महाराष्ट्रात विजयाची गोवा भाजप नेत्यांना खात्री

0
101

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गड आम्ही सर केला. या निवडणुकीत भाजपाचा विजय निश्‍चित आहे, असा दावा गोव्यातून प्रचारासाठी महाराष्ट्रात गेलेल्या काही मंत्री व नेत्यांनी केला आहे. काल या प्रतिनिधींशी बोलताना पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर, आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मिलिंद नाईक, रमेश तवडकर, खासदार नरेंद्र सावईकर, आमदार विष्णू वाघ, प्रमोद सावंत आदी नेत्यांनी महाराष्ट्रात भाजपचा विजय निश्‍चित असल्याचा दावा केला.महाराष्ट्रात आम्ही तसेच पक्षाच्या अन्य राज्यांतून आलेल्या नेत्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक भाजप नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून जोरदार व शिस्तबद्धरितीने प्रचार केल्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर म्हणाले. सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कणकवली येथे जोरदार अशी जाहीर सभा झाली. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, आमदार विष्णू वाघ हे या सभेत सहभागी झाले होते.
गोव्यातून गेलेल्या नेत्यांना प्रचारासाठी विविध मतदारसंघ वाटून देण्यात आले होते. खासदार नरेंद्र सावईकर यांना चिपळूण व गुहागर मतदारंसघ, दिलीप परुळेकर यांना अलिबाग मतदारसंघ, मिलिंद नाईक यांना पनवेल मतदारसंघ, रमेश तवडकर यांना पनवेलजवळचा कजरत-खालापूर मतदारसंघ, प्रमोद सावंत यांना महाड मतदारसंघ असे मतदारसंघ वाटून देण्यात आले होते.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभांत सहभागी होत असत. नरेंद्र सावईकर हे ६५ कार्यकर्त्यांची फौज, प्रमोद सावंत ७० कार्यकर्त्यांची, रमेश तवडकर ४० कार्यकर्त्यांची, मिलिंद नाईक ४५ कार्यकर्त्यांची तर परुळेकर ५५ कार्यकर्त्यांची फौज घेऊन प्रचारासाठी गेले होते. गोव्यातून सुमारे १५० कार्यकर्त्यांची फौज प्रचारासाठी गेली होती. या कार्यकर्त्यांना खास बसेसमधून नेण्यात आले होते. बहुतेक मंत्रीही बसेसमधूनच गेले होते.
मंत्री दिलीप परुळेकर हे २ रोजी प्रचारासाठी गेले होते. काल सोमवारी ते गोव्यात परतले. रमेश तवडकर २९ रोजी गेले होते. ते उद्या गोव्यात परतणार आहेत. प्रमोद सावंत हेही उद्या १५ रोजी गोव्यात परतणार आहेत. नरेंद्र सावईकर यांचे काल रात्री गोव्यात आगमन झाले.
मुख्यमंत्री आज येणार
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सतीश धोंड, सदानंद तानावडे, विष्णू वाघ आदी नेते आज गोव्यात परतणार आहेत.
विष्णूंची गाणी गाजली
विष्णू वाघ यांनी प्रचारासाठी विशेष गीते लिहिली होती. गोव्याचेच एक सुपुत्र असलेले सुप्रसिद्ध संगीतकार बाळकृष्णन मराठे यांनी या गीतांना संगीतसाज चढवला होता. प्रचाराच्या वेळी या गीतांच्या सुरावटीवर लोक नाचत असत असे वाघ यांनी सांगितले.