला टप्पा 13 नोव्हेंबर आणि दुसरा टप्पा 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. झारखंडमध्ये मागच्या वेळेस पाच टप्प्यांत निवडणूक झाली होती. तिथे नक्षली भाग असल्यामुळे निवडणूक घेण्यास अडचणी येतात. यावेळी आम्ही फक्त दोन टप्प्यात निवडणुका घेत आहोत, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक
निवडणुकीची अधिसूचना – 22 ऑक्टोबर
अर्जांसाठी शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर
अर्जांची छाननी – 30 ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची तारीख – 4 नोव्हेंबर
मतदानाची तारीख – 20 नोव्हेंबर
मतमोजणी – 23 नोव्हेंबर
3 लोकसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक जाहीर
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतानाच निवडणूक आयोगाने तीन लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. केरळमधील वायनाड, महाराष्ट्रातील नांदेड आणि पश्चिम बंगालमधील बशीरहाट लोकसभा मतदारसंघात निवडणूक घेतली जाणार आहे.
राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड येथून विजय मिळवल्यानंतर त्यांनी वायनाडचा राजीनामा दिला होता. तसेच नांदेडमधील काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचा मृत्यू झाल्यामुळे ही जागाही रिकामी झाली आहे. पश्चिम बंगालच्या बशीरहाटमधील तृणमूल काँग्रेसचे हाजी शेख नुरूल इस्लाम यांचा मृत्यू झाल्यामुळे याठिकाणीही पुन्हा मतदान होणार आहे.
काँग्रेसने वायनाडमधून प्रियंका गांधी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
याशिवाय 14 राज्यांतील विधानसभेच्या 48 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. या सर्व पोटनिवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबरलाच जाहीर होईल.
दोन्ही राज्यांत कोण येणार आमने-सामने?
महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे एका बाजूला असतील. दुसरीकडे काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे असतील.
झारखंड राज्यात झारखंड मुक्ती मोर्चा पक्ष आणि भाजप यांच्यातच प्रमुख लढत होणार आहे.